1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: बुधवार, 12 जुलै 2023 (14:29 IST)

खरीप हंगाम शेतकरी राजाचा शत्रू शंखी गोगलगाय नियंत्रणासाठी उपाययोजना, एक शेतीवरील रिपोर्ट

conch snail
R S
Measures to control the conch snail सध्या खरीप हंगाम सुरु आहे. बळीराजाची पेरणीची लगबग सुरु असून चांगलं पीक येण्यासाठी अनेक उपाययोजना शेतकरी करतात.  परंतु मागील दोन-तीन वर्षांपासून ढगाळ, आर्द्रतायुक्त जास्त काळ ओलावा असणारे वातावरण राहिल्याने शंखी गोगलगायीची संख्या वाढत आहे. त्यांच्यामुळे पिकांना धोका पोहोचण्याची शक्यता नाकारता येत नाही. शंखी गोगलगायीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एकात्मिक व्यवस्थापन आवश्यक आहे. त्याविषयी कृषि विभागाने दिलेली माहिती…
 
शंखी गोगलगाय साधारणपणे पाच ते सहा वर्ष जिवंत राहते. जीवनक्रम अंडी, पिल्ले आणि प्रौढ अशा तीन अवस्था मध्ये पूर्ण होतो. हिवाळ्यात सुप्तावस्थेमध्ये जाण्याचे प्रमाण खूप जास्त आहे. शंखी गोगलगायीचा प्रसार शेतात वापरण्यात येणारी औजारे, यंत्रसामग्री, वाहने, बैलगाडी, शेणखत, विटा, माती, वाळू, रोपे, बेणे, कुंड्या इत्यादी मार्फत होतो.
 
या गोगलगायी रात्रीच्या वेळी पानांना, फुलांना अनियमित व मोठ्या आकाराची छिद्र पाडून पानांच्या कडा खातात. काही प्रमाणात झाडांच्या शेंगा, फळे, कोवळ्या सालीवर देखील उपजीविका करुन पिकांचे नुकसान करतात. गोगलगायींचे प्रामुख्याने लक्ष रोप अवस्थेत असते. या अवस्थेत रोपांची शेंडे कुरतडून खातात. त्यामुळे पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते.
 
नियंत्रणासाठी उपाययोजना
 
पिकाचे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्यासाठी गोगलगायीची अंडी हाताने गोळा करुन नष्ट करावीत, जेणेकरुन त्यांचा जीवनक्रम नष्ट होईल. उन्हाळ्यात जमिनीची खोल नांगरट करावी. फळझाडाच्या खोडाला 10 टक्के बोर्डोपेस्ट लावल्यास गोगलगायी झाडावर चढत नाहीत. शेताच्या बांधाच्या जवळ दोन्ही बाजूने 1 ते 2 फुटाचे चर काढावेत.
 
संध्याकाळी व सुर्योदयापूर्वी बाहेर आलेल्या तसेच झाडावर लपलेल्या गोगलगायी हाताने गोळा करुन साबणाच्या द्रावणात बुडवाव्यात आणि खड्ड्यात पुरुन टाकाव्यात किंवा रॉकेल मिश्रित पाण्यात बुडवून माराव्यात. गोगलगायी आकर्षित होण्यासाठी गोणपाट गुळाच्या पाण्याच्या द्रावणात बुडवून संध्याकाळी शेतात ठिकठिकाणी ठेवावेत. सकाळी सूर्योदयानंतर त्या पोत्याखाली गोळा झालेल्या गोगलगायी जमा करुन नष्ट कराव्यात.
 
गोगलगायींना शेतातील मुख्य पिकांवर प्रादुर्भाव करण्यापासून परावृत्त करण्यासाठी तंबाखूची किंवा चुन्याची भुकटी किंवा कॉफीची पूड यांचा 4 इंच लांबीचा पट्टा किंवा राखेचा सुमारे 2 मीटर लांबीचा पट्टा बांधाच्या शेजारी टाकावा. गोगलगायींचे नैसर्गिक शत्रू असलेल्या कोंबडी, बदक इत्यादी भक्षकांचे संवर्धन करावे. निंबोळी पावडर,निंबोळी पेंड, 5 टक्के निंबोळी अर्क या वनस्पतीजन्य कीटकनाशकाचा वापर बांधावर केल्यास गोगलगायी शेतात येण्यापासून परावृत्त होतात.
 
मेटाल्डिहाईलला पर्याय म्हणून आयर्न फॉस्फेटचा वापर 2 किलो प्रती एकर या प्रमाणात अमिष म्हणून करता येतो. आयर्न फॉस्फेट पाळीव प्राणी व इतर प्राण्यांना सुरक्षित असल्याने त्याचा गोगलगायीच्या निर्मूलनासाठी उपयोग शेतकऱ्यांनी करावा. अशा प्रकारच्या व्यवस्थापनाद्वारे नियंत्रण ठेवल्यास शंखी गोगलगायीचा प्रादुर्भाव रोखण्यास निश्चितच मदत होईल.
Edited by : Ratnadeep Ranshoor