गुरूवार, 28 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: शुक्रवार, 12 फेब्रुवारी 2021 (07:55 IST)

कांद्याचे भाव हे चाळीशी पार गेले

कांदा उत्पादकांना चांगले दिवस येणार आहेत. तर गृहिणी आणि सर्वसामान्य नागरिकांचं बजेट चांगलंच कोलमडण्याची शक्यता आहे. यावर्षी फेब्रुवारी महिन्यात कांद्याचे भाव हे चाळीशी पार गेले आहेत.
 
नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट मध्ये कांद्याचे दर 40 ते 42 रुपयांपर्यंत पोहोचलेत. मागील वर्षी झालेल्या अवकाळी पावसाचा परिणाम कांदा उत्पादनावर झाला आहे. कांद्याचे उत्पादन कमी झाल्याने पहिल्यांदाच फेब्रुवारी महिन्यात सामान्य नागरिकांना कांदा चढ्या दरात खरेदी करावा लागत आहेत.
 
फेब्रुवारी अखेर पर्यंत हे दर वाढलेलेच राहणार असून नवीन उत्पादन यायला मार्च ते एप्रिल महिन्यापर्यंत वाट पहावी लागणार आहे. त्यामुळे पुढील महिने चढ्या दरानेच कांदा खरेदी करावा लागणार आहे.
 
सध्या बाजारपेठेत नगर,पुणे आणि नाशिक मधून कांदा येत असून कांद्याचे भाव वाढल्याने गुजरातधून पांढरा कांदा देखील बाजारात येत आहे. या कांद्याला 20 ते 22 रुपये किलो भाव मिळत आहे. हा कांदा स्वस्त असला तरी त्याला उठाव नसल्याचं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे लाल कांद्याची मागणी वाढली असल्यानं तो चढ्या दरानं विकला जात आहे.