शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: बुधवार, 7 फेब्रुवारी 2024 (16:25 IST)

Paytm: मध्यमवर्गीय कुटुंबातील विजय शेखर शर्मा यांचा तरुण अब्जाधीश ते संकटापर्यंतचा प्रवास

आरबीआयनं जानेवारी 2024 ला दिलेल्या निर्देशांनंतर मोबाइल वॉलेट पेटीएमच्या भवितव्याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. आरबीआयच्या या पावलामुळं पेटीएमची मालकी असलेल्या वन 97 कम्युनिकेशन्स कंपनी च्या शेअर्समध्ये घसरण झाली आहे.
 
पहिल्या पिढीच्या उद्योजकांबाबत नेहमी पाहायला मिळतं की, कंपनी आणि कंपनीचे संस्थापक यांची कहाणी एकमेकांशी जुळलेली असते. विजय शेखर शर्मा हे देखील याला अपवाद नाहीत.
 
उत्तर प्रदेशच्या अलीगढमधील इंग्रजी बोलायला संकोच वाटणाऱ्या एका हिंदी भाषिक तरुणापासून ते देशातील सर्वात कमी वयाच्या अब्जाधिशांपर्यंतचा प्रवास त्यांनी केला आहे. एक काळ असा होता की, मोबाईल पेमेंट आणि 'पेटीएम करो' हे दोन समानार्थी शब्द बनले होते.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सरकारनं घेतलेल्या एका निर्णयानं कंपनीला प्रचंड फायदा झाला. त्यानंतर कंपनीनं उचललेल्या पावलांमुळं त्यांना फटकाही बसला.
 
शर्मा आणि पीटीएम यांनी त्यावेळी देशातील तेव्हाची सर्वात मोठं पब्लिक ऑफरिंग बाजारात आणलं होतं. त्यामुळं गुंतवणूकदारांना नुकसानही सोसावं लागलं होतं. पण हा कंपनीशी संबंधित एकमेव वाद नाही.
 
शिक्षण, संकट आणि संघर्ष
बँकर आणि लेखक विनित बन्सल यांनी त्यांच्या 'बिकॉज स्काय इज द लिमिट' पुस्तकामध्ये दिल्ली तंत्रज्ञान विद्यापीठाच्या यशस्वी माजी विद्यार्थ्यांच्या यशोगाथा संकलित केल्या आहेत. त्यांनी त्यात शर्मा आणि त्यांच्या कंपनीबाबत 'दो पेटीएम करो' या प्रकरणात माहिती दिली आहे.
 
विजय शेखर यांचा जन्म 7 जून 1978 ला उत्तर प्रदेशच्या अलीगढ जिल्ह्यात झाला होता. त्यांच्या आईचं नाव आशा तर वडिलांचं नाव प्रकाश शर्मा आहे. त्यांचं प्राथमिक शिक्षण हरदुआगंजमध्ये झालं. त्यांचे वडील कडक स्वभावाचे शालेय शिक्षक होते. तर आईसुद्धा शिक्षिका होत्या.
 
त्यांचं शिक्षण सर्वसाधारण किंवा फारशा चांगल्या सुविधा नसलेल्या शाळांमध्ये झालं. त्याठिकाणी काही विद्यार्थ्यांकडं तर पायात चपलाही नसायच्या. शर्मा यांना शिक्षणाचं महत्त्व माहिती होतं म्हणून ते त्यावर लक्ष केंद्रीत करत होते.
 
आई-वडिलांच्या अल्पशा कमाईतून ते दोन मुलं आणि दोन मुलींचा उदरनिर्वाह भागवत होते. परिस्थिती एवढी हलाखीची होती की, कुटुंबात कुणाचं लग्न असलं तरी शाळेचा गणवेश परिधान करावा लागायचा.
 
त्याचवेळी वडिलांनी मुलीच्या लग्नासाठी घेतलेल्या 2 लाख रुपयांच्या कर्जामुळं कुटुंबाची आर्थिक स्थिती आणखी खराब होऊ लागली होती. त्यामुळं अन्नासाठी पैसे वाचवण्यासाठी शर्मा यांना रोज 8 ते 10 किलोमीटर पायी चालावं लागत होतं.
 
अवघ्या 14 वर्षांच्या वयात शर्मा 12 वी पास झाले. पण कॉलेजमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी त्यांना वर्षभर वाट पाहावी लागली. कारण इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये प्रवेशासाठी किमान वयोमर्यादा 15 वर्ष होती. अनेक सरकारी विद्यापीठांमध्ये प्रयत्न केल्यानंतरही यश मिळालं नाही म्हणून त्यांनी सीईटीची तयारी सुरू केली.
 
विविध विद्यापीठांचे अधिकारी आणि कुलगुरू यांच्याशी बोलताना विजय शेखर यांचा उच्च शिक्षणासाठी इंग्रजीचं महत्त्व लक्षात आलं. एका छोट्या शहरातून मर्यादित उत्पन्न आणि इतर सोयीसुविधांच्या अभावामुळं ते एकाच विषयाचं हिंदी आणि इंग्रजी भाषेतील पुस्तक सोबत आणायचे आणि ते वाचायचे. त्यांना स्वतःसह कुटुंबाला गरीबीतून बाहेर काढायचं होतं.
 
वरिल पुस्तकाशिवाय विनित बन्सल यांनी 'फेस ऑफ इंडियन स्टार्टअप इंडस्ट्री विजय शेखर शर्मा' नावाचंही एक पुस्तकही लिहिलं आहे. ते शर्मा आणि पेटीएमवर केंद्रीत असलेलं पुस्तक आहे.
 
कॉलेजचा काळ
विजय शेखर शर्मा यांच्या अडचणी शाळेपर्यंतच मर्यादित राहिल्या नाहीत. दिल्लीतही त्यांच्या अडचणी कमी होण्याऐवजी वाढणार होत्या. बन्सल यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिलं आहे की :
 
1994 मध्ये शर्मा यांना दिल्ली कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगमध्ये इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन्समध्ये प्रवेश मिळाला. दिल्ली विद्यापीठानं विजय शेखर यांनी वयाची 16 वर्षे पूर्ण झालेली नसतानाही स्पेशल केस म्हणून प्रवेश दिला.
 
शर्मा यांना प्रवेश मिळाला. पण त्यांना दोन अडचणींचा सामना करावा लागला. एक म्हणजे त्यांचं वय इतर विद्यार्थ्यांपेक्षा कमी होतं. तर दुसरी म्हणजे दिल्लीच्या बहुतांश विद्यार्थ्यांची बोलीभाषा इंग्रजी होती तर शर्मांची हिंदी होती.
 
सोबतच्या विद्यार्थ्यांबरोबर जुळवून घेणं शक्य झालं नाही त्यामुळं त्यांनी जास्तीत जास्त अभ्यास करण्यावर आणि पुस्तकांबरोबर वेळ घालवण्यावर भर दिला. चांगल्या स्थितीतील उत्तम इंग्रजी पुस्तकं दिल्लीच्या दरियागंज आणि आसिफ अली रोडवर अत्यंत वाजवी किमतीत मिळतात हे त्यांना समजलं. त्यानंतर त्यांनी विद्यार्थी असताना खर्चावर मर्यादा आणत पुस्तकं वाचायला सुरुवात केली. ते कोडींगही शिकले.
विद्यार्थी असताना त्यांनी एका खासगी एअरलाइनच्या दिल्ली मुंबई शेड्यूलसाठी एक वेब-प्रोग्राम कोड केला. त्यासाठी त्यांना पैसे मिळाले ती रक्कम होती एक हजार रुपये. त्यामुळं औपचारिक शिक्षणाची कागदपत्रं नसली तरी उदरनिर्वाह चालवता येणं शक्य असल्याचं शर्मा यांना वाटलं.
 
त्यावेळी स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये शिकणारे सबीर भाटिया यांनी त्यांची ईमेल कंपनी 'हॉटमेल' मायक्रोसॉफ्टला 400 मिलियन डॉलरमध्ये विकली. डॉटकॉम युगाच्या दरम्यान सिलिकॉन व्हॅली शहर चर्चेत होतं. त्यावेळी भारतातील तरुण आयटी टेक्नोक्रॅटमधघ्ये भाटिया यांनी आयकॉनचं स्थान मिळवलं होतं. आर्थिक स्थितीमुळं अमेरिकेच्या विद्यापाठीतून शिक्षण घेणं शक्य नसल्याचं शर्मा यांना माहिती होतं.
 
पण तरीही त्यांना इंटरनेट आणि स्टार्ट-अपचं महत्त्व माहिती होतं. कॉलेज सुरू असताना विजय आणि त्यांच्या मित्रांनी मिळून एक स्टार्टअप सुरू केला. व्हिजिटिंग कार्डवर हॉस्टेलच्या खोलीचा नंबर हा पत्ता म्हणून दिला होता आणि फोन नंबर होता आपल्या कॉलेजचाच.
 
पेजरच्या त्या काळात त्यांची एका दुकानदाराशी मैत्री झाली. त्यानं शर्मा यांना काही पैशांच्या मोबदल्यात त्यांचा फोननंबर व्हिजिटिंग कार्डवर छापण्याची परवानगी दिली. तसंच संपर्क करणाऱ्यांची यादीही ठेवू लागले. कॉलेजनंतर शर्मा त्यांच्याशी संपर्क करायचे.
 
वन97 कम्युनिकेशन्सची स्थापना
टेक्नॉलॉजी रिपोर्टर आणि लेखक विजय मेनन यांनी त्यांच्या 'इनोव्हेशन स्टोरीज इन इंडिया इंक' या पुस्तकात टाटा, एलअँडटी, गोदरेज, एशियन पेंट्स, इन्फोसिस, एचडीएफसी बँकसह देशातील 20 हून अधिक कंपन्यांमध्ये केलेल्या नवनवीन प्रयोग किंवा दुर्लक्षित भागांचा उल्लेख केला आहे. त्याच्या एका प्रकरणात पेटीएमबाबतही लिहिलं आहे :
 
कॉलेजदरम्यान विजय शेखर यांनी भारताच्या पर्यटन क्षेत्रावर एक वेबसाईट तयार केली. नंतर दिल्लीच्या एका मीडिया हाऊसनं ही बेवसाईट खरेदी केली. त्यानंतर विजय शेखर शर्मा यांना काही रोख रक्कम आणि कंपनीत आयटी प्रमुख पद मिळालं. त्यापूर्वी त्यांनी वर्षभर एका खासगी कंपनीत काम केलं होतं. त्यामुळं आर्थिक अडचणी कमी झाल्याचं समजल्यानं त्यांच्या आई-वडिलांना प्रचंड आनंद झाला.
 
एका मीडिया कंपनीत आयटी प्रमुख म्हणून जवळपास एक वर्ष आणि एकूण दोन वर्ष काम केल्यानंतर त्यांना पुन्हा व्यवसायात उतरण्याची इच्छा झाली. त्यांनी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी वन 97 ची स्थापना केली. कंपनी दिल्लीत नोंदणी झालेली होती. पण कर्मचारी नोएडामध्ये होते.
 
एसएमएसच्या काळात शर्मा यांची कंपनी टेलिकॉम ऑपरेटर्सच्या ग्राहकांना जोक्स, बातम्या, क्रिकेट अपडेट, ज्योतिष अशा व्हॅल्यू अॅडेड सेवा पुरवत होती. देशात टेलिकॉम सेक्टर जस-जसं विकसित होत होतं, त्याचबरोबर शर्मा यांच्या कंपनीचाही विकास होत होता.
 
तत्कालीन यूपीए सरकारनं 2007 मध्ये 2जी स्पेक्ट्रम खासगी कंपन्यांना दिलं होतं. काही वर्षांतच देशातील अनेक कंपन्या एकत्र आल्या आणि त्यांच्यात ग्राहकांसाठी प्रचंड स्पर्धा सुरू झाली. त्याचवेळी प्रिपेड ग्राहकांसाठी रिचार्जची मोठी समस्या उभी राहिली.
 
त्याकाळात शर्मा यांनी 2009 मध्ये 'पेटीएम' लाँच केलं. त्याद्वारे मोबाईल बॅलेन्स टॉपअप, रिचार्ज शक्य झालं. त्याशिवाय ग्राहकांना त्यांच्या बँक खात्याद्वारे किंवा क्रेडिट कार्डद्वारेही खरेदी करता येत होती. पेटीएमच्या स्टॉक मार्केट प्रॉस्पेक्टस (पेज नंबर 2018) मध्ये काही इतर वार्षिक माहिती दिली आहे, त्यानुसार :
 
आगामी वर्षांमध्ये पेमेंट गेटवे (2012), सेमी क्लोज्ड वॅलेट्स (2013) यांना आरबीआयची मंजुरी मिळाली. त्यामुळं पुढच्या वर्षी पेटीएमनं त्यांचे अँड्रॉइड आणि आयओएल अॅप लाँच केले.
 
शर्मा यांच्या लक्षात आलं की 100-200 रुपयांसारख्या लहान-सहान आर्थिक व्यवहारांमध्ये टेलिकॉम किंवा बँकिंग कंपन्यांनाही फारसा रस नव्हता. शर्मा यांच्यात वॉलेट लायसन्सद्वारे ही कमी भरून काढण्याची क्षमता होती.
 
2014 नंतर देशात 4-जी च्या वापरात वाढ होऊ लागली. रिलायन्सनं Jio लाँच केल्यामुळं टेलीकॉम सेक्टर प्रचंग वेगानं वाढत होतं. ई मेल, मॅसेजिंग अॅप्स आणि सोशल मीडिया अॅप्सचा सहज वापर करण्यासाठी लोकांच्या हातात स्मार्टफोन येऊ लागले होते. त्याचबरोबर मोबाइल वॉलेटचा वापरही वाढला.
 
पेमेंट्स बँक (2017), रोड टोल कलेक्शनसाठी फास्टॅग (2017), स्टॉक ब्रोकर (2019), लाइफ अँड जनरल इंश्यूरन्स ब्रोकर (2020) म्हणून मंजुरी मिळाली.
 
Google ने जेव्हा 2020 मध्ये Paytm चं अॅप प्ले स्टोरवरुन हटवलं तेव्हा Google नं जुगाराच्या नियमांच्या उल्लंघनाचा हवाला दिला. तर Paytm ने कंपनीच्या एकाधिकारशाहीचा मुद्दा उपस्थित केला. त्याचवर्षी शर्मा यांनी प्ले-स्टोरला टक्कर देण्यासाठी भारतीय स्टार्ट-अपचे अॅप्स होस्ट करण्यासाठी पेटीएम मिनी-अॅप स्टोर लाँच केलं.
 
पण या सर्वामध्ये देशाच्या आर्थिक इतिहासात एक अशी घटना घडली ज्याचा उल्लेख कंपनीला त्यांच्या अधिकृत दस्तऐवजांत करता आला नाही. त्यामुळं पेटीएमला अनेक पटींनी प्रगती होण्यासाठी फायदा झाला.
 
नमो आणि डीमो
जसं ऑनलाइन सर्च म्हणजे Google आणि फोटोकॉपी म्हणजे झेरॉक्स असतं तसं शर्मा यांना आर्थिक व्यवहार म्हणजे Paytm बनवायचं होतं. सरकारच्या एका पावलानं त्यांचं हे स्वप्नं सत्यात उतरलं.
 
8 नोव्हेंबर 2016 च्या सायंकाळी 'नमो' नावानं प्रसिद्ध पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्यरात्रीपासून 500 आणि 1000 च्या नोटांवर बंदीची घोषणा केली. त्याला डीमॉनिटायझेशन किंवा 'डीमो' म्हटलं गेलं.
 
एका रात्रीत देशाच्या चलनातून 85 टक्केहून अधिक मूल्याच्या नोटा रद्द करण्यात आल्या आणि त्या बदलण्यात याव्यात असं म्हटलं गेलं. ही प्रक्रिया दोन महिने चालणार होती आणि त्याचा परिणाम अनेक महिने राहणार होता. बहुतांश रोख व्यवहार असलेल्या देशाच्या अर्थव्यवस्थेत लोकांनी क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग, ऑनलाइन शॉपिंग असे पर्याय चाचपून पाहिले.
 
पण लहान-सहान व्यवहारांसाठी सर्वात यशस्वी आणि लोकप्रिय पर्याय ई वॉलेटचाच होता. पण फ्रीचार्ज, मोबिक्विक असे अनेक ई वॉलेट असले तरी पेटीएम त्यांच्या खूप पुढं होतं. मोबाईल आर्थिक व्यवहार आणि 'पेटीएम करो' हे दोन पर्यायी शब्द बनले.
 
पेटीएमनं देशभरातील वर्तमानपत्रांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या फोटोसह पानभर जाहिराती देत त्यांचे आभार मानले. पण त्यामुळं पंतप्रधानांवर प्रचंड टीका झाली.
नोटबंदीच्या घोषणेनंतर तीन महिन्यांत पेटीएम यूझर्सच्या संख्येत 50 टक्क्यांनी वाढ झाली. कमी आणि मध्यम उत्पन्न गटातील सुमारे 19 कोटी खाते पेटीएमवर तयार झाले. अॅपचा इंटरफेस इंग्रजीबरोबर हिंदी आणि देशाच्या प्रादेशिक भाषांमध्येही आहेत. त्यामुळं कमी शिकलेल्या किंवा इंग्रजी न येणाऱ्यांनाही त्याचा वापर करणं सोपं जातं.
 
2015 मध्ये कंपनीचं उत्पन्न 336 कोटी होतं. पण 2017 मध्ये ते वाढून 828.6 कोटी झालं होतं. 30 कोटी यूझर्स रोज सरासरी 70 लाख ट्रान्झॅक्शन करत. ती रक्कम 9.4 अब्ज डॉलरवर होती.
 
कंपनीचा प्रचंड विकास होत असताना कर्मचाऱ्यांची संख्या वाढवणे, आयटी आणि पायाभूत सुविधांचा विस्तार, जाहिराती, मार्केटिंग यासाठी अधिक पैशांची गरज होती. डिसेंबर 2016 मध्ये चीनचे प्रसिद्ध अब्जाधीश जॅक मा यांच्या कंपनीनं पेटीएममध्ये गुंतवणूक केली. त्यामुळं कपनीचं मूल्यांकन 4.86 अब्ज डॉलरवर गेलं.
 
कंपनीत त्यांच्या भागिदारीमुळं शर्मा 38 वर्ष वयाचे देशातील सर्वात कमी वयाचे अब्जाधिश उद्योजक बनले. तेही स्वतःच्या कर्तृत्वावर. त्यावेळी त्यांची एकूण संपत्ती एक अब्ज 30 कोटी डॉलरची असल्याचं समोर आलं होतं. एक टक्के भागिदारी देत शर्मा यांनी पेटीएम पेमेंट्स बँकमध्ये त्यांना पर्सनल स्टेकहोल्डर बनवलं.
 
त्यानंतर विजय शेखर यांचे भाऊ आणि पेटीएमचे व्हाइस प्रेसिडेंट अजय शेखर शर्मा यांच्या स्टिंग ऑपरेशनचा व्हिडिओही समोर आला. त्यामुळं ते भाजपची मातृसंघटना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे निकटवर्तीय असल्याचा आणि काश्मीरमध्ये दगडफेक करणाऱ्यांबाबत पंतप्रधान कार्यालयाला डेटा दिल्याचा दावा करण्यात आला होता.
 
त्याशिवाय अजय शेखर असंही म्हणाले की, पेटीएमनं त्यांच्या अॅप आणि वेबमध्ये पंतप्रधानांच्या पुस्तकाला प्राधान्य दिलं. त्यांच्या स्टिंगनंतर पेटीएम यूझर्सच्या डेटाच्या गोपनीयतेबाबतही प्रश्न उपस्थित झाले.
 
आयपीओतून मोठा फटका
कंपनी शॉपिंग, बस, ट्रेन, विमान आणि सिनेमा तिकिटांची सेवा देते. तसंच गॅस, वीज, पाणी, मोबाइल, क्रेडिट कार्ड, लँडलाइन आणि इंटरनेट बिल भरणे; डीटीएच आणि मोबाइल रिचार्ज, फास्टटॅग अशा सेवा देऊन 'वन-स्टॉप सॉल्यूशन' बनण्याचा प्रयत्न केला. त्याशिवाय म्युच्युअल फंड, डिजिटल गोल्ड, जनरल आणि लाइफ इंश्यूरन्स आणि पर्सनल, मर्चंट, होम आणि कार लोन या सेवाही दिल्या जातात.
 
एकेकाळी कंपनीच्या ई कॉमर्स साइटशिवाय 40 कोटी यूझर्स रोड अडीच कोटी आर्थिक व्यवहार करत होते. कोणत्याही कंपनीत होतं तसंच या कंपनीतील सुरुवातीच्या गुंतवणूकदारांना त्यांचे काही शेअर्स विक्री करायचे होते. त्यामुळं आयपीओची मदत घेण्यात आली.
 
पण नफा हाती नसल्यामुळं तज्ज्ञांनी याला फारसं चांगलं रेटिंग दिलं नाही. लोकांनी कमाईची संधी जायला नको म्हणून यासाठी नोंदणी केली आणि कंपनीनं बाजारातून 18 हजार 300 कोटी रुपये मिळवले.
 
2150 रुपयांच्या शेअरमध्ये पहिल्याच दिवशी 9 ते 27 टक्के घसरण झाली. त्यामुळं लिस्टिंगच्या पहिल्यात दिवशी कंपनीला 39 हजार कोटींचा फटका बसला.
 
अमेरिकेतील दिग्गज गुंतवणूकदार वॉरेन बफेट यांची कंपनी बर्कशायर हॅथवेनंही शर्मा यांच्या कंपनीत गुंतवणूक केली होती. आयपीओदरम्यान चीन आणि जपानच्या गुंतवणूकदारांनीही त्यांची भागिदारी विकली. पण त्यांनी मार्च 2023 मध्ये आरबीआयच्या आदेशानंतरच्या महिन्यांत भागिदारी विकल्याचं म्हटलं जातं.
 
2013 मध्ये विजय शेखर शर्मा कंपनीच्या विस्तारासाठी विविध उद्योजकांशी संपर्क करत होते. त्यावेळी अमेरिकन एक्सप्रेसनंही शर्मा यांच्या कंपनीत रस दाखवला आणि त्यांचे प्रतिनिधी होते अश्निर ग्रोवर. त्यांनी स्वतः भारत-पे नावानं मोबाइल वॉलेट कंपनी लाँच केली.
 
शर्मा यांच्या कंपनीचं लिस्टींग झालं त्यावेळी ग्रोवर यांनी चिनी गुंतवणूकदारांचा पैसा भारतीय गुंतवणूकदारांच्या पैशाच्या माध्यमातून मोकळा करण्यात आला, अशी टिपण्णी केली होती. त्यानंतरच्या काही महिन्यांत ग्रोवर यांना त्यांच्याच कंपनीतून बाहेर पडावं लागलं.
 
आरबीआयच्या निर्देशांनंतर सोशल मीडियावर एक निवेदन जारी करत शर्मा म्हणाले की, अॅप ठरलेल्या मर्यादेनंतरही सुरू राहील. त्यांच्या आश्वासनानंतरही शेअर बाजारात पेटीएमची घसरण सुरू राहिली. ती केव्हा आणि कसी थांबेल याचे काही संकेत मिळत नाहीयेत.
 
जर ते या संकटांमधून बाहेर पडले तरी अमेरिकेची दिग्गज कंपनी अल्फाबेट, अॅमेझॉनचे पेमेंट अॅप आहे, मॅसेजिंग अॅप व्हाट्सअॅप मेटाच्या माध्यमातून आर्थिक सेवेचा पर्याय देत आहे, तर वॉलमार्टचा पाठिंबा असलेल्या फोनपे यांच्यासमोर तग धरण्याचं आव्हान त्यांच्यासमोर कायम राहील.
 
देशातील मध्यवर्ती बँक आरबीआयनं भविष्यात पेटीएम पेमेंट्स बँकेच्या विरोधात काहीही कारवाई केली, तरी नागरिकांना लहान-सहान आर्थिक व्यवहारासाठी मोबाईलचा वापर करण्यासाठी प्रवृत्त करण्यात त्यांचं योगदान कोणीही नाकारू शकणार नाही.
 
Published By- Priya DIxit