पेट्रोल, डिझेल, केरोसिनच्या भावात घट
पेट्रोल, डिझेल, केरोसिनच्या दरात झालेली घट आणि स्वयंपाक गॅसचे (LPG) दर स्थिर ठेवण्यात यश आल्याने सामान्य नागरिकांना कोरोनाच्या काळात आर्थिक दिलासा मिळाला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये गेल्या महिनाभरात प्रतिलिटरमागे एक ते तीन रुपयांनी घट झाली असून, केरोसिनचे भाव पावणेतेरा रुपयांनी घटले आहेत.
(Indian Oil Corporation) अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार देशभरातील डिझेलच्या किरकोळ विक्री किमतीत सप्टेंबरमध्ये २.९३ रुपयांनी, तर पेट्रोलच्या दरात लिटरमागे ९७ पैशांनी घट झाली आहे. ऑक्टोबर महिन्यातही डिझेलच्या किमती १७ पैशांनी घटल्या असून, पेट्रोलचे भाव मात्र स्थिर आहेत. घटत्या इंधन दराचा फायदा वाहनचालकांना मिळाला आहे. त्यातही डिझेलच्या किमतीत घट झाल्याने मालवाहतूकदारांना दिलासा मिळाला आहे.
घरगुती स्वयंपाक गॅसच्या दरात जुलै २०२० पासून कोणताही बदल झालेला नाही. पेट्रोलियम कंपन्यांकडून या काळात दरमहा सरासरी १३ कोटी सिलिंडरचा पुरवठा करण्यात आला आहे.
केरोसिनच्या मागणीत सातत्याने घट -
धान्य दुकानामार्फत वितरित केल्या जाणार्या केरोसिनच्या दरात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. फेब्रुवारी २०२० पासून केरोसिनच्या दरात लिटरमागे तब्बल १२.७३ रुपयांची घट झाली आहे. या महिन्याच्या सुरुवातीस केरोसिनचे दर २.१९ रुपयांनी खाली आले आहेत. केरोसिनचा प्रतिलिटर दर २५.८४ वरून २३.६५ रुपयापर्यंत खाली आला आहे. केरोसिनऐवजी एलपीजी वापरास प्रोत्साहन देण्याचे सरकारचे धोरण आहे. त्यामुळे केरोसिनची मागणी घटल्याने दरात सातत्याने घट होत असल्याचे इंडियन ऑइलच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.