Paytm पेमेंट्स बँकेला धक्का, RBI ने लावला एक कोटी रुपयांचा दंड
देशातील आघाडीच्या पेमेंट बँकांपैकी एक असलेल्या पेटीएम पेमेंट्स बँकेला मोठा धक्का बसला आहे. वास्तविक, भारतीय रिझर्व्ह बँक अर्थात RBI (रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया) ने नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल पेटीएम पेमेंट्स बँक लि. म्हणजेच PPBL ला एक कोटी रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. पेमेंट आणि सेटलमेंटच्या कलम 6 (2) चे उल्लंघन केल्याबद्दल हा दंड ठोठावण्यात आला आहे.
रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पेटीएम पेमेंट्स बँकेचे प्रकरण पेमेंट आणि सेटलमेंट सिस्टम कायद्याच्या नियमांचे उल्लंघन करण्याशी संबंधित आहे. मध्यवर्ती बँकेने म्हटले आहे की, अधिकृततेचे अंतिम प्रमाणपत्र जारी करण्यासाठी पेटीएम पेमेंट्स बँकेच्या अर्जाची तपासणी केल्यावर, आम्हाला आढळले की पेटीएम पेमेंट्स बँकेने अशी माहिती दिली आहे जी वास्तविक स्थिती दर्शवत नाही.
वस्तुस्थितीबाहेर माहिती देणे हे PSS कायद्याच्या कलम 26 (2) चे उल्लंघन आहे. या संदर्भात पेटीएम पेमेंट्स बँकेला नोटीस बजावण्यात आली.
मध्यवर्ती बँकेने म्हटले आहे की, वैयक्तिक सुनावणी दरम्यान आणि तोंडी दिलेल्या माहितीचे पुनरावलोकन केल्यानंतर आरबीआयला हे आरोप खरे असल्याचे आढळले. यानंतर पीपीबीएलवर दंड आकारण्याची कारवाई करण्यात आली.