शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: शनिवार, 26 फेब्रुवारी 2022 (11:23 IST)

रशिया -युक्रेन संकट : युद्द्धामुळे आर्थिक फटका बसणार, महागाई वाढणार

कोरोना महामारीशी लढणारे जग आता युक्रेन आणि रशियामध्ये सुरू असलेल्या तणावामुळे हैराण झाले आहे. अमेरिका आणि नाटो यांनी दोन्ही देशांमधील युद्धात लष्करी सहभागाचा निर्णय घेतला तर तिसरे महायुद्धही होऊ शकते.
 
रशिया आणि युक्रेन यांच्यातील रक्तरंजित युद्धाने जगात भीषण महागाई वाढेल आणि भारतही त्यातून सुटणार नाही.  कच्च तेल प्रति बॅरल 100 डॉलरच्या जवळ पोहोचले आहे. त्यामुळे देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात झपाट्याने वाढ होऊन पुन्हा एकदा महागाईचा बॉम्ब फुटणार आहे. यामुळे भारताच्या आर्थिक स्थैर्याला धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनीही व्यक्त केली आहे.
 
सध्या देशात विधानसभा निवडणुका सुरू आहेत. तज्ज्ञांच्या मते, 10 मार्च रोजी निवडणूक निकालानंतर येथे पेट्रोलच्या दरात मोठी वाढ होऊ शकते.
 
2014 मध्ये जेव्हा क्रूडची किंमत प्रति बॅरल 108 डॉलर होती, तेव्हा दिल्लीत पेट्रोल 72.26 रुपये प्रति लिटर होते, तर डिझेल 55.48 रुपये प्रति लिटर होते. आज क्रूड 100 रुपयांच्या जवळ असताना राजधानीत पेट्रोल 96 रुपये आणि डिझेल 86.67 रुपये प्रति लिटर आहे. मात्र, 21 ऑक्टोबर 20 ऑक्टोबर 2021 रोजी पेट्रोल 106.19 रुपये आणि डिझेल 94.90 रुपयांवर पोहोचले होते. त्यानंतर सरकारने व्हॅट आणि इतर कर कमी करून त्याच्या वाढत्या किमती काही प्रमाणात आटोक्यात आणल्या होत्या.2021 मध्ये देशातील बहुतांश शहरांमध्ये पेट्रोलने 100 चा टप्पा पार केला तर डिझेलनेही अनेक ठिकाणी 3 अंक गाठला आहे.
 
खाद्यतेलाच्या किमतीही वाढतील : भारत दर महिन्याला युक्रेनमधून सुमारे 2 लाख टन सूर्यफूल तेल आयात करतो. युद्धामुळे युक्रेनमधून सूर्यफूल तेलाची खेप घेऊन भारतात येणारी मालवाहू जहाजेही येथे उशिरा पोहोचतील. या स्थितीत अर्जेंटिनावरील आपले अवलंबित्व वाढणार. 
 
महागाई भडकणार : पेट्रोलच्या किमतीत झपाट्याने वाढ झाल्यास अन्य वस्तूंनाही महागाईचा फटका बसणार आहे. वाहतूक महाग होईल, मालवाहतुकीचा खर्च वाढेल आणि सर्वसामान्यांचा त्रास वाढेल.
 
भारताचे रशियाशी प्रदीर्घ व्यापारी संबंध आहेत. दोन्ही देशांमध्ये मोठ्या प्रमाणात मालाची आयात आणि निर्यात केली जाते. युद्ध झाल्यास भारताला इतर देशांकडून महागड्या किमतीत या वस्तू खरेदी कराव्या लागतील. 
 
खाद्यतेलासह अनेक वस्तू युक्रेनमधून भारतात आयात केल्या जातात. 2021 मध्ये भारताने रशियाकडून 43,400 बीपीडी तेल आयात केले. युद्ध झाले तर व्यापार होणार नाही आणि भारताचा त्रास वाढेल. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाल्यामुळे देशात वाहतुकीपासून ते स्वयंपाकघरापर्यंत सर्वच वस्तूंच्या किमती वाढू शकतात. अशा परिस्थितीत प्रत्येक घराचे बजेट बिघडण्याची शक्यता आहे.