मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: बुधवार, 30 जून 2021 (20:16 IST)

SBI : स्टेट बँक ऑफ इंडियामधून पैसे काढणं महागलं, पाहा नवे दर

देशातली सगळ्यांत मोठी सरकारी बँक असणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये बचत खातं असणाऱ्या खातेदारांना आता चारपेक्षा जास्त वेळा पैसे काढल्यास शुल्क भरावं लागेल.
 
PTI वृत्तसंस्थेने दिलेल्या बातमीनुसार बेसिक बचत खातं असणारे धारक दर महिन्याला आपल्या खात्यातून फक्त चार वेळा निशुल्क व्यवहार करू शकतात.
 
या खातेधारकांना दरवर्षी 10 पानांचं एक चेकबुक देण्यात येईल. त्यापेक्षा जास्त चेकची गरज लागली तर त्यासाठीही त्यांना शुल्क मोजावं लागेल.
 
या सेवा - अॅडिशनल व्हॅल्यू अॅडेड सर्व्हिसेस असल्याचं स्टेट बँक ऑफ इंडियाने म्हटलंय. आणि यासाठी बँक ग्राहकांकडून 15 ते 75 रुपये शुल्क घेईल.
 
बिगरवित्तीय व्यवहार आणि पैसे पाठवण्यासाठी वा स्वीकारण्याची सेवा बँक शाखा, ATM, CDM (कॅश डिस्पेंन्सिंग मशीन) येथे निशुल्क उपलब्ध असेल.
 
बँकेच्या शाखा, SBI किंवा इतर कोणत्याही बँकेच्या ATM मधून महिन्यातून 4 वेळा पैसे निशुल्क काढता (Withdraw) येतील. पाचव्यांदा पैसे काढल्यास 15 रुपये शुल्क (आणि जीएसटी) आकारण्यात येईल.
 
वर्षाला 10 पानांचं चेकबुक निशुल्क देण्यात येईल आणि त्यानंतर आणखी एक 10 पानांचं चेकबुक हवं असेल तर त्यासाठी 40 रुपये शुल्क (आणि जीएसटी) तर 25 पानांच्या चेकबुकसाठी 75 रुपये शुल्क (आणि जीएसटी) भरावं लागेल.
 
10 पानांचं चेकबुक तातडीने हवं असल्यास त्यासाठी 50 रुपये (आणि जीएसटी) मोजावे लागतील. पण ज्येष्ठ नागरिकांना चेकबुकची सुविधा निशुल्क मिळणार असल्याचं स्टेट बँकेने स्पष्ट केलंय.
 
बेसिक बचत खातं
बेसिक सेव्हिंग्स बँक डिपॉझिट अकाऊंट हे असं बचत खातं जे कोणालाही KYC साठीची कागदपत्रं देत सुरू करता येऊ शकतं.
 
बँकिंग व्यवस्थेबाहेर असणाऱ्या गटाला या प्रणालीत आणण्यासाठी, बँकेत खातं उघडत बचतीसाठी प्रोत्साहन देण्यासाठी, हे खातं सुरू केलं जातं.
 
स्टेट बँक ऑफ इंडियाने 2015 ते 2020 या काळामध्ये अशा बेसिक सेव्हिंग्स बँक डिपॉझिट अकाऊंटच्या सुमारे 12 कोटी खातेधारकांकडून सर्व्हिस चार्ज म्हणून 300 कोटींची वसुली केल्याचं IIT मुंबईच्या एका अभ्यासात समोर आलं होतं.
 
दरवेळी पैसे काढण्यासाठी बेसिक बचत खातंधारकांकडून 17.70 रुपये शुल्क घेणं योग्य नसल्याचं या अभ्यासात म्हटलं होतं.
 
भारतातली दुसऱ्या क्रमांकाची मोठी सरकारी बँक असणाऱ्या पंजाब नॅशनल बँकेने याच कालावधीमध्ये बेसिक बचत खातं असणाऱ्या 3.9 कोटी खातेधारकांकडून सर्व्हिस चार्ज म्हणून 9.9 कोटी रुपये वसूल केल्याचं याच अभ्यासात आढळलं होतं.
 
बेसिक सेव्हिंग्स बँक डिपॉझिट अकाऊंटवर सर्व्हिस चार्ज आकारण्याचा निर्णय रिझर्व्ह बँकेच्या सूचनांप्रमाणे घेतला जातो.