शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: गुरूवार, 2 जुलै 2020 (08:35 IST)

बचतगटांची उत्पादने ॲमेझॉनवर विक्रीसाठी

कोरोना संकटकाळात बचतगटांचा व्यवसाय ठप्प झाल्याने त्यांना मोठा फटका बसला होता. ग्राहकांनाही बचतगटांच्या वस्तुंपासून वंचित रहावे लागले होते. पण आता बचतगटांची उत्पादने ही ॲमेझॉन आणि ‘जीईएम’ (GeM) या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करण्यात आली असून त्यामुळे बचतगटांना व्यवसाय आणि ग्राहकांना त्यांच्या वस्तू सुलभरित्या घरपोच मिळणार आहेत, अशी माहिती ग्रामविकास मंत्री  हसन मुश्रीफ यांनी दिली.
 
स्वयंसहाय्यता समुहांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी उमेद अभियानामार्फत विविधस्तरावर सरस प्रदर्शनांचे आयोजन करण्यात येते. परंतु स्वयंसहाय्यता समुहांनी तयार केलेल्या उत्पादनांना वर्षभर मागणी राहते. त्यामुळे प्रदर्शन संपल्यानंतरही ग्राहकांना बचतगटांच्या वस्तू वर्षभर मिळाव्यात यासाठी अॅमेझॉन व जीईएम (GeM) सारखी ऑनलाईन बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यात आली आहे. सध्या अॅमेझॉनवर ३३ तर जीईएम पोर्टलवर ५० उत्पादनांची नोंद करण्यात आली आहे. यामुळे या उत्पादनांना आता आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध होत आहे, असे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.
 
प्रायोगिक तत्वावर कागदी बॅग्स व टेराकोटा दागिने अशा दोन उत्पादनांची नोंदणी या संकेस्थळावर करण्यात आली होते. याला मिळालेल्या भरघोस प्रतिसादानंतर आता ३३ उत्कृष्ठ उत्पादनांची या संकेस्थळांवर नोंदणी करण्याचे ठरले. वर्धा जिल्ह्यातील स्वयंसहाय्यता समुहांनी तयार केलेल्या विविध उत्पादनांची नोंदणी ॲमेझॉन संकेतस्थळावर करण्यात आली आहे. ॲमेझॉनवर सध्या ३३ उत्पादने अपलोड केली आहेत. यामध्ये विविध प्रकारचे पापड (८ प्रकार), पेपर बॅग (४ प्रकार), टेराकोटा ज्वेलरी (४ प्रकार), सरगुंडे, कुरडई, हळद पावडर, मसाले (४ प्रकार), रेशमी ज्वेलरी (६ प्रकार), शेवई, मुंगवडी, न्युट्री बिस्किट, मास्क (८ प्रकार) यांचा समावेश आहे.