टाटा उद्योगसमूहाने केली मोठी मदत, १० कोटींचे अर्थसहाय्य, १०० व्हेंटिलेटर्स, २० अॅम्ब्युलन्स
करोनाच्या संकटात टाटा समूह पुन्हा एकदा उद्धव ठाकरे सरकारच्या मदतीला धावून गेले आहेत. १० कोटींचं अर्थसहाय्य हे टाटा उद्योगसमूहाकडून मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत महापालिकेला देण्यात आलं. इतकंच नाही तर १०० व्हेंटिलेटर्स आणि २० अॅम्ब्युलन्सचीही मोलाची मदत टाटांनी केली.
समाजातील प्रत्येक घटक एकत्र येऊन जेव्हा संकटाशी मुकाबला करतात त्यावेळेस यश नक्की मिळते. त्याच जिद्दीने करोनाशी लढा देताना टाटा समूहासारख्या उद्योग संस्था शासनाच्या खांद्याला खांदा लावून लढा देत आहे. आपण करोनाच्या लढाईत नक्कीच विजयी होऊ, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी येथे व्यक्त केला.
मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील आरोग्य सेवेच्या पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी मुंबई मनपा आणि टाटा समूह यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या प्लाझ्मा प्रकल्पांतर्गत टाटा समूहातर्फे महापालिकेला वीस रुग्णवाहिका, १०० व्हेंटिलेटर्स आणि दहा कोटींचे अर्थ सहाय्य मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सुपूर्द करण्यात आले.