शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By

लासलगाव कृउबा समितीत लाल कांद्याला सर्वोच्च भाव

सामन्य माणसाला रडवणारा कांदा सर्वांना माहित आहे. मात्र सध्या बाजारात तेजी असल्याने शेतकरी वर्गाला कांदा चांगला भाव देवून जात आहे.
 
लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत उन्हाळ कांद्यापाठोपाठ आता लाल कांद्याच्या दरात वाढ होत असल्याचे चित्र दिसत असून काल येथील बाजार समितीच्या आवारात ८१५२ रुपये प्रति क्विंटल इतका सर्वोच्च दर मिळाला. तर दुसरीकडे देशांतर्गत मागणीच्या तुलनेत पुरवठा होत नसल्याने, केंद्र सरकारने इजिप्त आणि तुर्की या दोन देशातून १७ हजार मेट्रिक टन कांदा आयात करण्याचा निर्णय घेतला आहे.
 
हा कांदा डिसेंबरच्या शेवटी आणि जानेवारीच्या सुरुवातीस देशांतर्गत दाखल होणार असल्याने, त्यादरम्यान लाल कांद्याची मोठ्या प्रमाणात देशांतर्गत आवक होणार असून, दोन्ही कांदे एकाच वेळी बाजारात दाखल झाल्यास कांद्याचे बाजार भाव मोठ्या प्रमाणात कोसळतील आणि याचा फटका भारतीय कांदा उत्पादकांना बसण्याची भीती या क्षेत्रातील तज्ञांनी व्यक्त केली आहे.
 
शुक्रवार दि २९ नोव्हेंबर च्या तुलनेत लाल कांद्याच्या कमाल दरात सोमवारी १६२७ रुपयांची वाढ झाली आहे. उन्हाळ कांद्याची आवक जवळपास संपत आली असून,आता येथील बाजार समितीच्या आवारात लाल कांद्याची आवक वाढत आहे. सोमवारी लाल कांद्याची १८५० क्विंटल आवक होऊन प्रति क्विंटलला कमीत कमी २००० रु,जास्तीत जास्त ८१५२ रु तर सरासरी ७१०० रु प्रति क्विंटल असा भाव मिळाला. लासलगाव बाजार समितीत २०१५ मधील लाल कांद्याला उच्चांकी असा ६३०० रुपये बाजार भावाचा विक्रम मोडीत काढत ८१५२ रुपये इतक्या उच्चांकी बाजार भावाची आज ऐतिहासिक नोंद झाली.
 
सध्या बाजारपेठेत वाढलेले कांद्याचे भाव आणखी महिनाभर तेजीतच राहतील असे येथील कांदा व्यापारी बोलत आहे.नवीन लाल कांदा पुरेश्या प्रमाणात बाजारात येण्यासाठी आणखी एक ते दीड महिना वाट पाहावी लागणार आहे.संक्रांतीनंतर नवीन कांदे बाजारात येण्यास सुरुवात होईल आणि त्यानंतर भाव कमी होण्याची शक्‍यता आहे.