१ रुपयात १ किमी धावणार! ७ सीटर मारुतीची नवी 'इलेक्ट्रिक MPV' येतेय; जाणून घ्या डिटेल्स
मारुती सुझुकी एक नवीन इलेक्ट्रिक कार घेऊन येत आहे. ही कार ३-रो (थ्री-रो) एमपीव्ही (MPV) असू शकते. गेल्या काही दिवसांत मारुती सुझुकीच्या या आगामी ७-सीटर एमपीव्हीला अनेकदा चाचणी दरम्यान पाहिले गेले आहे. या कारचे कोडनेम 'वायएमसी' असल्याचे सांगितले जात आहे. स्पाई शॉट्सवरून या कारच्या डिझाईनचा अंदाज लावला जाऊ शकतो.
ही कार बॉक्सी डिझाईनसह येईल, ज्यामध्ये लांब व्हीलबेस मिळेल. ही कार ४.५ मीटर लांब असू शकते. आगामी इलेक्ट्रिक मारुती सुझुकी एमपीव्हीचे अनेक पार्ट्स 'ई-व्हिटारा'शी मिळतेजुळते असू शकतात. चला जाणून घेऊया या कारशी संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टी.
ही मारुती सुझुकीची दुसरी इलेक्ट्रिक कार असू शकते. ई-व्हिटारा नंतर कंपनी कौटुंबिक ग्राहकांना लक्ष्यात ठेवून ही कार बाजारात आणू शकते. टेस्ट मॉडेलमध्ये ही कार हाय रूफलाईन, चांगला ग्लास एरिया आणि स्क्वेअर-ऑफ रिअर सेक्शनसह दिसत्येय. मागील बाजूबद्दल बोलायचे तर, यात व्हर्टिकल टेललॅम्प्स मिळतील. तर फ्रंटला क्लोस्ड-ऑफ ग्रिल दिसेल.
चार्जिंग, रेंज आणि खर्च
मारुती सुझुकी YMC मध्ये बऱ्याच गोष्टी ई-व्हिटारासारख्याच असतील. यामध्ये ४९kWh आणि ६१kWh ची बॅटरी मिळू शकते. मोठ्या बॅटरीसह ही कार ५०० किलोमीटरपेक्षा जास्त रेंजचा दावा करू शकते. ही कार हर्टेक्ट-ई प्लॅटफॉर्मवर तयार केली जाईल. यात डीसी फास्ट चार्जिंगचा सपोर्ट मिळेल.
चार्जिंगच्या खर्चाबद्दल बोलायचे तर, घरी ६१kWh बॅटरी असलेली कार चार्ज करण्यासाठी ५०० रुपये ते ७०० रुपये खर्च येतो. तर पब्लिक एसी (AC) चार्जरने कार चार्ज करण्यासाठी ८०० रुपयांपेक्षा जास्त लागतील, तर डीसी चार्जरने कार चार्ज करण्यासाठी १५०० रुपयांच्या आसपास खर्च होऊ शकतो.
कार कधीपर्यंत येणार?
या कारची टोयोटा व्हर्जन देखील पाहायला मिळू शकते. ज्याप्रमाणे ई-व्हिटाराला टोयोटाने 'अर्बन क्रूझर इबेला' नावाने लाँच केले, त्याचप्रमाणे मारुती सुझुकी YMC ला देखील टोयोटा दुसऱ्या नावाने लाँच करू शकते. या आगामी इलेक्ट्रिक ७ सीटरचे उत्पादन मारुती सुझुकीच्या गुजरात प्लांटमध्ये होईल.
मारुती सुझुकी या कारची निर्यात देखील करू शकते, म्हणजेच ही कार आपल्याला ग्लोबल मार्केटमध्येही पाहायला मिळेल. ही इलेक्ट्रिक एमपीव्ही पुढील वर्षी लाँच होऊ शकते. या कारची थेट स्पर्धा 'किया कारेन्स क्लॅव्हिस ईव्ही'शी असेल. मारुती ही कार कारेन्स क्लॅव्हिसपेक्षा कमी किमतीत लाँच करू शकते.
एमपीव्ही मार्केटमध्ये मारुतीची मजबूत पकड आहे. विशेषतः अर्टिगामुळे जवळपास अर्ध्या एमपीव्ही मार्केटवर मारुती सुझुकीचे वर्चस्व आहे. कंपनी पेट्रोल आणि सीएनजी व्हर्जनमध्ये अर्टिगा आणि XL6 च्या रूपात एमपीव्ही विकतेच आहे. इलेक्ट्रिक एमपीव्हीच्या एंट्रीमुळे उरलेली ती पोकळीही भरेल, जिथे लोकांना इलेक्ट्रिक कारची गरज आहे.
