सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: शुक्रवार, 7 ऑक्टोबर 2022 (22:40 IST)

ऑनलाईन खरेदीवर परिणाम करणारं टोकनायझेशन म्हणजे काय?

सध्या अनेक ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट्सचे सेल सुरू आहेत..आणि UPI किंवा कार्ड्स वापरून ही ऑनलाईन खरेदीही पटापट होते. हीच ऑनलाईन खरेदी आणि व्यवहार अधिक सुरक्षित व्हावेत म्हणून रिझर्व्ह बँकेने एक नवीन प्रणाली आणलीय....याचं नाव आहे - टोकनायझेशन
 
हे टोकनायझेशन म्हणजे काय? ते कसं करायचं...आणि मुळात त्याने काय बदलेल?
 
टोकनायझेशनसाठी रिझर्व्ह बँकेचा आग्रह
ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट्स आधी तुम्हाला तुमच्या कार्डचे डिटेल्स सेव्ह करून ठेवण्याचा पर्याय द्यायच्या. म्हणजे तुमचं नाव - जन्मतारीख - कार्ड नंबर हे सगळे तपशील आधीच तयार असायचे. CVV नंबर टाकून पटकन खरेदी करता यायची.
पण क्रेडिट वा डेबिट कार्डचे तपशील अशाप्रकारे तिसऱ्या कोणाकडे तरी साठवलेले असणं धोकादायक आहे. हा डेटा चुकीच्या व्यक्तींच्या हाती पडला तर याचा गैरवापर होऊ शकतो, म्हणूनच रिझर्व्ह बँकेने असा तपशील साठवण्यावर 31 डिसेंबर 2021 पासून बंदी आणली.
 
टोकनायझेशनसाठी रिझर्व्ह बँकेने गेल्या 2 वर्षांत अनेकदा मुदतवाढ दिली. पण आता मात्र हे करणं आवश्यक असणार आहे.
 
टोकनायझेशन काय आहे?
तुमच्या क्रेडिट वा डेबिट कार्डच्या तपशीलाऐवजी एक विशिष्ट टोकन नंबर जनरेट केला जाईल. तुमचं कार्ड, टोकन रिक्वेस्टर - म्हणजे असं टोकन तयार करण्याची तुमची रिक्वेस्ट स्वीकारणारी संस्था आणि तुमचा डिव्हाईस म्हणजे फोन किंवा टॅब्लेट याच्याशी हे टोकन संलग्न असेल.
 
यामुळे आतापर्यंत मर्चंटकडे किंवा वेबसाईट्सकडे असणारा तुमचा कार्ड डेटा आता त्यांच्याकडे नसेल.
तुमचे कार्ड डिटेल्स, टोकन आणि इतर माहिती सुरक्षित पद्धतीने कार्ड नेटवर्क्सकडे साठवली जाईल.
 
हे टोकनायझेशन करताना टोकन काढायला पैसे भरावे लागणार नाहीत.
 
टोकन काढणं सध्या तरी कंपल्सरी नाही. टोकनायझेशन केलं नाही तर प्रत्येक वेळी कार्ड डीटेल्स भरून तुम्हाला व्यवहार करता येतील.
 
टोकन काढल्याने ऑनलाईन व्यवहार अधिक सुरक्षित होतील, कारण तुमचा कार्ड डेटा सुरक्षित राहील.
 
'डी - टोकनायझेशन' करता येईल. तुम्ही ही टोकन लिंक काढून पुन्हा कार्ड डिटेल्स घालण्याच्या पर्यायावर येऊ शकता
 
मोबाईल फोन्स, टॅब्लेट्स, लॅपटॉप्स, डेस्कटॉप्स, स्मार्ट वॉचेस या सगळ्या डिव्हायसेसवरून टोकनायझेशन करता येईल.
 
टोकन काढायचं कसं?
कोणत्याही ई-कॉमर्स किंवा शॉपिंग वेबसाईटला जा.खरेदी करून झाल्यावर चेकआऊट कराल तेव्हा तुमच्या कार्डचा तपशील भरा.
 
किंवा आधी तपशील नोंदवलेलं कार्ड असेल तर ते सिलेक्ट करा.
यानंतर तुम्हाला पर्याय मिळेल - secure your card as per RBI guidelines किंवा मग tokenise your card as per RBI guidelines.
 
मग हे टोकन तयार करण्यासाठी परवानगी द्या.
 
यानंतर तुमचं टोकन जनरेट होईल.
ही प्रक्रिया सुरुवातीला किचकट वाटू शकते कारण तुम्हाला तुमच्या प्रत्येक कार्डचं, प्रत्येक ई कॉमर्स किंवा ऑनलाईन मर्चंट वेबसाईट आणि अॅपसाठी टोकन तयार करावं लागेल.
 
पण ही वन - टाईम प्रोसेस म्हणजेच एकदाच करायला लागणारी प्रक्रिया आहे.
 
पुढच्यावेळी तुम्ही ऑनलाईन वेबसाईटवर व्यवहार कराल तेव्हा तुम्ही टोकन नंबर किंवा आख्खा कार्ड नंबर लक्षात ठेवण्याची गरज नाही.
 
तुम्हाला तुमच्या कार्ड नंबरचे शेवटचे 4 आकडे घालून हे टोकन व्हेरिफाय करता येईल.