1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: सोमवार, 23 ऑगस्ट 2021 (13:07 IST)

सोन्याच्या हॉलमार्किंगला विरोध का होतो आहे?

सोन्याचे दागिने आणि वस्तूंच्या हॉलमार्किंग प्रक्रियेत लागू करण्यात आलेल्या बदलांचा निषेध आज (23 ऑगस्ट) राज्यभरातले सोनार आणि सराफा व्यापारी करत आहेत.
 
भारतात सोन्याला गुंतवणूक म्हणूनही महत्त्व आहे आणि सोन्याचे दागिने, इतर कलात्मक वस्तूंसाठी या धातूचं श्रृंगारिक मूल्यही मोठं आहे. पण केंद्रसरकारने सोन्याचे दागिने आणि वस्तूंचं हॉलमार्किंग अनिवार्य केलं. असं प्रमाणपत्र असेल तरंच या वस्तू सोनार विकू शकतील. शिवाय सोनार आता 14, 18 आणि 22 कॅरेटचेच दागिने विकू शकणार आहेत.
 
हॉलमार्किंग ग्राहकांच्या भल्यासाठीच आहे. पण त्याचा नेमका फायदा काय? आता तुमच्याकडे असलेल्या वस्तूंवर हॉलमार्कचा शिक्का नसेल तर काय होईल या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया…
 
हॉलमार्किंग म्हणजे काय?
तुमच्याकडे असलेला एखादा सोन्याचा दागिना निरखून पाहा. मागच्या बाजूला नजरेला दिसणारही नाही अशा सूक्ष्म आकारात काही आकडे आणि अक्षरं कोरलेली दिसतील. तशी ती दिसली तर समजा तुमच्याकडचं सोनं हॉलमार्कवालं आहे.
 
यात पहिला असेल तो ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) चा लोगो, त्यानंतर दागिन्यात सोन्याचं प्रमाण किंवा शुद्धता नेमकी किती आहे तो आकडा आणि त्यानंतर सोन्याची शुद्धता ज्या केंद्रात तपासण्यात आलीय त्या केंद्राचा लोगो. सगळ्यात शेवटी सोनाराचा स्वत:चा लोगो.
 
या चारही गोष्टी तुमच्याकडच्या दागिन्याच्या मागे कोरलेल्या असतील तर समजा सोनं हॉलमार्क प्रमाणित आहे. हॉलमार्क म्हणजे सोन्याच्या शुद्धतेचं प्रमाणपत्र. केंद्रसरकारने आता असं हॉलमार्क असलेलंच सोनं खरेदी-विक्री करता येईल असा नियम बनवलाय. केंद्रीय ग्राहक सेवामंत्री पियुष गोयल यांनी ट्विट करून या निर्णयाची माहिती दिली.
 
सुरुवातीला देशातील 256 जिल्ह्यांमध्ये हा नियम लागू होत आहे. पुढे टप्प्या टप्प्याने देशभर हॉलमार्किंग अनिवार्य होईल.यामुळे ग्राहकांची फसवणूक टळेल'
 
सोन्याला उष्णता दिली की त्याला हवा तो आकार देता येऊ शकतो, दागिनेही असेच घडवले जातात. पण, सोनं हा धातू नाजूक असल्याने आकार देताना त्याची मजबुती जाते किंवा ते तुटू शकतं. म्हणूनच दागिने घडवताना त्यात थोडं तांबं मिसळलं जातं. खरंतर किती प्रमाणात तांबं मिसळायचं हे प्रमाणही ठरलेलं आहे. पण, अनेकदा लबाडी होते.
 
आणि म्हणूनच सोन्याची शुद्धता म्हणजे दागिन्यात किती प्रमाणात सोनं आहे हे तपासणं महत्त्वाचं ठरतं. सोन्यावरचा हॉलमार्कचा शिक्का आणि बरोबर मिळणारं प्रमाणपत्र तुम्हाला नेमकं हेच सांगतं. आतापर्यंत दागिन्यांचं हॉलमार्किंग हे अनिवार्य नव्हतं. कारण, सोन्याची शुद्धता तपासणारी पुरेशी केंद्र देशात नव्हती.
 
पण, 2017 पासून केंद्रसरकारने अशा केंद्रांची संख्या वाढवण्यासाठी प्रयत्न केले आणि आता देशांत सोन्याची शुद्धता तपासून सोनं प्रमाणित करणारी 945 केंद्र आहेत. वर्षभरात 14 कोटी सोन्याच्या वस्तू प्रमाणित करण्याची क्षमता आता भारताकडे असल्याचा दावा केंद्रसरकारने केला आहे आणि ही सुविधा उपलब्ध झाल्यावरच हॉलमार्किंग अनिवार्य करण्यात आलंय.
 
हॉलमार्किंगला विरोध का होतो आहे?
महाराष्ट्र राज्य सराफ सुवर्णकार फेडरेशनचे अध्यक्ष फत्तेचंद रांका यांनी सांगितलं, "आमचा हॉलमार्कला विरोध नाही. या नवीन प्रणालीतल्या HUID चं प्रेझेंटेशन आम्हाला देण्यात आलं. आणि यात आम्हाला ट्रॅकिंग दिसून आलं. आधीची प्रक्रिया सोपी होती. आता पोर्टलवर जाऊन प्रत्येक आयटम अपलोड करायचा, त्याचं वजन सांगायचं, त्यानंतर ती गोष्ट हॉलमार्क सेंटरला पाठवायची. मग ते पोर्टलवर अपलोड करणार आणि नंतर आम्हाला ईमेल पाठवणार. आम्ही येस म्हटल्यावर प्रोसेस होणार. मग BISच्या वेबसाईटवरून आयडी जनरेट होणार आणि प्रत्येक दागिन्याला सहा आकडी हॉलमार्क करणार. जी प्रक्रिया एका दिवसात व्हायची तिला पाच सहा दिवस लागणार."
 
"यामध्ये कारकुनी काम खूप वाढणार आहे. पूर्वी 4 मार्क होते. BIS चा लोगो, दुकानाचा मार्क, हॉलमार्क सेंटरचा लोगो आणि प्युरिटी. आता दुकानाचा हाऊसमार्क काढून टाकला. हॉलमार्क सेंटरचा हाऊसमार्क काढून टाकला. आणि नवीन नंबर आणला. त्याचं म्हणणं आहे की आम्ही हे प्युरिटीसाठी करतो. पण HUID नंबरचा आणि प्युरिटीचा संबंध काय? कारण स्टँपिंग करताना प्युरिटी वेगळी लिहिण्यात येणार आहे. शिवाय आम्ही हॉलमार्कला गोष्ट पाठवली आणि त्यांनी शिक्के मारताना चूक केली, तर त्याची जबाबदारी आमच्यावर का? नीति आयोगाने याविषयी आमच्या संघटनांशी चर्चा करून सूचना दिल्या होत्या. पण त्या नं घेता यांनी वेगळा कायदा काढला. "
 
हॉलमार्कचा फायदा काय?
देशात आज घडीला 4 लाखांच्यावर सोनार आपल्या पेढ्या चालवतायत. पण, यातल्या फक्त 35,879 सोनारांकडेच BISचं प्रमाणपत्र आहे. म्हणजे ग्राहकांची फसवणूक झाली तर ते दाद मागणार तरी कशी? कारण, तुम्हाला मिळणारी पावतीच मूळी कच्ची आहे. पण, हॉलमार्किंग अनिवार्य झाल्यावर हे चित्र बदलेल.
 
महत्त्वाचं म्हणजे सोन्यात सोनारांकडून होणारी भेसळ थांबेल आणि ग्राहकांची फसवणूक होणार नाही
 
सोनार आता 14, 18 आणि 22 कॅरेटचेच दागिने विकू शकतील. 20, 23 आणि 24 कॅरेटच्या दागिन्यांचं हॉलमार्किंगही होऊ शकणार आहे.
 
महाराष्ट्रात सध्या 122 एसेइंग अँड हॉलमार्किंग केंद्र आहेत. तर पश्चिम भारतात एकूण 199 त्यामुळे भारतात मुंबई, ठाणे, नवी मुंबई, जळगाव, पुणे, सातारा, नागपूर अशा जवळ जवळ सर्वच महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये हॉलमार्किंग अनिवार्य होणार आहे.
 
सध्या सोन्याची घड्याळं, फाऊंटन पेन आणि कुंदन, पोलकी, जडाव यासारख्या काही विशिष्ट दागिन्यांना हॉलमार्किंगमधून सूट देण्यात आली आहे.
 
ग्राहकांकडून जुने हॉलमार्क नसलेले दागिने विकत घेण्याची परवानगी सोनारांना आहे.
 
सोनारांनी हॉलमार्क नसलेले दागिने विकल्याचं स्पष्ट झालं तर त्यांच्यावर दागिन्याच्या किमतीच्या पाचपट दंड किंवा एक वर्षांपर्यंतचा कारावास होऊ शकतो.
 
दागिन्यांच्या हॉलमार्किंगसाठी नोंदणी करायची असल्यास ती ऑनलाईन होऊ शकते.
 
तुमच्याकडे आता असलेले दागिनेही तुम्ही जवळच्या केंद्रात जाऊन प्रमाणित करून घेऊ शकता. आणि हॉलमार्कशिवाय ते विकूही शकता. तेव्हा हॉलमार्क नसेल तर घाबरून जाण्याची गरज नाही. पण, इथून पुढे मात्र दागिने किंवा इतर सोन्याच्या वस्तू खरेदी करताना हॉलमार्क नक्की तपासा.
 
ग्राहकांवर काय परिणाम?
या नवीन हॉलमार्किंग प्रणालीचा ग्राहकांनाही फटका बसणार असल्याचं फत्तेचंद रांका यांचं म्हणणं आहे. बीबीसी मराठीशी बोलताना ते म्हणाले, "नवीन हॉलमार्किंगमध्ये दुकानांचा मार्क काढून टाकला आहे. पूर्वी पावती नसली तरी दुकानाचा मार्क पाहून आम्ही डोळे झाकून दागिना परत घेत होतो. आमच्याकडून माल घेतला हे कळू शकत होतं. बिलाचा प्रश्न नव्हता. पण दुकानाचा मार्क काढल्याने ते कळणार नाही. HUDI शी प्युरिटीचा संबंध नाही. मग ग्राहकांना चुकीचं का सांगतायत?
 
ट्रॅकिंग होणार आहे. त्यामुळे ग्राहकांचं नाव पोर्टलवर जाणार. भविष्यातले धोके लक्षात घ्यायला हवेत. पुढे आधारकार्डने लिंक करायची तरतूद आली आणि समजा मी चेकने पेमेंट केलं, इन्कम टॅक्स किंवा जीएसटीवाले तुमचं सोर्स ऑफ इन्कम दाखवा अशी नोटीस पाठवू शकतात. शिवाय कोणताही डेटा हायजॅक होऊ शकतो. बँकेचे अकाऊंट, गुगल पेही हायजॅक होतंय. उद्या हा डेटा बाहेर गेला तर किती मोठा प्रॉब्लेम होईल."