सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 7 नोव्हेंबर 2022 (08:11 IST)

अभिनेते प्रशांत दामले यांनी केला १२ हजार ५०० वा विक्रमी नाट्य प्रयोग

prashant damle
मुंबई – मराठी नाट्य आणि चित्रपटसृष्टीचे वैभव जपण्यासाठी त्यांना आवश्यक त्या सर्व सोयी-सवलती दिल्या जातील. मराठी कलाकारांच्या पाठिशी शासन ठामपणे उभे आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिली. माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांच्या १२ हजार ५०० व्या विक्रमी नाट्य प्रयोगाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त श्री. दामले यांचा मुख्यमंत्री श्री. शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मानपत्र देऊन त्यांचा गौरव करताना मुख्यमंत्री बोलत होते.
 
नाट्यसृष्टीत नाटकांचे तब्बल १२ हजार ५०० प्रयोग अभिनेते प्रशांत दामले यांनी केले, ही राज्याच्या दृष्टीने अभिमानाची बाब असल्याचे सांगून मुख्यमंत्र्यांनी श्री. दामले यांचे अभिनंदन केले. प्रशांत दामले यांना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली, त्याला उत्तर देताना प्रशांत दामले यांना पद्म पुरस्कार देण्याबाबतच्या शिफारशीचा प्रस्ताव मागणी करण्याअगोदरच केंद्र सरकारला पाठवला असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
 
मुंबई- ठाण्यामध्ये नवीन चित्रनगरी
कलावंतांना मोठं व्यासपीठ उपलब्ध व्हावं यासाठी मुंबई आणि ठाण्यामध्ये चित्रनगरी उभारणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी केली.
राज्यातील नाट्यगृहांची दुरुस्ती करणार
राज्यातील नाट्यगृहांची स्थिती सुधारण्यासाठी त्या नाट्यगृहांची दुरुस्ती करण्याबाबत यापूर्वी बैठक घेऊन निर्देश दिले आहेत. खराब स्थितीतील नाट्यगृहांच्या पाहणीसाठी एक नोडल अधिकारी नेमला जाईल आणि त्या नाट्यगृहांची लवकरात लवकर दुरुस्ती केली जाईल, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.
Edited by : Ratnadeep Ranshoor