रविवार, 13 ऑक्टोबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 1 एप्रिल 2023 (15:03 IST)

Bokya Satbande Natak Press Release : बोक्या सातबंडे 20 एप्रिल पासून रंगभूमीवर

bokya satbande
'बोक्या सातबंडे' हा अनेकांच्या लहानपणीचा सवंगडी राहिला आहे. प्रसिद्ध अभिनेते आणि लेखक दिलीप प्रभावळकर यांनी आपल्या 'बोक्या सातबंडे' या पुस्तकमालिकेतून उभे केलेले हे पात्र आजही अनेकांच्या मनात घर करून आहे. स्वभावाने अतिशय करामती असलेल्या या मुलाच्या नेमक्या वृत्तीची ओळख 'बोक्या' या नावातून होतेच होते. मनाने निर्मळ, अनेक प्रश्न पडणारा आणि वेगवेगळ्या गोष्टींवर आपल्या परीने उपाय शोधू पाहणारा हा 'बोक्या' आता रंगभूमीवर येत आहे. जागतिक रंगभूमी दिनाचे औचित्य साधून 'बोक्या सातबंडे' या बालनाट्यात बोक्याच्या भूमिकेतून 'आरुष बेडेकर' हा प्रेक्षकांच्या भेटीस येणार याचो घोषणा नुकतीच करण्यात आली.  'योगयोगेश्वर जय शंकर' या मालिकेत बाल शंकर महाराज यांच्या भूमिकेत दिसलेला हा बाल कलाकार आता रंगभूमीवर 'बोक्या सातबंडे' कसा साकारणार याची उत्सुकता आता सगळ्याना लागून राहिली आहे.  .
 
अनामिका, भूमिका आणि मिलाप थिएटर यांच्या संयुक्त विद्यमाने या बालनाट्याची निर्मिती होत असून, या नाटकांचे दिग्दर्शन विक्रम पाटील आणि दीप्ती जोशी करत आहे.  या नाटकांची तालीम सध्या सुरु झाली असून ती जोरदार सुरु आहे. दिलीप प्रभावळकर याच्या मूळ कथेवर आणि पात्रांवर आधारित या नाटकांचा शुभांरभ बालगंधर्व रंगमंदिर पुणे येथे येत्या २० एप्रिलला होणार आहे. नाटकाचे पहिले चार प्रयोग हे पुण्यात तर लगेच मुंबईत सुद्धा या नाटकांचे प्रयोग लवकर लागणार असून प्रयोगाची वेळ तारिख आणि स्थळाची माहिती लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. या नाटकांच्या निर्मितीची सूत्र सांभाळणारा आणि प्रायोगिक रंगभूमीवर नेहमीच काही ना काही नवीन करत असलेला प्रणव जोशी सांगतो 'सध्या रंगभूमीवर बालनाट्य सुरु आहेत, एका वेगळ्या विश्वात घेऊन जाणारी एक वेगळं जग दाखवणारी ती नाटक आहेत, त्याच बरोबर एक काल्पनिक विश्वात घडणाऱ्या त्या गोष्टींसोबत आजची आताची गोष्ट सुद्धा सांगावी म्हणून या नाटकांची निर्मिती करण्याचं ठरवलं. त्यात बोक्या सातबंडे हा सगळ्यांचा आवडता आणि आपलासा असल्यामुळे त्याला रंगभूमीवर आणण्याची धडपड सुरु केली. जागतिक रंगभूमी दिनाच्या निमित्ताने या नाटकाचा नायक कोण आहे हे जगासमोर आलं आहे. पण आता नेमकं हे नाटक कस असेल यासाठी थोडा वेळ वाट पाहावी लागेल'. 'बोक्या सातबंडे' या नाटकाचे लेखन डॉ. निलेश माने यांनी केले असून या नाटकाचे नेपथ्य संदेश बेंद्रे करत आहे. तर नाटकातील गीत वैभव जोशी यांनी लिहिली आहेत. नाटकाला संगीत निनाद म्हैसाळकर देत असून प्रकाश योजनेची जबाबदारी राहुल जोगळेकर, वेशभूषेची जबाबदारी महेश शरला आणि रंगभूषा कमलेश बिचे हे सांभाळत असून नृत्य दिग्दर्शन संतोष भांगरे करत आहे.