शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 4 एप्रिल 2022 (15:56 IST)

Ek Hathacha Antar- नात्यांची गोष्ट सांगणार 'एका हाताचं अंतर'

एकापेक्षा एक दर्जेदार मराठी चित्रपट प्रदर्शित होत असतानाच, त्यात आता आणखी एका चित्रपटाची भर पडणार आहे. प्लॅनेट मराठी ओटीटी, अ व्हिस्टास मीडिया कॅपिटल कंपनीवर प्रकाश कुंटे दिग्दर्शित ‘एका हाताचं अंतर’ हा चित्रपट लवकरच भेटीला येणार आहे. नुकतीच या चित्रपटाची घोषणा करण्यात आली असून मुहूर्त सोहळाही संपन्न झाला आहे. या चित्रपटात प्रेक्षकांना गौरी नलावडे, अभिजीत खांडकेकर, नेहा जोशी, हेमंत ढोमे, सिद्धार्थ चांदेकर, रेशम श्रीवर्धनकर हे कलाकार झळकणार आहेत. ‘एका हाताचं अंतर’ या चित्रपटाचे संपूर्ण चित्रीकरण निसर्गरम्य अशा पाँडीचेरीमध्ये होणार आहे. 
 
चित्रपटाबद्दल दिग्दर्शक प्रकाश कुंटे म्हणतात, "प्लॅनेट मराठी सोबतचा हा माझा पहिला चित्रपट आहे. तर काही कलाकारांसोबतही मी पहिल्यांदाच काम करत आहे. हे सगळेच कलाकार कमाल आहेत. या चित्रपटाबद्दल सांगायचे तर ही एक प्रेमकहाणी असून कुटूंबासोबत पाहावा असा हा चित्रपट आहे. नात्यातील विविध पैलू यात पाहायला मिळणार आहेत.’’
 
‘प्लॅनेट मराठी ओटीटी'चे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, "प्रकाश कुंटे हे अतिशय उत्कृष्ट आणि संवेदनशील दिग्दर्शक आहेत. त्यांनी सिनेसृष्टीला नेहमीच वेगवेगळे विषय दिले असून प्रेक्षकांनीही त्याला भरभरून प्रतिसाद दिला आहे. लवकरच एक नवीन विषय घेऊन आम्ही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहोत. यापूर्वी आम्ही 'पाँडीचेरी' हा चित्रपट केला होता ज्याचे संपूर्ण चित्रीकरण पाँडीचेरीमध्ये करण्यात आले होते. आता 'एका हाताचं अंतर' या चित्रपटाचे चित्रीकरणही पाँडीचेरीमध्ये होणार आहे. त्यामुळे मराठी सिनेसृष्टीला आता एक नवीन चित्रीकरणस्थळ मिळाले आहे. या निमित्ताने मराठी सिनेसृष्टीही महाराष्ट्राबाहेर आपला ठसा उमटवू पाहात आहे.''
 
हाई आईक्यू एन्टरटेनमेंटचे राजीव रमेश अग्रवाल म्हणतात, ‘’प्लॅनेट मराठी ओटीटीच्या सोबत काम करण्याची संधी मिळणे, ही आमच्यासाठी आनंदाची बाब आहे. या माध्यमातून आम्ही ‘एका हाताचं अंतर’ हा चित्रपट प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहोत. ही एक अशी कथा आहे जी आपल्या आयुष्याशी मिळतीजुळती असून मनोरंजनात्मक आहे. उत्कृष्ट कलाकार आणि पाँडीचेरीतील चित्रीकरण या चित्रपटातील जमेच्या बाजू आहेत.’’
 
अक्षय बर्दापूरकर, प्लॅनेट मराठी व हाई आईक्यू एंटरटेनमेंट निर्मित या चित्रपटाच्या छायाचित्रणाची धुरा स्टेफानो मोर्कल्डो यांनी सांभाळली आहे.