शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Updated : शुक्रवार, 25 जून 2021 (16:55 IST)

अकरावी प्रवेश: SSC CET कधी आणि कशी होणार? किती फी भरावी लागणार?

दहावीची परीक्षा रद्द झाल्याने अकरावीचे प्रवेश गुणवत्ता यादीनुसार व्हावेत यासाठी राज्य सरकारने सीईटी परीक्षेचा पर्याय विद्यार्थ्यांना दिला आहे. ही सीईटी परीक्षा जुलै अखेर किंवा ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होईल अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.
 
दहावीचा निकाल अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे जाहीर करण्यात येणार असून साधारण 15 जुलैपर्यंत हा निकाल घोषित केला जाणार आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर दहावीच्या विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षा देण्यासाठी प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.
 
ही परीक्षा वैकल्पिक असून सीईटीला प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशासाठी मात्र प्राधान्य देण्यात येईल. त्यामुळे स्पर्धात्मक महाविद्यालयात प्रवेश घेण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांना सीईटीच्या माध्यमातून प्रवेशाची जागा सुरक्षित करता येणार आहे.
गेल्यावर्षी राज्यात कनिष्ठ महाविद्यालयांत अकरावीसाठी 32 टक्के जागा रिक्त राहिल्या होत्या. त्यामुळे यंदाही दहावीचे विद्यार्थी प्रवेशासापासून वंचित राहणार नाहीत असं आश्वासन शिक्षण विभागाने दिलं आहे.
 
कशी असेल सीईटी परीक्षा?
अकरावी प्रवेशासाठीची ही सीईटी परीक्षा एसएससी बोर्ड, सीबीएसई, सीआयएससीई आणि सर्व आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात येणार आहे.
 
ही परीक्षा सर्व विद्यार्थ्यांसाठी बंधनकारक नाही. परंतु अकरावीची प्रवेश प्रक्रिया राबवताना सीईटीमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेशासाठी प्राधान्य देण्यात येईल.
सीईटी परीक्षा एसएससी बोर्डाच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल.
 
परीक्षा 100 गुणांची असेल. OMR पद्धतीने परीक्षा होणार असून दोन तासांची परीक्षा असेल.
 
इंग्रजी, गणित, विज्ञान, सामाजिकशास्त्र या विषयांवर प्रत्येकी 25 गुणांचे प्रश्न असतील.
 
ही परीक्षा ऑफलाईन घेण्यात येणार आहे.
 
परीक्षा केंद्रांची यादी एसएससी बोर्ड किंवा परीक्षा परिषदेमार्फत जाहीर करण्यात येईल.
 
दहावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी शुल्क भरले आहे त्यांना सीईटीसाठी स्वतंत्र शुल्क भरावे लागणार नाही. एसएससी बोर्ड वगळता इतर बोर्डाच्या विद्यार्थ्यांना मात्र शुल्क भरावे लागणार आहे.