गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शुक्रवार, 18 जून 2021 (17:28 IST)

BMC : मुंबई महापालिकेची निवडणूक कधी होणार?

प्राजक्ता पोळ
सर्वात मोठी महापालिका म्हणून ओळखल्या जाणार्‍या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे.
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचा कार्यकाळ फेब्रुवारी 2022 मध्ये संपतोय. त्यामुळे अवघ्या काही महिन्यांवर मुंबई महापालिका निवडणूक येऊन ठेपली आहे. पण याच काळात कोरोनाच्या तिसर्‍या लाटेचा धोका आहे. त्यामुळे निवडणूक कशी घ्यायची? याबाबत निवडणूक आयोगाचा विचार विनिमय सुरू आहे.

मुंबई महापालिकेची निवडणूक कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वेळेवर होणार की पुढे ढकलली जाणार? हा प्रश्न आहे. याच प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा आम्ही प्रयत्न केलाय.
 
मुंबई महापालिका निवडणूक कधी होणार आहे?
मुंबई महापालिकेचा कार्यकाळ फेब्रुवारी 2022 मध्ये संपतो आहे. त्यामुळे निवडणुकीला आता अवघ्या 8 महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे.
सध्या कल्याण डोंबिवली, वसई विरार, कोल्हापूर, औरंगाबाद आणि नवी मुंबई या पाच महापालिकांच्या निवडणुका कोरोना महामारीमुळे पुढे ढकलण्यात आल्या आहेत. पण मुंबई महापालिका निवडणूक वेळेवर व्हावी यासाठी निवडणूक आयोगाची बैठक झाली.
या बैठकीत मुंबई महापालिका निवडणूक वेळेवर होणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत.
राज्य निवडणूक आयुक्त यूपीएस मदान यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोव्हीड 19 चे सर्व प्रोटोकॉल पाळून निवडणूक घेतली जाईल. पण एकाच बुथवर गर्दी होऊ नये म्हणून बुथ वाढवण्याची गरज आहे.
कोव्हिड प्रोटोकॉलनुसार ज्या पद्धतीने तयारी करण्याची गरज आहे, त्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
 
मुख्य स्पर्धा कोणामध्ये आहे?
मुंबई महापालिका निवडणुकीत मुख्य स्पर्धा ही शिवसेना विरूद्ध भाजप अशी राहणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेवर युती करण्याची शक्यता आहे.
कॉंग्रेस स्वतंत्रपणे ही निवडणूक लढविणार असल्याची घोषणा मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी केली आहे.
पण महापालिकेत गेल्या दोन दशकांपासून सत्तेत असलेल्या शिवसेनेच्या 93 तर भाजपच्या 82 जागा आहेत. राज्यातल्या सत्तेत शिवसेना भाजप युती तुटून महाविकास आघाडी उदयाला आली. यामुळे मुंबई महापालिका निवडणूक ही भाजपसाठी प्रतिष्ठेची आहे.
शिवसेनेचा महापालिकेच्या सत्तेला छेद देण्याचं लक्ष्य असल्याचं भाजपकडून सांगण्यात येतय. त्यामुळे निवडणूक जरी 6 प्रमुख पक्षांमधली असली तरी मुख्य स्पर्धा शिवसेना आणि भाजपमध्येच दिसेल.
 
आतापर्यंत कोणत्या आघड्या झाल्या आहेत का?
आतापर्यंत कोणत्याही आघाड्या अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेल्या नाहीत. मुंबई महापालिकेत सत्तेत असलेली शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस ही निवडणूक एकत्र लढविणार असल्याचे संकेत राष्ट्रवादी काँग्रेसकडून देण्यात आले आहेत.
राज्यात महाविकास आघाडीच्या निमित्ताने कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना हे तीन पक्ष एकत्र आले आहेत. प्रमुख विरोधी पक्ष भाजप असल्यामुळे तीनही पक्षांनी एकत्र निवडणूका लढवाव्यात अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मांडली होती. पण कॉंग्रेस महापालिका निवडणूक स्वबळावर लढणार असल्याचं कॉंग्रेस पक्षाकडून जाहीर करण्यात आले आहे.
भाजपने ही निवडणूक स्वबळावर लढणार असल्याचं जाहीर केलय. पण भाजप आणि मनसे या दोन पक्षांच्या युतीची चर्चा होत आहे. याबाबत अद्याप अधिकृतपणे काहीही जाहीर करण्यात आले नाही.
 
सध्याचं पक्षीय बलाबल किती आहे?
मुंबई महापालिकेत एकूण 24 प्रभाग आहे. 227 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे.
मुंबई महापालिकेत शिवसेना सर्वात मोठा पक्ष आहे. त्यामुळे महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. त्याच्या खालोखाल भाजप हा दुसर्‍या क्रमांकाचा पक्ष आहे.
महाविकास आघाडी सरकार स्थापन होण्याआधी शिवसेना भाजपची महापालिकेत युती होती म्हणून तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या कॉंग्रेसकडे विरोधी पक्षनेतेपद आहे. 2017 साली झालेल्या मुंबई महापालिकेतील निवडणूकीत 227 जागांपैकी,
 
शिवसेना - 84
भाजप - 82
कॉंग्रेस - 31
राष्ट्रवादी 9
समाजवादी पक्ष - 8
मनसे - 7
एमआयएम - 2
इतर - 3
या पक्षीय बलाबलामधून शिवसेनेने मनसेचे 6 नगरसेवक आपल्या पक्षात घेतले. त्याचबरोबर अपक्षांचा पाठिंबा मिळवून शिवसेनेने 93 चा आकडा गाठला.