सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: बुधवार, 16 जून 2021 (18:25 IST)

शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांचा शिवसेना भवनासमोरच राडा

मुंबईत सत्ताधारी शिवसेना आणि विरोधी पक्ष भारतीय जनता पक्ष यांच्यात तुफान राडा झाल्याचा प्रकार बुधवारी (16 जून) घडला.राम मंदिराच्या जमीन खरेदीदरम्यान भ्रष्टाचार करण्यात आल्याची टीका शिवसेनेच्या सामना या मुखपत्रात करण्यात आली होती.त्याचा निषेध म्हणून भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी निदर्शनं सुरू केली. दरम्यान शिवसेना कार्यकर्तेही त्यांच्यासमोर आले. त्यामुळे दोन्ही पक्षांतील कार्यकर्त्यांमध्ये जोरदार झटापट झाल्याचं दिसून आलं.

आंदोलनादरम्यान शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारीची घटनाही यादरम्यान दिसून आली.
विशेष म्हणजे, सत्ताधारी शिवसेनेचं मुख्यालय असलेल्या दादर परिसरातील शिवसेना भवनासमोरच हा सगळा प्रकार घडल्याने त्यामुळे राजकीय तणाव निर्माण झाल्याचं दिसून येत आहे.
यानंतर शिवसेना भवनासमोर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमायला सुरूवात झाली आहे. दुसरीकडे पोलिसांकडून भाजपच्या कार्यकर्त्यांची धरपकड करण्यात येत असून परिस्थिती काही प्रमाणात नियंत्रणात येत असल्याचं सांगितलं जातं.
 
काय आहे प्रकरण?
सामनामध्ये छापून आलेल्या एका लेखाचा निषेध करण्यासाठी भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी निदर्शनं करण्याचा निर्णय घेतला.त्यासाठी शिवसेना भवनासमोर निषेधाचे फलक घेऊन घोषणाबाजी सुरू केली.
हे निदर्शनास येताच शिवसेनेचे कार्यकर्तेही त्याठिकाणी जमा होऊ लागले.यादरम्यान दोन्ही बाजूंनी दगडफेक झाल्याची माहिती मिळत आहे. प्रकरण चिघळत चालल्याचं लक्षात येताच पोलिसांनी मध्यस्थी करत परिस्थिती नियंत्रणाखाली आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.पोलिसांकडून शिवसेना भवनात सुरक्षा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. तसंच आंदोलकांची धरपकड सुरू केली आहे.संपूर्ण परिसरात अजूनही तणावपूर्ण परिस्थिती असल्याचं दिसून येतं.

शिवसेनेकडून धाकदपटशा - प्रवीण दरेकर
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी या प्रकाराचा निषेध केला आहे. भाजप कार्यकर्ते शांततापूर्ण आंदोलन करत होते. पण ते आंदोलन चिरडून टाकण्यासाठी अशा प्रकारची धाकदपटशा शिवसेनेने केली, असा आरोप दरेकर यांनी केला.भाजप कार्यकर्ते चाल करून गेले, हे चित्र उभं केलं जात आहे. ते चुकीचं आहे.
राम मंदिरासंदर्भात आपली भूमिका मांडण्यासाठी एकत्र येत असताना त्यांच्यावर शिवसेनेने हल्ला केला, अशी प्रतिक्रिया दरेकर यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली आहे.

"भाजप शांततापूर्ण आंदोलन करत होते. हल्ला करण्याच्या प्रवृत्तीचे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते नाहीत. पोलिसांकडे याचे फुटेज आहेत, कुणाच्या हातात दगड होते, कुणी हल्ला केला, याचा निष्पक्ष तपास पोलिसांकडून करण्यात यावा. तपासातून सर्वच गोष्टी बाहेर येतील," असं दरेकर म्हणाले.

अॅक्शनला रिअॅक्शन मिळणारच - सचिन अहिर
शिवसेना नेते सचिन अहिर यांनी भाजपचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. भाजपनेच सुरुवातीला हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे शिवसेनेचं प्रत्युत्तर हे अॅक्शनला रिअॅक्शन स्वरुपातील होतं, असं स्पष्टीकरण अहिर यांनी दिलं आहे.
"शिवसेना भवनासमोर आंदोलन करण्याची गरज नव्हती. भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आत घुसण्याचा प्रयत्न करत होते, असा निरोप कार्यकर्त्यांना मिळाला होता. त्यामुळेच त्यांनी भाजप कार्यकत्यांना विरोध केला," असं अहिर म्हणाले."आम्ही कुठेही वाद केला नाही. ते आल्याचं लक्षात आल्यानंतर आम्ही त्यांचा प्रतिकार केला," असं कार्यकर्ते म्हणत आहेत.पक्ष कार्यालयात कुणी घुसण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याचा विरोध होणं स्वाभाविक आहे,असंही ते म्हणाले.