शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: मुंबई , गुरूवार, 17 जून 2021 (09:21 IST)

राम मंदिर जमीन घोळ्यावर शिवसेना-भाजपात ''महाभारत'', शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांची प्रचंड हाणामारी

शिवसेना भवनावर भाजप युवा मोर्चा मुंबईचे अध्यक्ष तेजिंदरसिंग तिवाना यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेविरोधात थेट हा मोर्चा काढला. अयोध्येतील श्री राम मंदिर बांधण्यासाठी भूसंपादनाबाबत खोटे आणि बनावट आरोप केल्याचा दावा करत भाजपने फटकार मोर्चा आयोजित केला. भाजप युवा मोर्चा मुंबईचे अध्यक्ष तेजिंदरसिंग तिवाना यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. मात्र, शिवसेना आमदार सदा सरवणकर हे शिवसैनिकांसह सेनाभवन परिसरात दाखल झाल्याने वातावरण तणावाचे झाले होते.
 
राम जन्मभूमीची जमीन खरेदीवरून वाद निर्माण झाला होता, त्यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली होती. शिवसेनेला राम जन्मभूमी मुद्द्यावर बोलण्याचा कोणताच अधिकार आता उरलेला नाही, अशी प्रतिक्रिया भाजपने दिली होती. या सर्व प्रकरणावर आज भाजप युवा मोर्चाकडून शिवसेना भवनावर आंदोलन करण्यात आले. यावेळी शिवसेना कार्यकर्तेही आक्रमक झाले होते.
 
हे खपवून घेणार नाही, प्रवीण दरेकरांचा इशारा
राज्याचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे हे केवळ पक्षाचे अध्यक्ष नाहीत. लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. पोलिसांच्या उपस्थितीत सरकार आमचं आहे आम्ही वाटेल ती दादागिरी करु, अशी भूमिका असेल तर ती खपवून घेतलं जाणार नाही, असा इशारा विधान परिषद विरोधीपक्षनेते प्रविण दरकेर यांनी दिला आहे. भाजप कार्यालयाबाहेरही आंदोलन झाली. आंदोलकांच्या अंगावर जाणार त्यांना मारहाण करणार, धाक दपटशाह करणं योग्य नाही, मुंबईची कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात येऊ शकते, असं प्रविण दरेकर म्हणाले. काही कार्यकर्त्यांची कपडे फाडली असल्याचं समोर आलं आहे.
 
खरं म्हणजे महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून किंबहुना शिवसेना ज्या पद्धतीने पोलिसांना समोर ठेवून गुंडागर्दी. दहशतवाद, मारहाण करण्याचा प्रयत्न करतेय, ते दुर्दैवी आहे. सत्तेचं कळस घेऊन अशाप्रकारच्या या गोष्टी महाराष्ट्रात कधीच झाल्या नाहीत. आमचा आंबेकर नावाच्या पदाधिकाऱ्यावर मारहाण झाली. उद्धव ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत. अशा प्रकारची गुंडागर्दी योग्य नाही. अशा प्रकारचा संघर्ष उभा राहिला तर त्याला वेगळं वळण मिळेल. पोलिसांनी नियंत्रण करायला हवं. पण सरकार आमचं आहे, असं म्हणून पोलिसांसमोर वाटेत ती दादागिरी करणं चुकीचं आहे आणि ते खपवून घेणार नाही, असं दरेकर म्हणाले.
 
अरविंद सावंत यांचं उत्तर
मुळात ज्यांना कायदा-सुव्यवस्था माहिती आहे त्यांनीच कायदा-सुव्यवस्था का बिघडवायची? हा विषय इतका जोरात गाजतोय. तर त्याची चौकशी व्हावी, इतकीच मागणी केली होती. यात दुखावण्यासारखं काय होतं. प्रत्येक गोष्टीवर स्टंटबाजी का करायची? क्रियेला-प्रतिक्रिया असतात. प्रत्येक प्रतिक्रिया संयमी नसतात. चौकशीला घाबरायचं कशाला? घाबरत नाहीत तर रस्त्यावर येण्याची गरज का भासली? असं शिवसेना खासदार अरविंद सावंत म्हणाले.
 
संजय राऊत यांनी केली होती भाजपवर टीका -
काही दिवसांपूर्वी राम जन्मभूमीची जमीन खरेदीवरून वाद निर्माण झाला होता. या संदर्भात खुलासा आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंग यांनी केला होता. या सर्व प्रकरणावर शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधत संघाच्या सरसंघचालकांनी यासंदर्भातले स्पष्टीकरण द्यावे, असं मत राऊत यांनी व्यक्त केलं होतं.
 
भाजप आक्रमक -
दरम्यान, संजय राऊत यांच्या या वक्तव्याविरोधात भाजपकडून कडाडून टीका करण्यात आली. शिवसेनेला राम जन्मभूमी विषयावरती बोलण्याचा आता नैतिकतेचा कोणताही अधिकार उरलेला नाही, अशी प्रतिक्रिया भाजपचे नेते आशिष शेलार यांनी दिली होती. आज त्याच पार्श्वभूमीवर भाजप युवा मोर्चा मुंबईकडून शिवसेना भवनावर आंदोलन करण्यात आले. त्यावेळीच शिवसैनिकांनी शिवसेना भवनासमोर मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. 
 
भाजपची पोलिसात तक्रार
भाजप कार्यकर्ते माहिम पोलीस ठाण्यात पोहोचले. विलास आंबेकर, अक्षता तेंडुलकर, सनी साठे, ऋषी शेळमकर या कार्यकर्त्यांवर झालेल्या हल्ल्याची तक्रार आणि गुन्हा दाखल करण्यासाठी भाजप कार्यकर्ते माहिम पोलीस ठाण्यात दाखल झाले. भाजपा मुंबई अध्यक्ष मंगल प्रभात लोढा हे सुद्धा माहिम पोलीस ठाण्यात दाखल पोहोचले.
 
शिवसेनेची मागणी काय?
राम मंदिरासाठी जगभरातून शेकडो कोटींचा निधी येत आहे. प्रभू रामचंद्राच्या नावानं एकही घोटाळा व्हायला नको. श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टमध्ये भाजपशी संबंधित सदस्य आहेत. शिवसेनेचा एकही सदस्य नाही. रामभक्तांच्या श्रद्धेला तडा जाईल असं काही घडू नये ही अपेक्षा असतानाच जमीन व्यवहाराचे संशायस्पद प्रकरण समोर आलं आहे. ते खरं की खोटं याचा लगेच खुलासा झाला तर बरं. ट्रस्टनं याबाबत खुलासा करायला हवा, अशी मागणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली होती.
 
राममंदिर कार्य हे राष्ट्रीय अस्मितेचे कार्य आहे. या कार्याची कोणी जाणीवपूर्वक बदनामी करत असेल तर त्यांच्यावरही कारवाई होणे गरजेचे आहे. अयोध्येतील राममंदिर हे रामभक्तांचा त्याग, संघर्ष व बलिदानातून उभे राहिले. हाच इतिहास आहे. एखाद्या घोटाळय़ाचा डाग त्या मंदिरावर पडत असेल तर पंतप्रधान मोदी, सरसंघचालक भागवतांना त्यात हस्तक्षेप करावाच लागेल, असा सल्ला शिवसेनेनं दिला आहे.
 
अंगावर याल तर शिंगावर घेऊच - महापौर किशोरी पेडणेकर
अंगावर याल तर शिंगावर घेऊच, असा इशारा मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी भाजपला दिला आहे. भाजप युवा मोर्चाच्यावतीने आज दादर येथील शिवसेना भवनवर फटकार मोर्चा काढण्यात आला होता. शिवसेना भवनवर मोर्चा काढणं कितपत योग्य याचंही उत्तर द्यावं, शिवसेना भवन येथील श्रद्धास्थानासमोर भाजपच्या कोणत्यातरी एका पोरानं उगाच ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला. तो शिवसैनिकांनी हाणून पाडला आहे. तुम्ही काहीही कराल आणि शिवसैनिक गप्प बसेल का? अशी प्रतिक्रिया पेडणेकर यांनी दिली आहे.