शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: गुरूवार, 17 जून 2021 (19:41 IST)

शालेय शिक्षकांना लोकल प्रवासाची परवानगी

राज्य शासनाकडून मोठी बातमी समोर आली आहे.  इयत्ता दहावीच्या मूल्यमापनाशी संबंधित मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना रेल्वेप्रवासाची परवानगी देण्यात आली आहे.
 
दहावी, बारावी परीक्षा रद्द झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या मुल्यांकनाचे काम सुरु असून अशावेळी शिक्षकांना शाळेत पोहोचण्यासाठी टॅक्सीचा पर्याय निवडावा लागतो. यासाठी होत असलेला खर्च टाळण्यासाठी शिक्षकांना रेल्वे प्रवासाची मुभा द्यावी अशी मागणी करण्यात आली होती. याबाबत शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत मुख्यमंत्री कार्यालयाकडे अर्ज पाठविला होता. सदर प्रस्तावास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिली आहे.
 
जर सरकार पास उपलब्ध करून देणार नसेल तर आम्ही दहावी, बारावीच्या निकालांवर बहिष्कार टाकू असा इशारा शिक्षक भारती संघटनेने दिला आहे.
 
इयत्ता दहावीचा निकाल वेळेत घोषित करण्यासाठी विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करणे, विद्यार्थिनिहाय माहिती राज्य मंडळाकडे पाठवणे, श्रेणी तक्ता तयार करणे, इत्यादी कामे करण्यासाठी शिक्षकांना शाळेत उपस्थित राहणे गरजेचे आहे. अशात शाळेत पोहोचण्यासाठी टॅक्सीचा पर्याय निवडणे शिक्षकांच्या खिशावर अतिरिक्त भार टाकत होतं. शालेय शिक्षण विभागाने शिक्षकांना रेल्वेप्रवासाची परवानगी देण्याबाबतचा प्रस्ताव मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठवण्यात आला होता. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दहावी मूल्यमापनाशी संबंधित शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना उपनगरीय रेल्वेप्रवासाची मुभा दिली आहे. 
 
शिक्षकांना उपनगरीय रेल्वेमध्ये लेव्हल 2 किंवा त्यापेक्षा खालील पास देण्यात येणार असून हे पास ऑनलाईन एसएमएस डाउनलोडच्या माध्यमातून वितरित करण्यात येतील. या निर्णयामुळे दहावी मूल्यमापनाच्या प्रक्रियेत संबंधित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना फार मोठा दिलासा मिळाला आहे.