रविवार, 25 सप्टेंबर 2022
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified शुक्रवार, 25 जून 2021 (08:42 IST)

त्र्यंबकेश्वर – टाळमृदुंगाच्या गजरात श्रीसंत निवृत्तिनाथांचा पालखी प्रस्थान सोहळा संपन्न

टाळमृदुंगाचा गजर, हरिनामाचा जयघोष आणी मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत पंढरपुर वारीसाठी जाणार्‍या श्रीसंत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचा प्रातनिधीक प्रस्थान सोहळा आज त्र्यंबकेश्वर येथे संपन्न करण्यात आला. आषाढी एकादशीच्या एक दिवस आधी म्हणजे १९ जुलै रोजी शिवशाही बसमधून नाथांची पालखी पंढरपूरकडे प्रस्थान करील.
 
प्रतीवर्षी निवृत्तिनाथांची पालखी वट पौर्णीमेस म्हणजे जेष्ठ वद्य प्रतिपदेस पंढरपुरकडे हजारो वारकरी भाविकांसमवेत प्रस्थान करते. मजल दरमजल करीत महिन्याभरात ही पालखी पंढरपूरला पोहचते. असा हा भक्तीपुर्ण सोहळा साजरा होत असतो. परंतु, याही वेळी कोरोनाच्या महामारीने सगळ्यांवरच‌ बंधने आली आहेत. मागील वर्षाप्रमाणे याही वर्षी शासनाने पायी पालखी वारीस बंदी घातली असल्या कारणे आज पालखी प्रस्थान  सोहळा मंदिरात मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत करण्यात आला. नाथांच्या पादुका आता १८ जुलै पर्यंत मंदिराच्या सभामंडपात पालखीत विराजमान राहतील, पालखी परंपरेनुसार नित्य पुजापाठ होतील. १९ जुलै रोजी पहाटे सहा वाजता पालखी वाजतगाजत कुशावर्त तिर्थावर आणुन तेथे नगराध्यक्षांच्या हस्ते पादुकांचा स्नानविधी होईल. त्यानंतर पालखी त्र्यंबकेश्वर मंदिरासमोर आणुन मंदिराचे बाहेर परंपरेनुसार अभंग गायन होईल. येथून शासन निर्देशानुसार दोन शिवशाही बसमधुन वारकर्‍यांसह नाथांच्या पादुका पंढरपुरकडे प्रस्थान करतील.
 
भाविकांनी गर्दी करु नये यासाठी सकाळ पासूनच मंदिरा बाहेर मोठा बंदोबस्त लावण्यात आला होता. बॅरीकेडींग लावुन मंदिरात जाण्याचा रस्ता बंद करण्यात आला होता. यादीप्रमाणे निमंत्रितांची नावे बघुनच मंदिरात प्रवेश दिला जात होता.सकाळी समाधीची नित्य पूजा झाल्यावर पालखीचे मानकरी ह.भ.प.मोहन महाराज बेलापुरकर व ह.भ.प. बाळकृष्ण महाराज डावरे, इतर मानाच्या दिंड्यांचे प्रतिनिधी आदिंना  देवस्थानच्या वतीने नारळ प्रसाद देण्यात आला. ह.भ.प. सुरेश महाराज गोसावी यांनी अभंग गायन केले. प्रस्थानाच्या  अभंगासह धन्य धन्य निवृत्तिदेवा हा अभंग म्हणण्यात आला.
श्रींच्या चांदिच्या पादुका व प्रतिमा समाधी जवळ ठेऊन आरती करण्यात आली. त्यानंतर उपस्थितांनी हरिनामाचा जयघोष केल्यावर नाथांची प्रतिमा व पादुका सजविलेल्या पालखित ठेऊन भजन किर्तन करीत पालखीची मंदिर ओवरीतच प्रदक्षिणा करण्यात आली.