शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 16 जून 2018 (11:57 IST)

पराक्रमाच्या गाथा सांगणारा 'फर्जंद' ठरतोय महत्त्वाचा

प्रेम कहाण्यांपेक्षा पराक्रमांच्या गाथा मांडणारे चित्रपट नेहमीच तरुणांचे आकर्षणबिंदू राहिले आहेत. भारताच्या महासत्तेसाठी तरुणांमध्ये पराक्रमाचा अंकुर फुलत राहायला हवा असतो. नेमके हेच काम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वाघ म्हणून संबोधला गेलेल्या कोंडाजी फर्जंद यांच्या पराक्रमावर आधारित चित्रपटाने केले आहे.
 
आत्मविश्वास, आत्मभान अन्‌ स्वाभिमानाची जाणीव करून देणार्‍या या फर्जंदचे वारे आता महाराष्ट्रातही वाहू लागले आहे.
 
पन्हाळा गड जिंकायचा तर मनसुबेबाज मराठी वाघच हवा असे म्हणणार्‍या छत्रपती शिवाजी महाराज व राजमाता जिजाऊ यांनी कोंडाजी फर्जंदला विडा दिला. विडा देतानाही जिजाऊंनी मावळ्यांचा जीव धोक्यात नको म्हणून चिंता व्यक्त केली, आणि यावेळी आम्ही रगत सांडायचं नाही तर मग काय उपयोग या देहाचा अशी कर्तव्यभावना व्यक्त करणारा कोंडाजी पाहिला की तरुणांच्या धमण्यांमधील रक्त सळसळ करायला लागते.
 
दिग्पाकर लांजेकर या तरुण दिग्दर्शकाबरोबरच सहनिर्माते संदीप जाधव, महेश जाऊरकर, स्वप्निल पोतदार यांनी अत्यंत कौशल्यानेकोंडाजी फर्जंद यांच्या पराक्रमी अंगाचा या चित्रपटातून आढावा घेतला आहे. विशेष म्हणजे चित्रपट पाहून बाहेर आलेला तरुण हा पुन्हा एकदा स्वतःच्या बाहूंकडे पाहतो आणि अवघ्या 60 मावळ्यांच्या जोरावर भव्य असा पन्हाळा जिंकणारा कोंडाजी त्यांच्यासमोर उभा राहतो.
 
वास्तविक या चित्रपटाने केवळ कोंडाजी यांचा पराक्रमच दाखविलेला नाही. पराक्रमाबरोबरच जात, धर्म, पंथ यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराज व राजमाता जिजाऊ यांनी माणूस किती महत्त्वाचा मानला हादेखील पैलू आणखी एकदा समोर ठेवला आहे. खरे तर फर्जंदसारखे चित्रपट तरुणांमध्ये आत्मविश्वास अन्‌ चेतना निर्माण करणारे आहेत. अशा चित्रपटांकडे मोठा उत्सव म्हणूनच पाहायला हवे आहे. बार्शीसकट महाराष्ट्रात प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचा प्रचार कोणावरही अवलंबून न राहता आता तरुणांनीच सुरु केला आहे.