मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 18 ऑगस्ट 2018 (15:46 IST)

भारत गणेशपुरे आणि सागर कारंडे प्रथमच एकत्र येणार सिनेमात !

विनोदाचा एक्का समजला जाणारा भारत गणेशपुरे आणि विनोदाची चौफेर फटकेबाजी करणारा सागर कारंडे हे सध्या मराठी मनोरंजन दुनियेतील अग्रगण्य विनोदवीर मानले जातात. कोणताही शो असो किंवा नाटक या दोघांची जुगलबंदी महाराष्ट्रातील तमाम मराठी प्रेक्षकांसाठी विनोदाची मेजवाणी असते. यात कमतरता होती ती मराठी चित्रपटाची. आजवर हे दोघे विनोदवीर सिनेमात एकत्र झळकले नव्हते. आता लवकरच भारत गणेशपुरे आणि सागर कारंडे हे व्हिजन कॉर्पोरेशन लि. प्रस्तुत, फुटप्रिंट मिडीया एंटरटेनमेंट, पवन शेठ, मोरेश्वर संखे निर्मित आणि संदीप मनोहर नवरे लिखित दिग्दर्शित “झांगडगुत्ता” या मराठी सिनेमातून प्रथमच एकत्र येणार आहेत.
 
भारत गणेशपुरे यांची वैदर्भीय बोली भाषेतून विनोदनिर्मिती आणि सागर कारंडे यांचे अवलियापण आता एकत्रित झांगडगुत्ता मधून बघायला मिळणार आहे. दिग्दर्शक नवरे सांगतात कि, ही विनोदाची जोडगोळी एकत्र आणण्यासाठी आम्ही जवळपास दीड वर्ष वाट बघितली अखेर योग जुळून आला. झांगडगुत्ता हा विदर्भातला शब्द आहे, त्याला सावळा गोंधळ असं आपण म्हणू शकतो. सिनेमाची गोष्ट ही विदर्भातील एका छोट्या गावात घडते. सागर हा उपवर मुलगा आहे तर भारत त्याचे वडील आहेत. अनेक वर्षांपासून प्रयत्न करून देखील सागरच्या लग्नाचे कुठेच काही ठरत नाही. विदर्भीय प्रश्नाचे मिश्कीलपणे पण प्रश्नाचे गांभीर्य न सोडता केलेला प्रयत्न म्हणजे झांगडगुत्ता. चित्रपट पूर्ण झाला असून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
 
भारत सांगतो कि, मला आणि सागरला एकत्र आणण्यासाठी दिग्दर्शकाने खूप वाट पाहिली. याचे मला खूप कौतुक वाटते. आम्ही आज नायक नसलो तरी देखील प्रेक्षक आमच्यावर प्रेम करतात आणि विशेष म्हणजे निर्माते आणि दिग्दर्शक आमच्यासाठी थांबून राहतात यासाठी निर्माते आणि दिग्दर्शक यांचे खूप खूप आभार.
सागर कारंडे सांगतो कि, झांगडगुत्ता...म्हणजे गडबड गोंधळ, अनेकांच्या गोंधळात माझा पण एक गोधळ आहे. यात माझी खूप वेगळी अशी भूमिका आहे, आजवर मी अशी भूमिका यापूर्वी कधीच केली नाही. या भूमिकेसाठी मला सतत एका माणसाला भेटून अभ्यास करावा लागला. ते नेमकं काय आहे ते तुम्हाला लवकरच समजेल. मला खात्री आहे कि विनोदाचा हा झांगडगुत्ता मराठी प्रेक्षक नक्कीच डोक्यावर घेतील.