शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 28 मे 2019 (12:31 IST)

गौरी किरणची ‘पुष्पक’ भरारी

‘पुष्पक विमान’ या सुपरहिट चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण करणाऱ्या गौरी किरणला (गौरी कोठावदे) राज्य सरकारच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ५६ व्या मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्यात ‘सर्वोत्कृष्ट प्रथम पदार्पण’ हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. कै. रंजना देशमुख उत्कृष्ट प्रथम पदार्पण अभिनेत्री हा पुरस्कार तिला मिळाला आहे. सुबोध भावे लिखित आणि वैभव चिंचाळकर दिग्दर्शित ‘पुष्पक विमान’ चित्रपटात सुबोध भावे, मोहन जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. २०१८ साली आलेल्या पुष्पक विमानने तिकिटबारी सहित प्रेक्षकांच्या मनावरही अधिराज्य गाजवले होते. वरळी येथील नॅशनल स्पोर्टस् क्लब ऑफ इंडिया येथे मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान सोहळा अतिशय दिमाखदार पद्धतीने पार पडला.
 
मुळची पत्रकार असलेली गौरी सध्या मनोरंजन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत आहे. या पूर्वी अनेक कार्यक्रमांचे सूत्रसंचालन, नाटक, शॉर्ट फिल्म आणि मालिकांमध्येही तिने अभिनय केलेला आहे. तसेच स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘स्पेशल ५’ या क्राईम शोमध्येही गौरी मुख्य पात्र रंगवत आहे. राज्य सरकारचा उत्कृष्ट प्रथम पदार्पण पुरस्कार प्राप्त केलेल्या अभिनेत्री आज यशाच्या शिखरावर पोहोचलेल्या आहेत. यामध्ये मुक्ता बर्वे (चकवा – २००४), वीणा जामकर (बेभान – २००५), सोनाली कुलकर्णी (बकुळा नामदेव घोटाळे – २००८), राधिका आपटे (घो मला असला हवा – २००९), नेहा पेंडसे (अग्निदिव्य – २०१०) आणि मृण्मयी देशपांडे (लेक माझी गुणाची – २०११) यांचा समावेश आहे. त्यात आता गौरी किरणच्या नावाचीही भर पडली आहे.
 
लहानपणापासूनच अभिनयाची आवड असणाऱ्या गौरीचे बालपण, शिक्षण कोकणातील दापोलीमध्ये गेले आहे. अभिनयात करिअर करण्याच्या विचाराने मुंबईत आलेल्या गौरीला सुरुवातीच्या काळात बराच संघर्ष करावा लागला. ‘पुष्पक विमान’च्या निमित्ताने गौरीने पुष्पक भरारी घेतली.
 
'गेल्या वर्षभरात पुष्पक विमानामुळे प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळाले. या चित्रपटात स्मिता या कोकणी मुलीची व्यक्तिरेखा रंगवली होती. तेव्हापासून मला फणस असे टोपणनाव पडले आहे. हे सगळं कौतुक या पुरस्काराच्या निमित्ताने सार्थकी लागलंय, असं मला वाटतंय. माझ्या पहिल्याच चित्रपटाला पुरस्कार मिळाल्यामुळे आनंद तर होतोयच, त्याबरोबर येणाऱ्या काळात देखील चांगलं काम करण्याची जबाबदारी आली आहे. हा पुरस्कार मी माझे कुटुंबीय, पुष्पक विमान टिम, प्रेक्षक आणि माध्यम क्षेत्रातील माझ्या सर्व मित्रांना समर्पित करत आहे'.
 – गौरी किरण, अभिनेत्री