सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 8 नोव्हेंबर 2022 (14:03 IST)

GODAVARI : 'गोदावरी'च्या निमित्ताने जितेंद्र जोशी - निखिल महाजन यांची हॅट्रिक

godavari cinema
'गोदावरी'च्या निमित्ताने जितेंद्र जोशी - निखिल महाजन यांची हॅट्रिक
'नदीसाठी नदीकाठी' अशी टॅगलाईन असणाऱ्या 'गोदावरी' चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. कथेमध्ये 'गोदावरी'ची नेमकी काय भूमिका आहे, हे जाणून घेण्याची प्रेक्षकांना प्रचंड उत्सुकता लागून राहिली आहे. मात्र याचे उत्तर प्रेक्षकांना ११ नोव्हेंबरला मिळणार आहे. तत्पूर्वी 'गोदावरी'च्या निमित्ताने दिग्दर्शक निखिल महाजन आणि जितेंद्र जोशी या जोडीची हॅट्रिक होत आहे. यापूर्वी निखिल महाजन आणि जितेंद्र जोशी यांनी ‘बाजी’ हा चित्रपट आणि ‘बेताल’ ही वेबसीरिज केली होती आणि 'गोदावरी'मधून ही जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यामुळे या चित्रपटातही प्रेक्षकांना काहीतरी दर्जेदार पाहायला मिळणार हे नक्की!
 
'हॅट्रिक'बद्दल दिग्दर्शक निखिल महाजन म्हणतात, '' जितेंद्र जोशीसोबत काम करताना नेहमीच मजा येते. तो एक प्रगल्भ कलाकार आहे. या आधी आम्ही एकत्र काम केल्यामुळे मला काय हवे आहे आणि तो काय करू शकतो, याची आम्हाला पूर्ण कल्पना आहे. आमची हॅट्रिक होण्यामागचे मुख्य कारण आहे , निशिकांत कामत. त्यांच्यामुळेच 'गोदावरी' चित्रपटाचा उगम झाला. 'गोदावरी'ने आजवर अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त केले. आता गोदावरी आपल्या देशात प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे.''
 
जितेंद्र जोशी म्हणतात, '' याआधी दोनदा निखिलसोबत एकत्र काम केल्याने त्याच्या कामाची पद्धत मला माहित आहे आणि यामुळेच तिसरा प्रोजेक्टही मी त्याच्यासोबत करू शकलो. एखादा अनन्यसाधारण विषय प्रेक्षकांसमोर कसा सादर करायचा, त्याची मांडणी कशी करायची, याची त्याला उत्तम जाण आहे. म्हणूनच त्याच्या चित्रपटांमध्ये नेहमीच वैविध्य असतं. यापुढेही मला निखिलसोबत काम करायला नक्कीच आवडेल.''
 
जिओ स्टुडिओज प्रस्तुत, ज्योती देशपांडे, ब्लू ड्रॉप फिल्म्स आणि जितेंद्र जोशी पिक्चर्स निर्मित या चित्रपटात जितेंद्र जोशी, नीना कुळकर्णी, संजय मोने, प्रियदर्शन जाधव, गौरी नलावडे आणि विक्रम गोखले यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तुमच्या आमच्या कुटुंबाची गोष्ट सांगणारा हा एक कौटुंबिक चित्रपट आहे. 'गोदावरी'मध्ये आपल्याला 'जून' या राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्कारप्राप्त चित्रपटातील कलाकारांची झलकही दिसणार आहे. या निमित्ताने नेहा पेंडसे, संस्कृती बालगुडे आणि सिद्धार्थ मेनन हे पुन्हा एकदा एकत्र पडद्यावर झळकणार आहेत.
 
‘गोदावरी’या चित्रपटाने आतापर्यंत अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांत हजेरी लावली आहे.
Published By -Smita Joshi