गोदावरी’ चित्रपट या दिवशी होणार प्रदर्शित; त्याची वैशिष्ट्ये जाणून घ्या
गोदावरी चित्रपटाची कथा देखील अशाच एका नदीची आहे. निशिकांत हा माणूस आपल्या कुटुंबापासून दूर भटकला आहे, अस्तित्वहीन आयुष्य जगतो आहे. या सगळ्या गुंतागुंतीच्या प्रश्नांची उत्तरं त्याला गोदावरी नदीजवळच मिळतात, जिचा त्याने इतकी वर्षे तिरस्कार केला. अशी या चित्रपटाची मध्यवर्ती भूमिका. प्रख्यात अभिनेते जितेंद्र जोशी यांचा हा बहुचर्चित सिनेमा गोदावरी लवकरच चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. त्याची तारीख जोशी यांनी जाहीर केली आहे. नोव्हेंबर महिन्याच्या ११ तारखेला हा सिनेमा प्रदर्शित होणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.
या सिनेमाच्या निमित्ताने अभिनेते जितेंद्र जोशी यांनी आपले दिवंगत मित्र निशिकांत कामत यांना गोदावरी नदीच्या काठावर चित्रित करण्यात आलेल्या या विशेष व्हिडिओमध्ये त्यांच्या दुसऱ्या पुण्यतिथीनिमित्त श्रद्धांजली वाहिली आहे. त्याचा व्हिडीओ देखील त्यांनी त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. यात जितेंद्र जोशी आपल्या भावना व्यक्त करताना म्हणाले, जेव्हा निशिकांत आम्हाला सोडून गेला तेव्हा खूप एकटं पडल्यासारखं वाटत होतं. मी त्याला प्रत्येक कथेत शोधत होतो. त्याच्या नसण्यावर प्रश्नचिन्ह उभे करत होतो. त्याचं असणं माझ्या अवतीभोवती हवं होतं आणि तेच शोधत असताना मी गोदावरीशी बोलू लागलो. तिथेच मला निशिकांत सापडला. आजही मला त्याची आठवण येते.
गोदावरी ही निशिकांतची (जितेंद्र जोशी) कथा आहे. एक असा माणूस जो आपल्या कुटुंबापासून दूर भटकला आहे, अस्तित्वहीन आयुष्य जगतो आहे आणि या सगळ्या गुंतागुंतीच्या प्रश्नांची उत्तरं त्याला गोदावरी नदीजवळ मिळतात ज्याचा त्याने इतकी वर्ष तिरस्कार केला. जिओ स्टुडिओ प्रस्तुत, ब्ल्यू ड्रॉप फिल्म्स आणि जितेंद्र जोशी पिक्चर्स निर्मित गोदावरी हा चित्रपट येत्या ११ नोव्हेंबर रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात जितेंद्र जोशीने प्रमुख भूमिका साकारली असून यात विक्रम गोखले, नीना कुलकर्णी, संजय मोने आणि प्रियदर्शन जाधव असे प्रतिभावंत कलाकार आहेत.
सिनेमाच्या प्रोमोमध्येच आपल्याला कथा दर्जेदार असल्याचे लक्षात येते. या प्रोमोमधील संवाद हृदय हेलावणारे आहेत. जितेंद्र एका बाबाला म्हणत असतात, अरे, नदीच पाणी पिऊ नकोस, घाण आहे, त्यावर त्या बाबाने दिलेलं उत्तर हे थेट काळजाला भिडत. तर परंपरा काय आहे ? या त्यातील छोट्या मुलीने विचारलेल्या निरागस प्रश्नावर प्रियदर्शन याने दिलेलं सरळ सोप्प उत्तर यावरून सिनेमाचं कथानक दर्जेदार असणार यात शंका नाही. त्यात जितेंद्र जोशी सारखा कलाकार हा जीव ओतून त्याच्या भूमिकेला न्याय देणार यात प्रश्नच नाही. आत्तापर्यंत गोदावरीला अनेक भारतीय तसेच जागतिक पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे. अलीकडेच, या चित्रपटाची २०२१ च्या भारतातील सर्वोत्तम १० चित्रपटांमध्ये निवड करण्यात आली.
न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिव्हल २०२२ मध्ये ओपनिंग फिल्म म्हणून निवड करण्यात आली होती. महत्त्वाचे म्हणजे आयएफएफआय २०२१ मध्ये जितेंद्र जोशीने सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा सिल्व्हर पिकॉक पुरस्कार जिंकला, तर निखिल महाजन यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकासाठीचा विशेष ज्युरी पुरस्कार मिळाला. पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०२२ मध्ये, निखिल महाजन यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार आणि शमीन कुलकर्णी यांना सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर एवी प्रफुल्ल चंद्रा यांना विशेष ज्युरीचा सर्वोत्कृष्ट संगीत पुरस्कार मिळाला. याचबरोबर गोदावरीचा जागतिक प्रीमियर व्हँकुव्हर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल २०२१ आणि एशिया पॅसिफिक प्रीमियर न्यूझीलंड इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल २०२१ मध्ये झाला होता.