शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 10 मे 2019 (13:41 IST)

सिद्धार्थ जाधवचा 'लग्नकल्लोळ'

लग्न हे एक सुंदर कोडं आहे. दिसायला कितीही सोपे असले तरी जितके सोडवू तितके कमी असते.... लग्न हा प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील अविस्मरणीय असा क्षण असतो. लग्नानंतरचे सुगीचे, आनंदाचे असे  नव्याचे नऊ दिवस संपले की, सुरुवात होते ती खऱ्या आयुष्याला. सामान्य माणसापासून ते नावाजलेल्या व्यक्तीपर्यंत सर्वच लोक हे या अनुभवातून जातात. याच संकल्पनेवर आधारित 'लग्नकल्लोळ' हा धमाल विनोदी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सिद्धार्थ जाधव, भूषण प्रधान, मयुरी देशमुख यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाचा अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत मुहूर्त सोहळा मुंबईतील सेंट रेजीस येथे दिमाखात संपन्न झाला. यावेळी हिंदी चित्रपटसृष्टीतील नावाजलेले दिग्दर्शक अब्बास - मस्तान यांनी चित्रपटाची घोषणा केली. तर विनोदाचे बादशाह जॉनी लिवर यांनी चित्रपटाला पहिली क्लॅप  दिली. या प्रसंगी अब्बास - मस्तान यांनी या चित्रपटाला शुभेच्छा देत, हसणे हे एक उत्तम औषध असल्यामुळे नेहमी सर्वांनी हसत राहावे. तुम्हाला हसत ठेवण्यासाठीच 'लग्नकल्लोळ' हा धमाल विनोदी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमात कसलेल्या कलाकारांची फौज असल्याने हा नक्कीच धमाकेदार चित्रपट असेल. मुळात चित्रपटाच्या दिग्दर्शकांना आम्ही अनेक वर्षांपासून ओळखतो. त्यांची कामाप्रती असलेली आत्मीयता आम्हाला माहीत आहे. त्यामुळे हा चित्रपट सर्व रसिकांना हसवण्यात नक्कीच यशस्वी होईल. मराठी सिनेमांमध्ये होणारे नवनवीन प्रयोग नक्कीच उल्लेखनीय आहे. हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस पडेल, यात शंका नाही. आमच्याकडून हा चित्रपटाला खूप खूप शुभेच्छा". नावावरूनच हा चित्रपट लग्न या विषयावर आधारित असेल हे तर नक्की. या सिनेमातून लग्न हा विषय एका आगळ्यावेगळ्या रूपात प्रेक्षकांसमोर येणार आहे.
मयूर तिरमखे फिल्म्स निर्मित आणि मोहम्मद बर्मावाला दिग्दर्शित 'लग्नकल्लोळ' हा चित्रपट येत्या काही महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. मोहम्मद बर्मावाला यांनी यापूर्वी दिग्दर्शक अब्बास -मस्तान यांच्यासोबत सुमारे तीन दशके काम केले आहे. त्यांनी बाजीगर, बादशाह, रेस आणि अशा अनेक सुपरहिट चित्रपटांसाठी सह-दिग्दर्शक आणि कार्यकारी निर्माता म्हणून काम पहिले आहे. या चित्रपटात भारत गणेशपुरे, प्रिया बेर्डे, प्रतीक्षा लोणकर,सुप्रिया कर्णिक, विद्या करंजीकर, अमिता कुलकर्णी, संतोष तिरमखे आणि डॉ. आशिष गोखले हे कलाकार देखील महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. डॉ. मयूर तिरमखे, अण्णासाहेब रामचंद्र तिरमखे, मंगलाबाई अण्णासाहेब तिरमखे यांनी निर्मितीची धुरा सांभाळली आहे तर, चित्रपटाचे लेखन जितेंद्र परमार यांनी केले असून प्रफुल- स्वप्नील यांनी संगीत दिले आहे. मंदार चोळकर आणि जय अत्रे यांनी चित्रपटातील  गाण्यांना शब्दबद्ध केले आहे. तर मग तयार राहा 'लग्नाचा कल्लोळ' पाहण्यासाठी.