शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 21 जानेवारी 2020 (16:05 IST)

मृण्मयी प्रतिभा देशपांडे लिखित आणि दिग्दर्शित ‘मन फकिरा’चा पहिला टिझर प्रदर्शित...

‘मन फकिरा’ हा रोमँटिक ड्रामा असलेला चित्रपट ‘व्हॅलेन्टाईन्स डे’च्या मुहूर्तावर १४ फेब्रुवारी २०२० रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत असून प्रख्यात मराठी अभिनेत्री मृण्मयी प्रतिभा देशपांडे या सिनेमाच्या माध्यमातून दिग्दर्शनात पदार्पण करत आहे. सिनेमाच्या निर्मात्यांनी नुकताच या सिनेमाचा पहिला टिझर सोशल मीडियावर प्रदर्शित केला.
 
‘मन फकिरा’मध्ये सुव्रत जोशी, सायली संजीव, अंजली पाटील आणि अंकित मोहन यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ‘प्रेम...आहे, नाही, बहुतेक, वगैरे...’ ही या सिनेमाची टॅगलाईन आहे. तिच्याबाबत उत्कंठा लागली असतानाच नव्याने प्रदर्शित झालेला टिझर या टॅगलाईनबद्दल अंधुकसा खुलासा करतो आणि प्रेक्षकाची उत्कंठा अधिक ताणली जाते. लग्न...त्यांच्यातील प्रेम...त्यांचा संसार... त्यात येणारे ते दोघे... आणि पुन्हा मग विस्कटलेपण असा आशय या टिझरमधून समोर येतो. चित्रपटाची कथा हटके आहे याची खात्री पटते, पण ती नेमकी काय आहे, हे समोर येणार आहे ते चित्रपट प्रदर्शित होईल तेव्हाच!
 
पर्पेल बुल इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमटेड आणि स्मिता फिल्म प्रॉडक्शन्सच्या यांची प्रस्तुती असलेला ‘मन फकीरा’ या चित्रपटाची निर्मिती एस. एन. प्रॉडक्शन्स आणि स्मिता विनय गानु, नितीन प्रकाश वैद्य, ओम प्रकाश भट्ट, सुजय शंकरवार आणि किशोर पटेल यांनी केली असून चित्रपटाची सहनिर्मिती तृप्ती कुलकर्णी आणि प्रणव चतुर्वेदी याची आहे.
 
'मन फकिरा' या सिनेमाच्या टिझरमध्ये, सुव्रत जोशी हा ‘भूषण’ तर सायली संजीव ही ‘रिया’ ही पात्रे साकारत आहेत. टिझरमध्ये सुव्रत जोशी आणि सायली संजीव यांच्याबरोबर अंजली पाटील, अंकित मोहन हे कलाकारदेखील दिसतात. भूषण-रिया यांचे मराठमोळ्या ‘कांदापोहे’ पद्धतीने लग्न होते आणि त्यानंतर सगळे काही सुरळीत सुरु असताना एका रात्री दोघांचेही भूतकाळ समोर येतात. हे दोघे या सर्व गोष्टीला कसे समजुतदारणे सामोरे जातात आणि पुढे नक्की काय निर्णय घेतात...हे पाहण्यासाठी लवकरच प्रदर्शित होणाऱ्या ट्रेलरची वाट पहावी लागणार आहे. पण या टिझरमधून प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे, हे नक्की! 
मृण्मयी म्हणते, “मी लिहीलेला आणि दिग्दर्शित केलेला माझा पहिला सिनेमा 'मन फकिरा’चा पहिला टिझर आम्ही सोशल मीडियावर प्रदर्शित केला आहे. मी या चित्रपटाबद्दल प्रचंड उत्सुक आहे. तुम्ही आजपर्यंत मला एक अभिनेत्री म्हणून भरभरून प्रेम दिले आणि यापुढे एक दिग्दर्शिका म्हणूनही प्रेम कराल. ‘मन फकिरा’लाही भरभरून प्रेम द्याल हा विश्वास आहे. आज प्रदर्शित झालेला टिझर प्रेक्षकांना नक्की आवडेल याचीही मला खात्री आहे.”