थरारक 'जजमेंट'
काही दिवसांपूर्वीच ज्योत्स्ना फिल्म्स प्रॉडक्शन निर्मित 'जजमेंट' या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. नावावरूनच हा थरारपट असणार याचा अंदाज बांधला जात असतानाच आता या चित्रपटाचे टिझर पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर लाँच झाले. पोस्टरमध्ये स्विमिंगपूलच्या बाजूला रक्त पडलेले दिसत आहे. यावरून या चित्रपटात काहीतरी रोमांचक पाहायला मिळणार, याचे 'जजमेंट' आपण लावू शकतो. या ठिकाणी नेमके काय घडले आहे, हे जाणण्यासाठी मात्र प्रेक्षकांना चित्रपट प्रदर्शित होण्याची प्रतीक्षा करावी लागेल. निवृत्त सनदी अधिकारी नीला सत्यनारायण यांच्या 'ऋण' कादंबरीवर आधारित या चित्रपटात तेजश्री प्रधान, मंगेश देसाई, श्वेता पगार, माधव अभ्यंकर, सतीश सलागरे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. डॉ. प्रल्हाद खंदारे आणि हर्षमोहन कृष्णात्रेय यांनी चित्रपटाची निर्मिती केली असून समीर रमेश सुर्वे यांचे दिग्दर्शन आहे.