गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By

प्रेमाचा गुलाबी रंग चढवणारे 'बबन' सिनेमातील गाणे प्रदर्शित

'प्रेम' म्हणजे एकमेकांसाठी झुरणं, दोघांना एकमेकांबद्दल वाटणारी अनाहूत ओढ म्हणजे प्रेम...! अशा या प्रेमाच्या बेधुंद लहरीत रंगणाऱ्या व्हेलेंटाईन डे निमित्ताने, आगामी बबन सिनेमातील 'जगण्याला पंख फुटले' हे प्रेमगीत खास प्रेमीजनांसाठी लाँच करण्यात आले. राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त 'ख्वाडा' फेम दिग्दर्शक भाऊराव नानासाहेब कऱ्हाडे दिग्दर्शित आणि लिखित 'बबन' या आगामी सिनेमातील हे गाणे असून, द फोक कोनफ्लूअन्स इंटरटेंटमेंट प्रस्तुत आणि चित्राक्ष फिल्म्स निर्मित या सिनेमाची विठ्ठलराव कऱ्हाडे, प्रमोद भास्कर चौधरी, मोनाली संदीप फंड आणि भाऊसाहेब शिंदे यांनी निर्मिती केली आहे. नुकतेच या सिनेमाचे दादर येथील प्लाझा सिनेमागृहात मोठ्या दिमाखात पोस्टर आणि गाण्याचे लाँच करण्यात आले. ग्रामीण भागातील प्रेमकहाणी दाखवणारा हा सिनेमा येत्या २३ मार्च रोजी सर्वत्र प्रदर्शित होत असल्याची घोषणादेखील याचदरम्यान करण्यात आली. सिनेमाच्या संपूर्ण स्टारकास्टच्या उपस्थितीत प्रदर्शित झालेल्या या सिनेमातील हे गाणे, प्रेमाच्या गुलाबी रंगाची उधळण करते. प्रेमाची परिभाषा मांडणाऱ्या या गाण्याचे लेखन प्रोफेसर डॉक्टर विनायक पवार यांनी केले असून, संगीतदिग्दर्शक हर्षीत अभिराजची चाल असलेल्या या गाण्याला अन्वेशा दत्ता गुप्ता आणि ओंकारस्वरूप या जोडगोळीने आवाज दिला आहे.  
'बबन' हा सिनेमा एका ग्रामीण युवकावर आधारीत जरी असला तरी, आजच्या तरुण पिढीचे भावविश्व आणि त्यांची महत्वाकांक्षा यात पाहायला मिळणार आहे. तसेच 'बबन'चे पोस्टर आणि गाणे पाहिले असता तारुण्यात उमलणारी प्रेमाची पालवीदेखील यात दिसून येत असल्यामुळे हा सिनेमा प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची परिपूर्ण मेजवानी ठरणार आहे.
'ख्वाडा' अभिनेता भाऊसाहेब शिंदेची यात प्रमुख भूमिका असून, त्याच्यासोबत गायत्री जाधव ही नवोदित अभिनेत्री 'बबन' मध्ये झळकणार आहे. बबन आणि कोमलची हळुवार फुलणारी प्रेमकहाणी दाखवणारा हा सिनेमा भाऊराव नानासाहेब कऱ्हाडे यांच्या साचेबद्ध आखणीत तयार झाला असल्याकारणामुळे एका रोमांचक प्रेमकथेचा आस्वाद प्रेक्षकांना चाखता येणार आहे.