गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 14 ऑगस्ट 2018 (10:58 IST)

'पार्टी'चा धम्माल ट्रेलर लॉच

'मैत्रीसाठी काहीही...' असे म्हणणारे अनेकजण जेव्हा नोकरी धंद्याला लागतात, तेव्हा मैत्रीच्या आणाभाका ते कधीच मागे विसरतात ! भविष्याच्या तरतुदीसाठी आपापल्या रस्त्यावर लागलेली हि सर्व मित्र मग केवळ आठवणीच्या कुपीत किंवा एका फोटोच्या चौकटीतच सीमित राहतात. अश्या या सर्व मित्रांना पुन्हा एकदा एकत्र येण्यास प्रवृत्त करणारा 'पार्टी' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. सचिन दरेकर दिग्दर्शित या 'पार्टी'चा नुकताच लोअर परेल येथे रंगतदार ट्रेलर लाँच करण्यात आला. धम्माल पार्टी मूडने उपस्थितांना खुश करून टाकणाऱ्या या कार्यक्रमात, 'पार्टी' चित्रपटाच्या संपूर्ण टीमने उपस्थिती लावली होती.
मैत्रीचा हँगओव्हर चढवणाऱ्या या ट्रेलरमध्ये सुव्रत जोशी, अक्षय टंकसाळे, स्तवन शिंदे, रोहित हळदीकर या चार मित्रांची धम्माल-मस्ती आणि त्यांची लव्हस्टोरी आपणास पाहायला मिळते. पण त्यासोबतच कालांतराने विभक्त झालेल्या या चौकडींचे दुखणंदेखील यात दिसून येते. तसेच, प्राजक्ता माळी आणि मंजिरी पुपालादेखील यात दिसून येत आहेत. शिवाय या ट्रेलरमधील 'घराचा व गाडीचा हफ्ता भरताना मैत्रीचादेखील हफ्ता भरायचा असतो, हे विसरून जातो आपण' हा संवाददेखील प्रेक्षकांना भावूक करून टाकतो.
आपापल्या आयुष्यात आणि संसारात गुंग झाल्यानंतर मागे राहून गेलेल्या जुन्या मित्रांची आठवण 'पार्टी' सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांना करून देतो. धम्माल विनोदाची परिपूर्ण मेजवानी देणाऱ्या या सिनेमाचा ट्रेलर पाहताना, 'पार्टी' हा सिनेमा प्रेक्षकांना हसवून लोटपोट करणारा आहे, याचा अंदाज येतो. हासू आणि आसू आणणारा हा सिनेमा प्रेक्षकांसाठी कम्प्लीट इंटरटेंटमेंट पेकेज घेऊन येत आहे. नवविधा प्रोडक्शन निर्मित आणि  सुपरहिट 'बकेट लिस्ट' सिनेमाचे निर्माते डार्क हॉर्स प्रोडक्शन्स यांची प्रस्तुती असलेला हा सिनेमा, महाराष्ट्रातील तमाम मित्रांचे नाते आणखीन घनिष्ट करण्यासाठी येत्या ७ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होत आहे.