विनोदी मल्टीस्टार्स घालणार ‘वाघेऱ्या’चा धुडगूस
विनोदी मल्टीस्टारर्सचा बंपर धमाका घेऊन येणारा ‘वाघेऱ्या’सिनेमा येत्या १८ मे रोजी सिनेप्रेक्षकांना खळखळून हसवण्यास येत आहे. गौरमा मीडिया अँड एंटरटेंटमेंट प्रा. लि. आणि वसुधा फिल्म प्रोडक्शनची निर्मिती असलेल्या या सिनेमाचा नुकताच सोशल नेट्वर्किंग साईटवर पोस्टर लाँच करण्यात झाला. या सिनेमाच्या पोस्टरवर एक गाव दिसत असून, गोगलधारी बकरी आपल्याला पाहायला मिळते. तसेच पोस्टरवरील ‘सांभाळून या राव, येडं झालंय गाव' या टॅगलाईनमुळे हा सिनेमा विनोदयुक्त मेजवानीचा आनंद प्रेक्षकांना देणार, याचा अंदाज येतो. सुप्रीम मोशन पिक्चर्सचे लालासाहेब शिंदे आणि राजेंद्र शिंदे यांची प्रस्तुती असलेल्या या सिनेमाचे लेखन तसेच दिग्दर्शन समीर अशा पाटील यांनी केले आहे. मे महिन्याच्या कडक उन्हात हास्याचा थंडावा घेऊन येत असलेला हा वाघे-या प्रेक्षकांसाठी पर्वणीच ठरणार आहे. कारण, मराठीसृष्टीतील मातब्बर आणि अनुभवी विनोदवीर पहिल्यांदाच या सिनेमाच्या निमित्ताने एकत्र पाहायला मिळणार आहेत. किशोर कदम, भारत गणेशपुरे, हृषिकेश जोशी, सुहास पळशीकर, नंदकिशोर चौघुले, लीना भागवत आणि छाया कदम या कलाकारांचा यात समावेश असून, हि सर्व मिळून काय धुडगूस घालणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.