रंगकर्मी रंगमंचावर अभिव्यक्ती सादर करतो ...
रंगकर्मी रंगमंचावर अभिव्यक्ती सादर करतो ... आपले विचार आपली मांडणी करतो ... प्रेक्षक अभिव्यक्ती ग्रहण करतो ... उत्तम श्रोता बनतो ... आपल्या विचारांची सांगड घालतो ... आणि आपल्या जाणिवेला एका ध्रुवापर्यंत नेण्याचा प्रयत्न करतो ... हा प्रवास कुठपर्यंत आला आहे हे जाणून घेण्यासाठी थिएटर ऑफ रेलेवन्सने प्रेक्षकांच्या मनात उमटणाऱ्या पडसादेला संवाद प्रक्रियेत आणण्याची सुरवात 26 वर्षापासूनच केली आहे ... कारण थिएटर ऑफ रेलेवन्स साठी प्रेक्षक हा सर्वात पहिला आणि सशक्त रंगकर्मी आहे ... नाटक सादर होते त्या नाटकाची समीक्षा काही जाणकार समीक्षक करतात ... पण ही समीक्षा खरंच परिपूर्ण असते का? किंवा समग्र असते का ? पण यापेक्षा नाटक पाहताना आलेल्या अनुभूतीला लगेच प्रकट करणारे प्रेक्षक या नाटकाच्या समग्रतेचे दृष्टिकोन उघडतात ही खरी समीक्षा
मुळात समीक्षण म्हणजे गुणदोषांचे परीक्षण आणि मूल्यमापन करणे ... नाटकाला या मूल्यमापनाच्या पलीकडे नेणे जास्त जरुरी आहे ... नाटक याच्या पलीकडे आहे
आणि थिएटर ऑफ रेलेवन्स नाटकाला या मूल्यमापनाच्या पलीकडे पोहोचवते आणि व्यक्तीच्या अनुभवांच्या सीमा तोडून एक समज निर्माण करते ...
नाटकानंतर प्रेक्षकांशी संवाद करण्याची आणि त्यांची अनुभूती जाणण्याची प्रक्रिया थिएटर ऑफ रेलेवन्स मध्ये सतत सुरू असते ...
नाट्यप्रस्तुती नंतर प्रेक्षकांना रंगमंचावर बोलावण्यात येते आणि विषयांशी संबंधित विचार प्रक्रिया संवादाच्या माध्यमातून होते, याने प्रेक्षक आणि कलाकार यांतील दरी संपुष्टात येऊन एक अनन्य साधारण नाते निर्माण होते. प्रेक्षक केवळ टाळ्या वाजवून निघून न जाता, TOR च्या तत्वानुसार रंगकर्मी होऊन जातात आणि प्रक्रिया पुढे नेण्यास सहाय्यक ठरतात.
अशा प्रकारे TOR ची नाटके पाहून अनेक प्रेक्षक कनेक्ट झाले आहेत आणि प्रक्रिया पुढे नेण्याच्या उद्देशाने एकत्र येऊन सहयोगाच्या दृष्टीने स्वतः पुढाकार घेऊन उभे राहिले आहेत. हा सहयोग केवळ आर्थिक नसून सामाजिक, वैचारिक, राजकिय व व्यक्तिगत स्वरूपात देखील मिळाला आहे...
आजचा प्रथितयश कलाकारही आपल्या कलात्मक प्रस्तुती नंतर पडद्यामागे लपतो ... पण थिएटर ऑफ रेलेवन्स ह्या पडद्याला प्रेक्षक आणि कलाकारांमध्ये आणूच देत नाही ... कलात्मक प्रस्तुती नंतर झालेल्या संवादाने विचारांच्या पडद्यालाही अलगद दूर केले जाते ...
28 सप्टेंबर 2012 पासून छेडछाड क्यों या नाटकाच्या पहिल्या प्रयोगापासून मी याचा अनुभव घेत आले आहे ... केवळ भारतीय नाही तर भारताबाहेरील रंगमंचावरही हीच प्रक्रिया थिएटर ऑफ रेलेवन्स ने कायम ठेवली आहे ...विषय आणि त्याची प्रेक्षकांना असलेली गरज याचे एक नाते या संवादातून सतत समोर येते ... युरोपला ड्रॉप बाय ड्रॉप वॉटर या नाटकाच्या प्रस्तुतीनंतर प्रेक्षक संवादाने ही ताकद मला प्रामुख्याने जाणवली ... कारण या संवादानंतर प्रेक्षकांमध्ये पाण्याच्या खाजगीकरणाचे मुद्दे लक्षात आले आणि तिथल्या म्युनिसिपालटी मध्ये आंदोलन होऊन खाजगीकरण तीन ते सहा महिने पुढे ढकलले ...
हा थिएटर ऑफ रेलेवन्स चा पुढाकार आज मराठी रंगभूमीवर दिसून येतो .. आणि मनापासून आनंद होतो ... प्रेक्षकांचा या सक्रिय सहभागानेच प्रेक्षक आणि रंगभूमीचे नाते अधिक घट्ट होणार .. मराठी रंगभूमी समृद्ध होण्यासाठी आम्ही सतत असेच पुढाकार घेत राहणार
अश्विनी नांदेडकर (स्मायली)