मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 12 जानेवारी 2019 (14:33 IST)

स्वप्नीलची 'मी पण सचिन'साठी खडतर मेहनत

मराठी सिनेसृष्टीतला चॉकलेट बॉय आणि आपल्या सगळ्यांचा लाडका स्वप्नील जोशी "मी पण सचिन" या आगामी चित्रपटात क्रिकेटपटूच्या भूमिकेत दिसणार आहे. या नवीन वर्षात स्वप्नील आपल्याला एका दमदार आणि त्याची चॉकलेट बॉयची इमेज तोडणाऱ्या अशा वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमाचा टिझर, सिनेमाचं गाणं आणि पोस्टर यामध्ये दिसत असलेला स्वप्नीलचा वेगळा 'लुक' आणि वेगळा आवाज ऐकून तो जरा त्याच्या 'कन्फर्ट झोन' मधून बाहेर येऊन काहीतरी नवीन करतोय हे नक्की. पण हे जेवढे सोपे दिसते, वाटते तेवढे सोपे नाहीये. कारण अशा स्वरूपाच्या भूमिकेसाठी कलाकारांना प्रचंड मेहनत घ्यावी लागते. आता स्वप्नीलचेच बघा ना ...स्वप्नीलकडे श्रेयश पहिल्यांदा स्क्रिप्ट घेऊन गेला तेव्हा श्रेयशला फक्त स्वप्निलच्या वजनाची चिंता होती. कारण स्वप्नीलचे वजन त्यांच्या भूमिकेसाठी लागणाऱ्या वजनापेक्षा जास्त होते. यासाठी श्रेयश आणि स्वप्नील यांनी अथक मेहनत घेऊन वजन कमी केले. 'मी पण सचिन' सिनेमात स्वप्नीलने तरुण आणि मध्यमवयीन अशा दोन प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. त्यामुळे त्याला या भूमिकांसाठी  तब्बल १५ किलो वजन कमी करावे लागले. यासाठी त्याने कडक डाएट आणि न चुकता भरपूर व्यायामही केला. स्वप्नीलने या चित्रपटातील भूमिकेसाठी मुख्यत्वे शारीरिक तंदरुस्ती कडे जास्त लक्ष दिले. कारण खेळाडूची भूमिका निभावत असताना त्याला खेळाडूसारखेच दिसणे, वागणे, चालणे गरजेचे होते यासाठी स्वप्नीलने एखाद्या खेळाडूची बॉडी लँग्वेज कशी असावी याचा अभ्यास केला आणि त्यासाठी कसरत सुरु केली. तीन  महिने स्वप्नीलला श्रेयशने पुण्यात ठेऊन घेतले. आणि रोज श्रेयश त्याच्या कडून व्यायाम आणि क्रिकेट प्रॅक्टिस करून घ्यायचा. स्वप्नील सकाळी फिज़िकल फिटनेस आणि दुपारी क्रिकेट प्रॅक्टिस करायचा. यासोबतच क्रिकेटर ची भूमिका करण्यासाठी त्याला  क्रिकेट हा खेळ शिकणे आवश्यक होते. आणि म्हणूनच क्रिकेट प्रशिक्षकांकडून तब्बल तीन महिने त्याने क्रिकेटचे प्रशिक्षण घेतले. स्वप्नील सकाळी तीन तास कसरत आणि दुपारी तीन तास क्रिकेट प्रॅक्टिस करायचा. शिवाय या खेळातील बारकावे, नियम हे सर्व त्याने आत्मसाद केले. जेणेकरून चित्रपटात तो कुठेही खोटा दिसू नये किंवा त्याचा खेळ खोटा वाटू नये. अगदी उन्हात, पावसात सुद्धा त्याने प्रॅक्टिस केली. आणि त्याच्या मेहनतीची पोचपावती म्हणजे तो कॅमेरासमोर अगदी खरा क्रिकेटर असल्यासारखा सहज वावरला.
 
यावर स्वप्नील म्हणतो "हे सर्व करणे एवढी मेहनत घेणे आमचे कामच आहे. कारण जर प्रेक्षकांना हे सर्व पडद्यावर पाहताना कुठेही खोटेपणा जाणवता कामा नये. प्रेक्षक एवढा विश्वास ठेऊन चित्रपट पाहायला जातात त्यांचा हिरमोड व्हायला नको. आणि या मायबाप प्रेक्षकांसाठी आम्ही जी मेहनत घेतो हे आमचे कर्तव्यच आहे. कारण आज आम्ही सर्व कलाकार जे काही थोडे फार आहोत ते फक्त याच प्रेक्षकांमुळे. आणि या सर्व मेहनतीचे श्रेय मी श्रेयश जाधवला देतो" 
'मी पण सचिन' हा चित्रपट इरॉस इंटरनॅशनल, एव्हरेस्ट इंटरटेंटमेन्ट प्रस्तुत आणि गणराज असोसिएटची निर्मिती असलेला हा चित्रपट येत्या १ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होत आहे. नीता जाधव, गणेश गीते, संजय छाब्रिया आणि निखिल फुटाणे  या चित्रपटाचे निर्माता असून श्रेयश जाधव यांनी लेखन आणि दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. या चित्रपटाच्या निमित्याने श्रेयश जाधव हे दिग्दर्शनात देखील पाऊल टाकत आहे. श्रेयश जाधव यांचा चित्रपट म्हटल्यावर प्रेक्षकांना काहीतरी नवीन पाहायला मिळेल, यात शंका नाही. इरॉस इंटरनेशनलद्वारे 'मी पण सचिन' या चित्रपटाचे जागतिक स्तरावर देखील वितरण केले जाणार आहे.