पहिल्याच दिवसात 'गर्ल्स'च्या ट्रेलरला लाखोंनी व्ह्यूज
विशाल देवरूखकर दिग्दर्शित 'गर्ल्स' या चित्रपटाच्या पहिल्या पोस्टरपासूनच या चित्रपटाबद्दल सर्वांना उत्सुकता होती. 'बॉईज', 'बॉईज २' सारखे जबरदस्त चित्रपट दिल्यांनतर आता 'गर्ल्स'मध्ये सुद्धा काहीतरी धमाकेदार पाहायला मिळणार, याची सर्वांनाच खात्री होती आणि मुळात 'गर्ल्स' या नावातच सर्व काही सामावले आहे. त्यामुळे या चित्रपटाबद्दल विशेष उत्सुकता होती. 'गर्ल्स' चित्रपटाच्या एक एक गोष्टी गुलदस्त्याबाहेर आल्यानंतर आता नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर लाँच झाला. पहिल्याच दिवशी या ट्रेलरला सहा लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले असून युट्यूबवर हा ट्रेलर सध्या ट्रेंडिंगमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे. प्रेक्षकांकडून या ट्रेलरला पसंतीची पोचपावती मिळत आहे.
'एव्हरेस्ट एंटरटेनमेंट', 'कायरा कुमार क्रिएशन्स' प्रस्तुत आणि 'अ कायरा कुमार क्रिएशन्स प्रॉडक्शन'च्या अंतर्गत 'गर्ल्स' या चित्रपटाची निर्मिती नरेन कुमार यांनी केली आहे. तर चित्रपटाचे लेखन हृषिकेश कोळी यांनी केले असून अमित भानुशाली यांनी सहाय्यक निर्माता म्हणून काम पाहिले आहे. हा चित्रपट येत्या २९ नोव्हेंबर रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे.