नेहा झाली मालामाल !
बिगबॉस मराठी सीजन २ ची स्पर्धक नेहा शितोळेसाठी ऑगस्ट महिन्याची खूप छान सुरुवात झाली आहे. कारण, या महिन्यात एकामागोमाग अशा अनेक सुखावह गोष्टी नेहाच्या बाजूने घडत असल्याचे दिसून येत आहे. त्यातील एक मोठी गोष्ट म्हणजे, घरात पाहुणे म्हणून आलेल्या 'ये रे ये रे पैसा २' सिनेमाच्या टीमद्वारे नेहाला आगामी 'येरे येरे पैसा ३' मध्ये काम करण्याची नामी संधी चालून आली आहे! नुकत्याच झालेल्या या भागात अभिनेता प्रसाद ओकने या सिनेमाच्या तिसऱ्या सिक्वेलमध्ये नेहाचा समावेश करण्यात आला असल्याची अधिकृत घोषणा केली. नेहासाठी ही सुखद गोष्ट असून, बिगबॉसच्या घरात असतानाच जर तिला अशी संधी चालून येत असेल, तर स्पर्धा जिंकल्यानंतर तिच्याकडे असे किती कामे चालून येतील...!
ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या विकेंड च्या डावातील 'फ्रेंडशिप डे' स्पेशल भागात तिचा खास मित्र आणि 'सेक्रेड गेम'मधील सहकलाकार 'जितेंद्र जोशी'ने तिला मैत्रीच्या शुभेच्छा देत खुश केले होते. त्यानंतर झालेल्या कॅप्टनशिपच्या टास्कमध्ये दर्जेदार कामगिरी करत नेहाने एक आठवड्याची इम्युनिटीदेखील आपल्या खिशात घातली आहे. इतकेच नव्हे तर, इतर टास्कमध्येदेखील नेहाने चांगली कामगिरी केली असल्यामुळे, यावेळचा 'विकेंड' तिच्यासाठी खूप खास ठरणार आहे. तसेच १५ आॅगस्ट रोजी प्रदर्शित होत असलेल्या 'सेक्रेड गॅम'च्या दुसऱ्या सीजनमधूनही ती लोकांच्या भेटीस येत असल्यामुळे हा आॅगस्ट महिना तिच्यासाठी मालामाल असणार आहे!