रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 14 सप्टेंबर 2019 (12:32 IST)

टक्कर टाळण्यासाठी घेतला 'हा' निर्णय

आता 'गर्ल्स' होणार २९ नोव्हेंबरला प्रदर्शित  
एकाच दिवशी दोन मोठे चित्रपट प्रदर्शित होणार असतील तर एखाद्या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्याच्या घटना बॉलिवूडमध्ये अनेकदा घडल्या आहेत. हीच पद्धत आता हळूहळू मराठी सिनेसृष्टीतही रूढ होऊ लागली आहे. येत्या १५ नोव्हेंबरला दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित 'फत्तेशिकस्त' आणि विशाल देवरुखकर दिग्दर्शित 'गर्ल्स' हे दोन मोठे चित्रपट प्रदर्शित होणार होते. मात्र बॉक्स ऑफिसवर होणारी ही टक्कर टाळण्यासाठी दोन्ही चित्रपटाच्या निर्मात्यांनी परस्पर समन्वयाने एका चित्रपटाची तारीख पुढे ढकलली आहे. त्यामुळे आता १५ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणारा 'गर्ल्स' आता २९ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
 
दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित 'फत्तेशिकस्त' हा सिनेमा मागीलवर्षी हिट ठरलेल्या 'फर्जंद' या चित्रपटाचा पुढील भाग आहे. तर 'बॉईज' आणि 'बॉईज २' सारखे धमाकेदार चित्रपट देणारे दिग्दर्शक विशाल देवरुखकर यांचा तरुणाईला आकर्षित करणारा 'गर्ल्स' हा तिसरा चित्रपट आहे. हे दोन्ही चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित होणार होते, मात्र 'गर्ल्स'चे निर्माता नरेन कुमार आणि 'फत्तेशिकस्त'चे ए. ए. फिल्म्सचे अनिल थडानी आणि आलमंड्स क्रिएशनचे अजय आरेकर यांनी संगनमताने एका चित्रपटाची तारीख पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता 'फत्तेशिकस्त' आपल्या ठरलेल्या दिवशीच प्रदर्शित होणार असून 'गर्ल्स'च्या प्रदर्शनाची तारीख बदलण्यात आली आहे.
 
दोन्ही चित्रपटांच्या टीमने अथक परिश्रम करून चित्रपट तयार केला आहे आणि एकाच दिवशी हे चित्रपट प्रदर्शित झाले तर त्याच्या फटका दोन्ही चित्रपटांना बसेल, त्यामुळेच हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाबाबत 'गर्ल्स'चे निर्माता नरेन कुमार म्हणाले, '' हे दोन्ही चित्रपट वेगळ्या धाटणीचे आहेत आणि या दोन्ही चित्रपटांचा प्रेक्षकांनी आनंद घ्यावा, असे आम्हाला वाटते. 'गर्ल्स' हा एक निखळ मनोरंजनात्मक चित्रपट आहे तर 'फत्तेशिकस्त' हा ऐतिहासिक चित्रपट आहे. दोन्ही चित्रपटांचे विषय वेगळे आहेत, मुद्दे वेगळे आहेत. त्यामुळे या दोन्ही चित्रपटांबद्दल प्रेक्षकांना उत्सुकता आहे. याव्यतिरिक्त चित्रपटसृष्टी ही एका परिवारासारखी आहे. त्यामुळे या निर्णयाचा दोन्ही चित्रपटांना निश्चितच फायदा होईल.'' तर या निर्णयावर 'फत्तेशिकस्त'चे अनिल थडानी आणि अजय आरेकर म्हणाले, ''तुमच्या समोर अनेक पर्याय उपलब्ध असताना एकमेकांच्या पायात पाय अडकवणे चुकीचे आहे. आम्ही 'गर्ल्स' चित्रपटांच्या निर्मात्यांशी चर्चा करून हा निर्णय घेतला आहे. यात दोन्ही चित्रपटांचा फायदा आहे. 'फर्जंद' चित्रपटानंतर 'फत्तेशिकस्त' हा चित्रपट सुद्धा मराठ्यांनी गाजवलेल्या एका मोहिमेबद्दल आहे. प्रेक्षकांना मोठया पडद्यावर ही शौर्यगाथा बघायला नक्कीच आवडेल. असेच 'गर्ल्स' चित्रपटाबद्दलही आहे. विशाल देवरूखकरांच्या मागील चित्रपटांना मिळालेला प्रेक्षकांचा प्रतिसाद बघता हा चित्रपट सुद्धा नक्कीच प्रेक्षकांचे पुरेपूर मनोरंजन करणारा असेल, यात शंका नाही." त्यामुळे निर्मात्यांच्या या निर्णयाचा फायदा प्रेक्षकांनाही नक्कीच होणार असून प्रेक्षक हे दोन्ही चित्रपट बघू शकतील.
'फत्तेशिकस्त'मध्ये चिन्मय मांडलेकर, मृणाल कुलकर्णी, अनुप सोनी आणि इतर अनेक नामवंत कलाकारांचा समावेश आहे. तर 'गर्ल्स' या चित्रपटातील कलाकार अद्याप गुलदस्त्यातच आहेत.