शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 19 एप्रिल 2023 (20:14 IST)

PHAKAAT - रेट्रो मूड ऑन करणारे 'फकाट'मधील तुझी माझी जोडी' प्रेमगीत प्रेक्षकांच्या भेटीला

tujhi majhi jodi
श्रेयश जाधव दिग्दर्शित 'फकाट' चित्रपटातील सगळे कलाकार समोर आल्यानंतर या चित्रपटातील एक जबरदस्त गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. 'तुझी माझी जोडी' असे गाण्याचे बोल असणाऱ्या हर्षवर्धन वावरे आणि कस्तुरी वावरे यांनी गायले असून शांताराम नांदगावकर आणि हर्ष, करण, आदित्य या 'ट्रिनिटी ब्रदर्स' यांनी या गाण्याला शब्दबद्ध केले आहे. तर या गाण्याला 'ट्रिनिटी ब्रदर्स'चेच संगीत लाभले आहे. हेमंत ढोमे आणि अनुजा साठे यांच्यावर चित्रित करण्यात आलेले हे गाणे ऐंशीच्या दशकात नेणारे आहे. उडत्या चालीचे हे गाणे ऐंशीच्या काळातील सुपरहिट गाणे असून ते रिक्रिएट करण्यात आले आहे. हे रेट्रो लूकमधील गाणे पाहाताना आणि ऐकताना संगीतप्रेमींना त्याच काळात गेल्याचा अनुभव येईल.
 
या गाण्याबद्दल ट्रिनिटी ब्रदर्स म्हणतात,  "अनेक जुनी गाणी पुनर्रचित करून, ती नव्याने प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचे सध्या फॅड आहे. आम्हीही या गाण्यातून असाच प्रयत्न केला आहे. परंतु यात आम्ही या गाण्याला नवीन स्वरूपात न आणता अगदी जसेच्या तसे समोर आणले आहे, अगदी कलाकारांचे नृत्य, पेहरावही तसेच आहे. अर्थात काही छोटे बदल आहेत, जे प्रेक्षकांना दिसतीलच. रेट्रो फील देण्याचा आमचा हा प्रयत्न प्रेक्षकांना नक्कीच आवडेल.''
 
वक्रतुंड एन्टरटेनमेंट्स, गणराज स्टुडिओ प्रस्तुत, निता जाधव निर्मित, 'फकाट' या चित्रपटात हेमंत ढोमे, सुयोग गोऱ्हे, अविनाश नारकर, अनुजा साठे, रसिका सुनील, कबीर दुहान सिंग, नितीश चव्हाण, किरण गायकवाड आणि महेश जाधव यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हायली कॉन्फिडेन्शिअल धिंगाणा असलेला हा चित्रपट येत्या १९ रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.