सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By

दृष्टिबाधितांनाही अनुभवता येणार "प्रभो शिवाजी राजा" ची चरित्रगाथा !

अ‍ॅनिमेशन हे आजच्या पिढीतील बालकांपर्यंत पोहचणारं सर्वाधीक जिव्हाळ्याचं माध्यम आहे. परंतु या माध्यमांतून केवळ निरुपयोगी मनोरंजनच होताना दिसते. तेव्हा अ‍ॅनिमेशनच्या माध्यमांतून भारतीय राष्ट्रपुरुषांची शिकवण नव्या पिढ्यांना कळावी या दृष्टिने गणराज असोसिएट्स प्रस्तूत तसेच  इन्फिनिटी व्हीज्युअल आणि मेफाक निर्मित  'प्रभो शिवाजी राजा' हा मराठी सचेतनपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होत आहे.  सर्वसामान्य मुलांसोबतच शिवरायांचा इतिहास दृष्टिबाधित मुलांनाही कळावा यासाठी "प्रभो शिवाजी राजा" या चित्रपटाची नरीमन पाॅइंट येथील यशवंतराव चव्हाण ऑडीटोरियममध्ये, महाराष्ट्राचे उर्जामंत्री  मा.ना. चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या हस्ते खास ध्वनिफितीचे अनावरण करण्यात आले.     
 
नुकत्याच पार पडलेल्या या ध्वनीफित प्रकाशन कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे,शिवाजी महाराजांवर आधारित चित्रपट सृष्टितील या पहिल्याच सचेतनपटाच्या स्वतंत्र ध्वनीफितीचा कमला मेहता, नैब आणि हैपी होम या शाळेतील दृष्टीबाधित मुलांनी मनसोक्त आनंद लुटला. यशस्वीरित्या पार पडलेल्या या स्तुत्य उपक्रमाविषयी बोलताना सिनेमाचे दिग्दर्शक निलेश मुळे असे सांगतात की, 'प्रभो शिवाजी राजा हा केवळ चित्रपट नसून एक चरित्रपट आहे. भारताच्या भावी पिढ्यांवर सुयोग्य संस्कार व्हावेत, तसेच त्यांना देशाचे सशक्त, समृद्ध आणि गौरवशाली भविष्य घडवण्यासाठी प्रेरित करता यावे हा या चित्रपट निर्मितीमागील उद्देश आहे. सर्वसामान्य मुलांसोबतच शिवरायांची गाथा  दृष्टिबाधित पर्यंतही पोहचावी या उद्देशाने "प्रभो शिवाजी राजा" या चित्रपटाची ध्वनीफित निर्माण करण्यात आली आहे. यामुळे दृष्टिबाधित मुलांनाही शिवचरित्राची अनुभूती घेता येवून त्यांना नवी प्रेरणा मिळेल अशी आशा आहे'.
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जंयंतीच्या पार्श्वभुमीवर अ‍ॅनिमेशनपटाच्या माध्यमांतून शिवप्रेमींना येत्या १६ फेब्रुवारी रोजी राजांचे अनोखे रुप अनुभवता येणार आहे. "प्रभो शिवाजी राजा" हा चित्रपट टू डि अ‍ॅनिमेशन च्या माध्यमातुन साकारण्यात आला असल्यामुळे मराठी चित्रपट स्रुष्टितील हा नवा आविष्कार ठरणार आहे. समीर मुळे यांची कथा, ख्यातनाम इतिहासकार निनाद बेडेकर यांचे संवाद आणि पटकथेचे सहाय्यक लेखन, शंकर महादेवन, स्वप्निल बांदोडकर, नंदेश उमप, उदेश उमप, श्रीरंग भावे यांची गाणी, स्वराधीश डॉ.भरत बलवल्ली यांचे संगित, नंदू घाणेकर यांचे पार्श्वसंगित, विजय धारणे यांचे कार्यकारी संचालन या सर्वांनी हा अ‍ॅनिमेशनपट समृद्ध झालेला आहे.
 
जेष्ठ इतिहासकारांच्या अभ्यासाचा, अनेक बखरींचा, गडकोटांचा, त्यांच्या वास्तुरचनेचा तसेच अनेक ऐतिहासिक दस्तऐवजांच्या तटस्थ अभ्यासातून साकार झालेल्या या सचेतनपटाला चार वर्षांच्या मोठ्या आव्हानात्मक प्रयत्नांतून जावे लागले.
 
दिग्गज गायकांचे स्वर व सुप्रसिद्ध कलाकारांच्या संवादाने नटलेला हा सिनेमा प्रेक्षकांसाठी नवअनुभूती ठरणार आहे.  कारण, मराठी चित्रपट सृष्टीतील दिग्गज कलाकार सचिन खेडेकर, उमेश कामत, उदय सबनीस, अविनाश नारकर, उज्ज्वला जोग, सुषमा सावरकर, विजू माने, कुषल भद्रिके इत्यादिंचा आवाज या अ‍ॅनिमेशनपटाला लाभला आहे.