बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Updated : शुक्रवार, 23 ऑगस्ट 2019 (15:04 IST)

सुयोग झालाय सातारचा सलमान!

लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच चित्रपटसृष्टीच्या जादुई दुनियेची भुरळ असते. सामान्य माणसं तर या झगमगत्या दुनियेला आणि त्यात वावरणाऱ्या कलाकारांना आपल्या रोजच्या जीवनाचाच एक भाग समजतात, काही तर आपला आदर्श मानतात. कलाकारांबद्दल एक वेगळ्याच प्रकारचे आकर्षण सर्वांमध्ये पाहायला मिळते. अगदी नकळतपणे आपण आपल्या आजूबाजूच्या लोकांना विशिष्ट  कलाकारांच्या नावाची ओळख द्यायला लागतो जसे, अहमदनगरचा अनिल कपूर, शहापूरचा शाहरुख, नाशिकचा नागार्जून, बदलापूरचा बच्चन, मालेगावची माधुरी, तसाच हा आहे सातारचा सलमान!
 
'सातारचा सलमान' ही गोष्ट आहे एका छोट्या गावात राहणाऱ्या अमित काळभोर या सामान्य मुलाच्या स्वप्नांची आणि जिद्दीची. छोट्या गावात राहूनही मोठे स्वप्न पाहणारा अमित आपल्या सगळ्यांच्याच भेटीला येत आहे, 'सातारचा सलमान' या सिनेमातून.
टेक्सास स्टुडियोजचे प्रकाश सिंघी निर्मित आणि हेमंत ढोमे दिग्दर्शित  'सातारचा सलमान' हा आगामी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मराठी सिनेसृष्टीला 'बघतोस काय मुजरा कर', 'ये रे ये रे पैसा २' असे सुपरहिट चित्रपट दिल्यानंतर हेमंत ढोमे दिग्दर्शित 'सातारचा सलमान' या चित्रपटातही काहीतरी धमाल आणि नाविन्यपूर्ण पाहायला मिळेल. यासोबतच 'सातारचा सलमान' या चित्रपटाच्या लेखनाची धुरा देखील त्यानेच सांभाळली आहे.
नावाप्रमाणेच हटके असणारा हा चित्रपट प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करणार यात शंका नाही.  'सातारचा सलमान' मधील 'सलमान' नक्की कोण असणार, याची उत्सुकता सर्वानाच होती. याबद्दल मागील अनेक दिवसांपासून तर्कवितर्क लावले जात होते. मात्र अखेर यावरून पडदा हटवण्यात आला असून गर्लफ्रेंड, बसस्टॉप, आम्ही बेफिकर, शेंटिमेंटल, कृतांत यांसारख्या चित्रपटांमधून आपल्या समोर आलेला सुयोग गोऱ्हे 'ही' भूमिका साकारत आहे. सुयोग या सिनेमात अमित काळभोर ही व्यक्तिरेखा साकारत असून अमितला त्याच्या गावाने 'साताऱ्याचा सलमान' ही हटके ओळख दिली आहे. अमितला ही ओळख का आणि कशी दिली यासाठी थोडी वाट पाहावी लागेल. 
'सातारचा सलमान' या चित्रपटाचे पोस्टर आणि सुयोगचा हा लुक दिग्दर्शक हेमंत ढोमे याने नुकताच सोशल मीडियावर केला आहे.
 
‘सातारचा सलमान’ हा चित्रपट ११ ऑक्टोबर २०१९ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाच्या शीर्षकावरून हेमंत त्याच्या मागील चित्रपटाप्रमाणेच यावेळीही प्रेक्षकांसाठी एक मजेशीर विषय घेऊन येत आहे हे नक्की.