वेशभूषाकार सायली सोमण यांनी दिला 'मिस यू मिस्टर'च्या ग्लॅमरस जोडीला वेगळा टच
काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर ‘मिस यु मिस्टर’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला, या ट्रेलरला अल्पावधीतच १ मिलियन व्हूज देखील मिळाले. मुख्य म्हणजे चित्रपटामध्ये सिद्धार्थ चांदेकर आणि मृण्मयी देशपांडे हे दोघांची वेशभूषा खूप कमाल दिसत आहेत याच कारण म्हणजे सायली सोमण यांनी केलेली वेशभूषा. सायली यांनी या अगोदर ‘हंपी’, ‘बापजन्म’, ‘धप्पा’, बॉईज, बॉईज 2, ‘वर खाली दोन पाय’, अशा चित्रपट आणि नाटकांसाठी वेशभूषा केली असून आता त्यांनी ‘मिस यू मिस्टर’साठी वेशभूषा केली आहे.
दिग्दर्शक समीर जोशी यांचा बहुप्रतीक्षित ‘मिस यू मिस्टर’ हा चित्रपट येत्या २८ जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात सिद्धार्थ चांदेकर आणि मृण्मयी देशपांडे हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. ‘मिस यू मिस्टर’ या चित्रपटाचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे वेशभूषाकार सायली सोमण यांनी सिद्धार्थ चांदेकर आणि मृण्मयी देशपांडे यांची केलेली वेशभूषा. या चित्रपटात हे दोघेही खूपच ग्लॅमरर दिसत असून यामुळेच प्रेक्षकांना या चित्रपटाची उत्कंठा लागून राहिली दीपा त्रासि आणि सुरेश म्हात्रे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून केवल हांडा, संदीप भार्गव आणि मनीष हांडा यांनी सह-निर्मिती केली आहे. थ्री आय क्रिएटिव्ह फिल्म्सच्या सहकार्याने मंत्रा व्हिजन या कंपनीने ‘मिस यू मिस्टर’ या चित्रपटाची प्रस्तुती केली आहे.
‘मिस यू मिस्टर’ हा एक कौटुंबिक मनोरंजनात्मक चित्रपट असून तो नातेसंबंधांवर बेतलेला आहे. या चित्रपटात इतरही अनेक आघाडीचे मराठी कलाकार दिसणार आहेत. त्यांत राजन भिसे, सविता प्रभूणे, अविनाश नारकर, राधिका विद्यासागर आदींचा समावेश आहे.
या चित्रपटाच्या अनुभवाविषयी बोलताना सायली सोमण म्हणाल्या की ‘'मिस यु मिस्टर' या सिनेमासाठी मृण्मयी देशपांडे आणि सिद्धार्थ चांदेकर या दोघांनी खूप मेहनत घेतली आहे. त्यांनी या चित्रपटासाठी आपले वजन कमी केले आहे, आपल्याकडे वेशभूषा करताना एखादा प्रसंग शूट करून झाला की ते सातत्य पुन्हा राखण्यासाठी तेच कपडे पुढचा प्रसंग शूट होतो त्यावेळी पुन्हा परिधान करावे लागतात. पण या दोघांच्या मापांमध्ये मला फरक जाणवला की लगेच आम्हाला त्यांचे कपडे अल्टर करावे लागतं असतं. मृण्मयीने सिनेमामध्ये आधुनिक आणि नवीन लग्न झालेल्या मुलीचे पात्र साकारले आहे, त्यामुळे तिची वेशभूषा करताना साडी आणि कुर्ता याबंरोबर अनेक प्रकारच्या कपड्यांचा समावेश केला आहे. त्यामुळे तिची ही व्यक्तिरेखा खूपच खूप सोबर, ग्लॅमरर दिसली आहे. त्याचबरोबर सिद्धार्थ चांदेकर याची वेशभूषा करताना सिद्धार्थने परदेशी स्थलांतर झालेल्या मुलाची भूमिका साकारली आहे. त्यासाठी मी त्या प्रकारचे खूप कपडे बघितले जे त्या पात्राला शोभून दिसतील’.
त्या पुढे म्हणाल्या की ‘मृण्मयी देशपांडे आणि सिद्धार्थ चांदेकर या दोघांची केमेस्ट्री खूप चांगली जमली आहे, या दोघांनी चित्रपटामध्ये खूप चांगली वेशभूषा कॅरी केली आहे त्यामुळे स्क्रीनवर पण या दोघांची पात्र खूप चांगली रेखीव ठळकपणे दिसली आहेत’.
सायली सोमण यांचे 'मिस यु मिस्टर' या चित्रपटानंतर वेशभूषा केलेले ‘गर्ल्स’ आणि 'खारी बिस्कीट' या नावाचे दोन सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.
सायली सोमण फॅशन ट्रेंडबाबत सांगतात,सध्याची जी लोकांमध्ये फॅशन आहे ती खूप कॅन्टेम्पररी आहे. येणाऱ्या काळात परत ९०च्या काळातल्या कपड्यांची स्टाइल पुन्हा ट्रेंडमध्ये येणार आहे. ग्लोबल वार्मिंगमुळे लोकांचा आता नैसर्गिक वस्त्रांकडे जास्त रस दिसणार आहे.