बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 18 जून 2019 (14:38 IST)

सिद्धार्थ जाधव वधूच्या शोधात

मराठीसोबतच हिंदी सिनेसृष्टीतही आपल्या अभिनयाची छाप पाडणारा सिद्धार्थ जाधव नेहमीच वेगवेगळ्या भूमिकांमध्ये, लूकमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येत असतो. आता पुन्हा एकदा सिद्धार्थच्या एका नव्या लूकची सर्वत्र चर्चा होत आहे. सोशल मीडिया साईटवर व्हायरल झालेला सिद्धार्थचा हा लूक त्याच्या 'लग्नकल्लोळ' या आगामी चित्रपटासाठी आहे. यात तो वधू-वर सूचक केंद्राचा बॅच लावून दिसत आहे, यावरून तो वधूच्या शोधात असल्याचे कळतेय. या चित्रपटामध्ये सिद्धार्थ कोल्हापूरमध्ये राहणाऱ्या मारुती राजाराम पाटीलची भूमिका साकारत आहे. मुळात चित्रपटाचे नाव 'लग्नकल्लोळ' असल्याने यात लग्न, धमाल, गोंधळ असा सगळा मसाला बघायला मिळणार आहे. मोहम्मद बर्मावाला दिग्दर्शित या चित्रपटात सिद्धार्थ जाधवसह भूषण प्रधान, मयुरी देशमुख यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.

डॉ. मयूर तिरमखे, अण्णासाहेब रामचंद्र तिरमखे, मंगलाबाई अण्णासाहेब तिरमखे यांनी निर्मिती असलेल्या चित्रपटाच्या कार्यकारी निर्मात्याची धुरा दिलशाद शेख यांनी सांभाळली असून चित्रपटाचे लेखन जितेंद्र परमार यांनी केले आहे. डीओपीचे काम दिलशाद व्हीए यांनी पाहिले आहे. सध्या या चित्रपटाचे कोल्हापूरमध्ये चित्रीकरण सुरु असून वर्षाअखेरीपर्यंत हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल.