गाव गाता गजाली फेम सार्थक वाटवे सांगणार शिक्षणाचं महत्व
'शिकाल तर टिकाल' हे कुणीतरी उगाच नाही म्हणून ठेवलंय. 'शिक्षण' हा प्रत्येक बालकाचा अधिकार आहे. शिक्षणामुळे प्रत्येकासाठी नवी क्षितिजं खुली होतात, शिक्षण आपल्याला जगण्याचं नवं बळ आणि स्वतःची नवी ओळख निर्माण करण्याचं सामर्थ्य देतं. अशा या शिक्षणाचं महत्व अधोरेखित करणारा 'शिक्षा' हा लघुपट लवकरच आपल्या सर्वांच्या भेटीला येत आहे.
'
कलाश्री इंटरटेनमेंट' निर्मित 'शिक्षा' या लघुपटाचे पोस्टर आणि ट्रेलर नुकतेच लॉन्च झाले असून त्याला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. या लघुपटातून 'गाव गाता गाजली' फेम बालकलाकार सार्थक वाटवे एका नव्या रूपात आपल्या समोर येत आहे. या मालिकेत क्रिशच्या भूमिकेत दिसलेला सार्थक या लघुपटात प्रमुख आणि एका वेगळ्या भूमिकेत दिसून येणार आहे.
आपण नेहमीच आपल्या आजूबाजूला काही गरीब मुलांना काम करताना पाहतो, जसे रस्त्यावर वृत्तपत्र आणि खेळणी विकणे, बूट पॉलिश करणे, कचरा आणि प्लास्टिक किंवा भंगार गोळा करणे अशी कामे करताना अनेक लहान मुले आपल्या नजरेस रोज पडत असतात. त्यावेळी आपण त्यांना काही खाद्यपदार्थ, पैसे किंवा आपल्या मुलांनी वापरलेले जुने कपडे देऊ करतो. पण आपण त्यांच्या शिक्षणाच्या मूलभूत गरजेचा विचार कधी करतो का? तर नाही. हिंदी मध्ये 'शिक्षा' म्हणजे शिक्षण आणि मराठीमध्ये 'शिक्षा' म्हणजे दंड . त्या मुलांची गरज आणि आपण केलेली मदत लक्षात घेता या दोन वेगवेगळ्या भाषेतील एकाच शब्दाच्या दोन अर्थांचे केलेले चित्रण म्हणजे हा लघुपट.
कलाश्री इंटरटेनमेंट' निर्मित 'शिक्षा' या लघुपटाचे दिग्दर्शन राष्ट्रपाल प्रकाश काकडे यांनी केले असून निर्मिती महेश महादेव कांबळे तर संगीत सुहास सुरेश भोसले आणि संजय शेलार तसेच सहाय्यक छायाचित्रकार अक्षय पाटील यांनी केले आहे. या लघुपटात सार्थक वाटवे सोबतच योगिता पाखरे व संतोष सावंत हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. लघुपटाचा एकंदर विषय हा समाजातील एका अत्यंत संवेदनशील मुद्द्याला हात घालणारा असल्याने हा लघुपट प्रेक्षकांची मने जिंकण्यात नक्कीच यशस्वी ठरेल यात शंका नाही.