रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 10 जानेवारी 2020 (14:41 IST)

सिद्धार्थ ऊडवतोय स्टाईल चा 'धुरळा'

पडद्यावर आणि पडद्यामागे नेहमीच एनर्जेटिक आणि इलेक्ट्रीफाइड व्यक्तिमत्वासाठी ओळखला जाणारा सिद्धार्थ जाधव म्हणजे महाराष्ट्राच्या तमाम प्रेक्षकांच्या गळ्यातला ताईतच म्हणावा लागेल ! सिद्धार्थने आतापर्यंत अनेक नाविन्यपूर्ण भूमिका वठवल्या आहेत, त्याबद्दल त्याचे कौतूकदेखील झाले आहे. भुमिकेत प्राण ओतण्यासाठी अभिनयाबरोबरच पात्राची वेशभूषा देखील महत्वाची असते, सिद्धार्थच्या बाबतीत अगदी हेच समीकरण अचूक जुळले आहे! कारण, प्रत्येक सिनेमांत सिद्धार्थची हटके स्टाईल छाप पाडून जाते. म्हणूनच तर, प्रसार माध्यमांद्वारे त्याच्या स्टाईलची दखल आता घेतली जाऊ लागली आहे. शिवाय, मोस्ट स्टाईलीश आयकॉनच्या नामांकन यादीतही त्याच्या नावाचा उल्लेख आहे.
 
२०२० या वर्षात तो देखील आपल्या स्टाईलचा 'धुरळा' उडवायला सज्ज झाला आहे. त्याची सुरूवात देखील सिमेंट शेठ या भुमिकेतून त्याने केली आहे. 
नुकताच प्रसिद्ध झालेला आणि अल्पावधीतच सुपरहिट ठरलेल्या 'धुरळा' चित्रपटातील सिमेंट शेठ या पात्राने महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांसोबत भावनिक ऋणानुबंध प्रस्थापित केले आहे. सिद्धार्थने साकारलेल्या ह्या भुमिकेला लोकांनी चांगलेच डोक्यावर उचलून घेतले आहे. डोळ्यावर गॉगल, मिशी, गळ्यात चैनी आणि हातात गधा असा त्याचा पेहराव संपूर्ण महाराष्ट्रात 'धुरळा' उडवत आहे. सिद्धार्थने यापूर्वीदेखील अनेक चित्रपट आणि नाटकांमधून अश्या विविध स्टाईल्स करून प्रेक्षकांची वाहवा मिळवली आहे. खऱ्या आयुष्यातही सिध्दार्थ त्याच्या स्टाईल्ससाठी प्रसिद्ध आहे. कोणता समारंभ असो वा पारितोषिक वितरण सोहळा असो, सिद्धार्थचा लूक भाव खाऊन जातो. त्याच्या हेअरस्टाईल पासून ते अगदी शूजपर्यंत तो चर्चेचा विषय बनलेला असतो. खास करून युवावर्गात त्याच्या फॅशनची क्रेझ जोर धरत आहे. कॉलेज तरुणांचा सिद्धार्थ स्टाइल आयकॉन ठरत आहे.