मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 28 डिसेंबर 2019 (14:05 IST)

मोहन जोशी म्हणतात 'मिस यु मिस'

नेहमीच आपल्या वैविध्यपूर्ण भूमिकांनी आपले मनोरंजन करणारे दिग्गज अभिनेते मोहन जोशी 'मिस यु मिस' या सिनेमातून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. 'मिस यु मिस' असे हटके नाव ऐकताच या सिनेमाबद्दल असलेली उत्सुकुता नक्कीच वाढली असणार. 'मिस यु मिस' हे वाक्य आपण आपल्या जीवनात असलेल्या 'मिस'ची आठवण काढण्यासाठी वापरतो. तसे पाहिले तर 'मिस यु मिस' हे नुसते ह्या सिनेमाचे शीर्षक नाही तर एक भावना आहे. या सिनेमात हे वाक्य नक्की कोण, कोणासाठी वापरत आहे? हे आपल्याला सिनेमा पाहिल्यावर समजलेच, तत्पूर्वी या सिनेमाचे पहिले पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे.
 
या पोस्टरमध्ये मोहन जोशी, तेजस्वी पाटील आणि नवोदित अभिनेता भाग्येश देसाई एका मजेदार पोजमध्ये दिसत आहेत. त्यांची वेशभूषा बघता सिनेमात मोहन जोशी, तेजस्वी पाटील आणि भाग्येश देसाई हाय प्रोफाइल असल्याचा अंदाज आहे. हे पोस्टर पाहून मोहन जोशींमध्ये असलेला चार्म किंचीतही कमी झाला नसून उलट या पोस्टरमध्ये ते अधिकच तरुण आणि हँडसम दिसत आहेत. या सिनेमाचे दिग्दर्शन शाम निंबाळकर यांनी केले असून शाम निंबाळकर हे या चित्रपटाद्वारे मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. शाम निंबाळकर यांनी यापूर्वी हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज दिग्दर्शक अनिस बाझमी यांच्यासोबत रेडी, वेलकम, नो एन्ट्री, मुबारकां, वेलकम बॅक आदी चित्रपटांसाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले आहेत.
 
जम्पिंग टोमॅटो मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत, ग्रे कॅट प्रोडक्शन, आर. एस. महाडिक प्रोडक्शन आणि क्षमा एंटरटेनमेंट निर्मित 'मिस यु मिस' हा सिनेमा येत्या १७ जानेवारी रोजी प्रदर्शित होत आहे. सुनील रघुनाथ महाडिक, क्षमा हिप्परगेकर आणि रोहनदीप सिंग यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे. या सिनेमात मोहन जोशी, अश्विनी एकबोटे, तेजस्वी पाटील, भाग्येश देसाई आणि किशोर नांदोस्कर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. अश्विनी एकबोटे यांचा 'मिस यु मिस' हा अखेरचा सिनेमा असल्याने या सिनेमाला एक भावनिक जोड देखील आहे.