शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 4 ऑगस्ट 2021 (08:05 IST)

म्हणून ११ वर्षे उशीरा मिळाला पद्मश्री पुरस्कार; सुरेश वाडकर यांनीच केला खुलासा

ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांना पद्मश्री पुरस्कार तब्बल ११ वर्षे उशीरा का मिळाला याचे कारण त्यांनी स्वतःच दिले आहे ते आज नाशकात होते. पोलिस आयुक्तालयात झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.वाडकर यांनी देवळाली कॅम्प परिसरातील एक जमीन खरेदी केली होती. याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध गुन्हाही दाखल करण्यात आला. त्यानंतर वाडकर यांना नाशिक न्यायालयातही हजर रहावे लागले. हे सारे प्रकरणच वाडकर यांना पद्मश्री पुरस्कार मिळण्यात अडचणीचे ठरले.तसा खुलासाच वाडकर यांनी केला.
 
वाडकर म्हणाले की, जमिनीच्या प्रकरणामुळे खुप वेदना झाल्या. यासंदर्भात मी विविध अधिकारी, कर्मचारी आणि राजकीय नेते यांना भेटलो. पण, काहीही फायदा झाला. उलट सर्वांनी वेळकाढूपणा केला. भूमाफियांची मी स्वतः शिकार झालो हे मला प्रकर्षाने जाणवले.आता नाशिक पोलिसांनीच भू माफियांविरोधात मोहिम उघडल्याने मला खुप आनंद झाला,असे वाडकर यांनी स्पष्ट केले.याच मोहिमेचा एक भाग म्हणून नाशिक पोलिसांनी भूमाफिया या लघुपटाची निर्मिती केली आहे. याच लघुपटाचे लोकार्पण वाडकर आणि पद्मा वाडकर यांच्या हस्ते झाले.
 
नाशिकच्या जमिनीच्या प्रकरणात मित्रानेच मला फसवले होते. पद्मश्री पुरस्काराबाबत राष्ट्रपती भवनाकडून चौकशी करण्यात आली. मात्र, माझ्यावर गुन्हा दाखल असल्याने मला पद्मश्री देण्यात आला नाही. अखेर ११ वर्षांनंतर मला हा पुरस्कार देण्यात आला. अनेक अधिकारी व नेत्यांनी मला सांगितले की, ते माझे मोठे चाहते आहेत. मात्र, त्यांनी मला कुठलेही सहकार्य केले नाही, अशी खंतही वाडकर यांनी बोलून दाखविली.