सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 3 ऑगस्ट 2021 (23:03 IST)

'आणि काय हवं ३'मध्ये जुई आणि साकेतचे नाते होणार अधिकच दृढ

हल्लीचे करिअर ओरिएंटेड कपल्स घरी सुद्धा ऑफिस घेऊन येतात. दिवसभर ऑफिसमध्ये केलेली कामे, तिथले ताणतणाव, चिडचिड, बॉस, सहकाऱ्यांसोबतचे संवाद अशा अनेक गोष्टी ऑफिस सुटल्यावर घरी सुद्धा येतात. अनेकदा घरी आल्यावरही आपल्या पार्टनरसोबत त्याच्याच चर्चा रंगतात. नवरा बायकोच्या हेल्दी रिलेशनशीपसाठी हे कधी नुकसान करणारेही ठरू शकते. याच गोष्टी कधी कधी भांडणासाठी कारणीभूत ठरतात. अशा वेळी या चर्चा टाळून एकमेकांना वेळ देत आपण आपले नाते अधिकच दृढ करू शकतो, हे एमएक्स एक्सक्लुझिव्ह आणि मिर्ची ओरिजनल्स क्रिएशन निर्मित, वरूण नार्वेकर दिग्दर्शित 'आणि काय हवं'च्या तिसऱ्या सिझन मध्ये दाखवण्यात आले आहे. 
 
 'आणि काय हवं'च्या पहिल्या आणि दुसऱ्या सिझनला प्रेक्षकांनी भरपूर प्रेम दिले. हल्लीच्या कपल्सचे प्रतिनिधित्व करणारे जुई आणि साकेत बघताबघता घराघरात पोहोचले. अनेकांना त्यांच्यात आपले प्रतिबिंब दिसते. प्रेक्षकांच्या याच प्रेमामुळे आता 'आणि काय हवं'चा तिसरा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 
 
ऑफिसच्या कामानंतर एकत्र वेळ घालवण्याबाबत जुई म्हणजेच प्रिया बापट म्हणते, ''वर्किंग कपल्सनी ऑफिसच्या कामानंतर एकमेकांसाठी काही वेळ काढलाच पाहिजे, जेणे करून त्यांचे नाते बहरेल, काही वेळ एकत्र सोबत घालवल्याने एकमेकांमधील बॉण्डिंग अधिक घट्ट होते. काही गोष्टींची, विचारांची देवाणघेवाण केल्याने, नव्याने काही छंद एकत्र जोपासल्याने आपण एकमेकांना उत्तमरित्या ओळखू शकतो. नात्यातील जीवंतपणा कायम राहतो आणि या सगळ्याचा सकारात्मक परिणाम म्हणजे एकमेकांमधील विश्वास आणि  प्रेम वाढते. नाते कधी कंटाळवाणे होत नाही. माझ्या वैयक्तिक नात्याबद्दल सांगायचे तर या गोष्टीची आम्हीही पुरेपूर काळजी घेतो.''  तर साकेत म्हणजेच उमेश कामत म्हणतो, '' दिवसभर कामात व्यस्त असल्यानंतर थोडा वेळ तरी प्रत्येक कपलने एकमेकांसाठी काढलाच पाहिजे. साहजिकच दिवसभर घडलेल्या गोष्टी एकमेकांसोबत शेअर कराव्यात. पण ऑफिस कधी घरी आणू नये. ही एक गोष्ट कायम लक्षात ठेवली तर तुमचे नाते कधीच रटाळ बनणार नाही. हेच सांगण्याचा प्रयत्न 'आणि काय हवं'च्या तिसऱ्या सीझनमध्ये करण्यात आला आहे.'' 
 
 सहा भागांचा 'आणि काय हवं'चा तिसरा सिझन प्रेक्षकांना एमएक्स प्लेअरवर ६ ऑगस्टपासून विनामूल्य पाहता येईल.