1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 6 सप्टेंबर 2022 (21:12 IST)

'म्हणून' वर्षा उसगावकरने माफी मागावी, कोळी बांधवांनी केली मागणी

varsha usgavakar
नामवंत अभिनेत्री वर्षा उसगावकर यांना सध्या कोळी बांधवांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. यामध्ये “बाजारात बऱ्याच वेळा कोळणींकडून माझी फसवणूक झाली आहे. बाजारातल्या पापलेटला इतका घाणेरडा वास येतो की, त्यावेळी मी हे पापलेट का घेतले, असे वाटून निराश झाले”, असे वादग्रस्त विधान वर्षा उसगावकर यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यावर मच्छिमारांनी संताप व्यक्त केला असून, ज्या ऑनलाइन अॅपने ही जाहिरात प्रदर्शित केली आहे त्यांनी कोळी महिलांची माफी मागावी अन्यथा त्यांना कायदेशीर नोटीस बजावली जाईल, अशी भुमिका मच्छिमारांनी घेतली आहे.
 
काही दिवसांपूर्वी कोळी बांधवांचा अपमान करणारी जाहिरात प्रसिद्ध झाली होती. त्यात म्हटले होते ‘बाजार की मच्छी के साथ बदबू फ्री’. आता या जाहिरातीपाठोपाठ आणखी एक जाहिरात एका अॅपवर प्रसिद्ध झाली आहे. या जाहिरातीत वर्षा उसगांवकर आहेत.
 
‘मासे खायला मला आवडतात. ते ताजे आहेत की नाही याची चव मला लगेच समजते पण बाजारात मासे घ्यायला जाते तेव्हा ते मासे ताजे आहेत की नाही हे त्यावेळी कळत नसल्याने माशांची निवड करता येत नाही. त्यामुळे बाजारात जाते तेव्हा बऱ्याच वेळा माझी कोळणींकडून फसवणूक झालेली आहे. विशेषतः पापलेटच्या बाबतीत, बाजारात ते पापलेट खूप ताजे आहेत, असे वाटतात. घरी आल्यानंतर त्या पापलेटला इतका घाणेरडा वास येतो की त्यावेळी मी हे पापलेट का घेतले असे वाटून निराश झाले. त्यावेळी हे खासगी अॅप माझ्या आयुष्यात वरदान स्वरूपात आले’ असे उसगावकर यांनी या जाहिरातीत म्हटले आहे.