दिलदार टायगर श्रॉफचा अनोखा दोस्ताना
दोस्ती-यारी एक तरफ और व्यापार-व्यवहार दुसरी तरफ.....असा एक व्यावहारीक दृष्टीकोन ठेवून मैत्री टिकवणारे अनेकजण असतात. पण बॉलीवूड स्टार टायगर श्रॉफने मैत्रीचा एक वेगळाच वस्तुपाठ सिनेविश्वासाठी घालून दिला आहे. केवळ बॉलीवूडच नाही तर अवघ्या सिनेसृष्टीतील प्रत्येक कलाकार स्वत:च्या सिनेमाच्या प्रमोशनच्या बाबतीत कमालीचा सजग असतो. पण बॉलीवूड स्टार टायगर श्रॉफ ३० मार्च रोजी येणाऱ्या स्वत:च्या बागी-२ या सिनेमाच्या ऐवजी त्याच तारखेला प्रदर्शित होणाऱ्या एका मराठी सिनेमाचे प्रमोशन करतोय. तेही मैत्री खातर.
येत्या ३० मार्चला टायगर श्रॉफचा बहुचर्चित बागी-२ आणि मराठीत आर.बी. प्रोडक्शन निर्मित गावठी हा चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित होत आहेत. खरंतर दोन्ही भिन्न भाषेतील आणि प्रकाराचे चित्रपट असले तरी एकाच दिवशी प्रदर्शित होणाऱ्या ह्या चित्रपटांमध्ये महाराष्ट्रात तरी सिनेमागृह आणि प्रेक्षक मिळविण्यासाठी स्पर्धा नक्कीच आहे. गावठी या सिनेमाचा दिग्दर्शक आनंद कुमार उर्फ ॲण्डी हा प्रसिद्ध सिने तसेच नृत्य दिग्दर्शक रेमो डीसोजा यांचा सहायक. फ्लाईंग जाट ह्या रेमो डिसोजा दिग्दर्शित आणि टायगर श्रॉफ अभिनित चित्रपटाच्या शुटींग दरम्यान टायगरला डान्सस्टेप तसेच सीन समजावून सांगण्याचे काम अर्थातच आनंदकुमार उर्फॲण्डी यांचे होते. ॲण्डीचा डान्स आणि दुवे हेरून शिकविण्याच्या पद्धतीवर टायगर खुश होता. त्यात ॲण्डीचा शांत, संयमी, मितभाषी आणि विनम्र स्वभावामुळे टायगर आणि ॲण्डीची चांगली गट्टी जमली. फ्लाईंग जाट येऊन गेला पण टायगरने ॲण्डीशी मैत्री कायम ठेवली. ॲण्डीने एक मराठी फिल्म दिग्दर्शित केली आहे आणि ती उत्तम झाल्याचे टायगरला रेमो डिसोजाकडून समजले तेव्हा त्याने फोन करून ॲण्डीचे अभिनंदन केले.
गुरूस्थानी असलेल्या रेमो डिसोजा सरांच्या हस्ते पहिले गाणे प्रकाशित झाल्यानंतर टायगरच्या हस्ते आपल्या चित्रपटाचा ट्रेलर लाँच आणि दुसरे ‘भन्नाट’ हे गाणे प्रकाशित व्हावे, अशी ॲण्डीची मनोमन इच्छा होती. परंतु, गावठी आणि बागी-२ हे दोन्ही चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित होत असल्याने आता टायगर आपल्या सिनेमाच्या प्रमोशनसाठी येणार नाही, हे मनाशी धरून दिग्दर्शक आनंदकुमार उर्फ ॲण्डीने टायगरकडे कधी विचारणा केली नाही. परंतु, टायगरने एखादे ट्वीट किंवा शुभेच्छा देण्यासाठी व्हिडीयो अपलोड करावा, या हेतूने ॲण्डीने टायगरला एक फोन केला. बोलण्याच्या ओघात ॲण्डीने त्याच्या मनातील खरी इच्छा टायगरला सहज बोलून दाखवली. तेव्हा टायगरने ट्रेलर आणि दुसरे गाणे लाँच करण्यासाठी लगेच होकार दिला, इतकेच नाही तर तारीख आणि वेळही सांगितली. आणि 6 मार्च रोजी मुंबईत एका भव्यदिव्य सोहळ्यात टायगर श्रॉफ आणि प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक बॉस्को यांच्या हस्ते गावठी या चित्रपटाच्या ट्रेलर आणि दुसर्या गाण्याचे संगीत प्रकाशीत झाले. इतकेच नव्हे तर टायगर ने आणि बॉस्को ‘भन्नाट’ या ध़डाकेबाज आयटम साँगवर ॲण्डीसोबत मनसोक्त थिरकले.
“फ्लाईंग जाट या माझ्या चित्रपटाच्या शुटिंग दरम्यान ॲण्डीसरांकडून मला जे काही मिळालं, त्याने माझी कला अधिक बहरली, असं मी मानतो. ॲण्डी सरांचा डान्स हा चमकणाऱ्या वीजेप्रमाणे आहे त्यामुळे मला त्यांच्यासमोर आता नाचताना थोडं दडपण आलं होतं. अतिशय कल्पक आणि मेहनती माणूस आहे. त्यामुळे त्यांनी दिग्दर्शित केलेला गावठी हा सिनेमा नक्कीच प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा असेल, याची मला खात्री आहे. ट्रेलर आणि गाणं पाहून चित्रपटाबद्दल मलाचं जास्त उत्सुकता लागलीय. माझा बागी-२ आणि गावठी एकाच दिवशी प्रदर्शित होत असले तरीही मी गावठी नक्कीच पाहिन!” अशा भावना टायगर श्रॉफ याने याप्रसंगी व्यक्त केल्या. या सोहळ्याला येऊन टायगर श्रॉफ याने समस्त नृत्यकलाकारांचा सन्मान कला आहे. अशा शब्दात नृत्य दिग्दर्शक बॉस्को यांनी टायगरचे आभार मानताना ॲण्डी आणि गावठीच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या.
टायगरने निभावलेली मैत्री आणि व्यक्त केलेल्या प्रेमामुळे दिग्दर्शक आनंदकुमार उर्फ ॲण्डी यांच्यासह गावठीची संपूर्ण टीम भारावून गेली. दिलदार टायगर श्रॉफच्या स्वभावाचा हा पैलू मतलबी आणि कृत्रीम वागणाऱ्यांच्या डोळ्यात नक्कीच अंजन घालणारा आहे.
गावठी ह्या चित्रपटाच्या रंगारंग सोहळ्याला टायगर श्रॉफ सोबत प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक बॉस्को मार्टिस, डॉ. पी. अनबलगन – आय.ए.एस, कथा लेखक व निर्माते सिवाकुमार रामचंद्रन त्याचबरोबर चित्रपटातील मुख्य कलाकार श्रीकांत पाटील व योगिता चव्हाण तसेच संदीप गायकवाड, गौरव शिंदे उपस्थित होते. संगीतकार अश्विन भंडारे तसेच श्रेयश यांच्या सोबत चित्रपटाच्या प्रस्तुतीसाठी पुढाकार घेणारे कासम अली, समीर दिक्षीत आणि ऋषिकेश भिरंगी व इतर मान्यवर उपस्थित होते.
गावठी हा शब्द अपमान नाही तर अभिमान वाटावा, असा आत्मविश्वास प्रत्येकाला निखळ मनोरंजनाच्या माध्यमातून देणारा, आर. बी. प्रोडक्शन निर्मित ‘गावठी’ हा चित्रपट ३० मार्च रोजी महाराष्ट्रभरात प्रदर्शित होत आहे.